म्हणून गिरीश बापटांना पुण्याच्या राजकारणातले चाणक्य म्हणलं जातं…

कसब्याचा आधारवड गेला…

भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. 

पुण्याच्या राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट १९७३ पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.  त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.

गिरीश बापटांचं कसबव्यावरचं असलेले वर्चस्व त्यांची राजकीय ताकद दाखवून देते.

टेल्को कंपनीत १९७३ ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. १९८३ ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग ३ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

१९९३ ला झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलं नाही. कसबा पेठ मतदार संघातून १९९५ पासून सलग २५ वर्ष गिरीश बापट यांनी एक हाती आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं

राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर २०१९ ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते.  कसब्यात गिरीश बापट यांचं एकमुखी नेतृत्व होतं. 

मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना खासदारकीचं तिकीट मिळालं आणि मुक्ता टिळक या कसबा पेठमधून आमदार झाल्या. असं असलं तरी मतदारसंघावर गिरीश बापट यांचाच वरचष्मा होता. मात्र गेल्या काही काळापासून आजारपणामुळे ते राजकारणात सक्रिय नव्हते. 

कसब्याच्या पोटनिवडणुकीमुळे चर्चेत आलेले…

नाकात नळी, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हिलचेअरवर बसून गिरीश बापट अगदी कसब्याच्या निवडणुकीच्या प्रचारात ते मैदानात उतरले होते. बापटांच्या या एन्ट्रीमुळे त्यांचे कार्यकर्ते, कसब्यातील जनता भावुक झाले होते. त्यांचं भाषण सुरु असताना कित्येकांच्या डोळ्यात पाणी होतं हेच नेत्याबद्दलचं प्रेम दिसून आलं. गिरीश बापट+ कसबा हे समीकरण इतकं घट्ट झालेलं कि, कसब्यात त्यांच्याएवढा ताकदीचा दुसरा नेता तरी दिसून येत नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे हे प्रचार सभेतून दिसून आलं.

विशेष म्हणजे बापटांचं कसब्यातील राजकारण नेहमी सर्वसमावेशक राहिलंय. 

गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणात ‘सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ओळखले जातात. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब गिरीश बापट यांना उत्तम अवगत असल्याचं पुण्यातले पत्रकार सांगत आलेत. 

मतदारसंघात कुठं काय घडतंय याची बित्तंबातमी त्यांना असते. मतदारसंघातला असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क, सर्वपक्षीय कनेक्शन या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. 

जातीपातीचं राजकारण त्यांनी कधी केलं नाही, त्यांनी फक्त ब्राम्हण वर्गावर फोकस न करता इतर जातिवर्गातील जनतेला तितकंच महत्व दिलं.  बापटांचं राजकारण आजवर सर्वसमावेशक राजकारण राहिल्याने त्यांना आजवर सर्वच जाती-वर्गातून मते मिळत आलीत हेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं यश म्हणावं लागेल.

गेल्या काही काळापासून गिरीश बापट आजारी असताना भाजपच्याच नाहीतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच इतर नेत्यांनीही भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या जाण्याने भाजपच मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

गिरीश बापटांना भावपूर्ण श्रद्धांजली !

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.