मुंबईत एकटं असं कुटुंब आहे ज्यांच्याकडे तब्बल १ लाख कोटींची जमीन आहे

टोलेजंग इमारती, लोकलचा आवाज, लोकांची वर्दळ आणि बॅकग्राउंड दिवसभर कानी पडणारा समुद्राच्या लाटांचा आवाज… मुंबई काहीशी अशी. अनेक स्वप्न घेऊन देशभरातून लोकं या शहरात येतात म्हणून ‘ड्रीम सिटी’ हे बिरुद मोठ्या तोऱ्यात मुंबई मिरवते. काही तरी बनायचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या प्रत्येकाचं एक स्वप्न मात्र कॉमन बनताना दिसतं ते म्हणजे…

मुंबईत स्वतःची जमीन असणं, स्वतःचं घर असणं.

पण ती मुंबई आहे. तिथले नुसते प्रॉपटी प्राइजेस बघितले की पायाखालची जमीन सरकते आणि अनेक जण त्यांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याचे प्रयत्न जागीच सोडून देतात.

असे किती पैसे लागतात विचाराल तर १ एकर जमिनीसाठी ७४६ कोटी. अलीकडेच झालेल्या एका प्रॉपर्टी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील ही किंमत आहे. उगाच मुंबईला देशातील सगळ्यात महागडं प्रॉपर्टी मार्केट म्हटल्या जात नाही!

मात्र अशा या मुंबईत एक कुटुंब असं आहे ज्यांच्याकडे तब्बल ३४०० एकर एवढी मोठी जमीन आहे. या जमिनीची डेव्हलपमेंट पोटेन्शल १ लाख कोटींपेक्षा जास्त किमतीची आहे.

या कुटुंबाचं नाव आहे गोदरेज कुटुंब. तेच गोदरेज कुटुंब ज्यांच्या गोदरेज या कंपनीचं मार्केट कॅप १५६.५४ बिलियन आहे.

गोदरेज कुटुंबाला ही जमीन कशी मिळाली याचा भारी इतिहास आहे…

याची सुरुवात होते १८०० च्या दशकात. १८०० च्या दशकाच्या सुरुवातीला मुंबई अगदी वेगळं होतं. आज त्याचं जे चित्र आहे तेव्हा तसं नव्हतं. हे समुद्रकिनारी वसलेलं छोटंस गाव होतं, जंगलाने वेढलेलं होतं. मात्र याची प्रगती सुरु झाली जेव्हा ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी याठिकाणी पोहोचली. तसं ईस्ट इंडियाने इथे यावं असं काहीच नव्हतं मात्र कंपनी सरकार मुंबईच्या भौगोलिक स्थितीला भाळले होते.

ईस्ट इंडिया कंपनी मुंबईत आलीच होती बिजनेस विस्तारायला. बिजनेस विस्तारायचा असेल तर त्यासाठी हातात जमीन असणं गरजेचं होतं. म्हणून कंपनीने जमीन खरेदी करणं सुरू केलं. एका एका ठिकाणी जागा घेताना त्यांनी जिथे आज विक्रोली, नाहूर आणि भांडुप वसलेले आहेत, ती जागा देखील खरेदी केली.

मात्र ३० वर्षांत म्हणजे १८३० मध्ये त्यांना वाटलं ही जमीन काही त्यांच्या कामाची नाही आणि  त्यांनी ती विकण्यासाठी काढली.

तेव्हा मुंबईमध्ये फ्रामजी बनाजी नावाचे पारशी गृहस्थ राहायचे. ते व्यवसायाने बिजनेसमॅन होते. भारत आणि चीन दरम्यान त्यांचा व्यापार चालायचा. विक्रीला काढलेली जमीन त्यांनी खरेदी केली. पण पुढे बिजनेसमध्ये आलेल्या काही समस्यांमुळे त्यांनी देखील जमीन विकायला काढली. बॉम्बे हायकोर्टाद्वारे तेव्हा या जमिनीचा लिलाव करण्यात आला होता.

यावेळी लिलावात एंट्री झाली पिरोजशा गोदरेज यांची. पिरोजशा गोदरेज म्हणजे गोदरेज कंपनीचे संस्थापक अर्देशीर गोदरेज यांचे भाऊ.

पिरोजशा गोदरेज यांनी जेव्हा ही जमीन खरेदी केली तेव्हा देखील या जमिनीला काही महत्व नव्हतं पण त्यांनी विकली नाही. हळूहळू मुंबई बदलत गेली. इंडस्ट्रीज मुंबईत मूळ धरू लागल्या तसं जमीन मिळणं अवघड होत गेलं आणि जमिनीची किंमत वाढत जाऊ लागली. बघता बघता मुंबईच्या प्राईम लोकॅलिटीमध्ये ही जागा समाविष्ट झाली आणि गोदरेज कुटुंब मुंबईतील सगळ्यात मोठं प्रायव्हेट लँड ओनर झालं.

आज या जमिनीची व्हॅल्युएशन १ लाख कोटींच्या घरात गेली आहे.

आता साहजिक प्रश्न पडतो की, गोदरेज कुटुंबाने जमिनीचं काय केलंय?

ही सगळी जमीन गोदरेज यांची असली तरी त्यांना ती पूर्णपणे हाताळता येत नाहीये. एकूण जमीन आहे ३४०० एकर. यातील ३ हजार ५० एकर जमीन विक्रोलीमध्ये आहे तर ३५० एकर नाहूर आणि भांडुप याठिकाणी आहे. मात्र यातील ३०० एकर जमिनीवर अवैध बांधकाम करण्यात आलं आहे. म्हणजे झोपडपट्टी इथे तयार झालीये.

१७५० एकर जमिनीवर समुद्री वनस्पती वाढल्या आहेत, ज्यांना काढता पण येत नाही. कारण आडवे येतात पर्यावरण संवर्धनाचे कायदे. उरलेल्या १३५० एकर जमिनीवर गोदरेज हवं ते करू शकतात आणि त्यानुसार त्यांनी विकासकामं देखील केली आहेत.

विक्रोलीतील जमिनीवर गोदरेज यांनी गोदरेज सेक्युरिटी, गोदरेज इंटेरिओ, गोदरेज एरोस्पेस, गोदरेज टुलिंग, अशा कंपन्या उभ्या केल्या आहेत. तर गोदरेज गार्डन इंक्लेव, गोदरेज प्लॅटिनम असे रेसिडेंशल प्रोजेक्ट आहेत आणि गोदरेज हॉस्पिटल देखील आहे. छोटं आयटी पार्क देखील उभारलं आहे तर बाकी जागेवर गोदरेजने त्यांच्या कामगारांसाठी घरं, शाळा बांधली आहेत, ज्याला ‘गोदरेज कॉलनी’ म्हणून ओळखलं जातं.

हे सगळं उभारून सुद्धा संपूर्ण जमीन कामात येत नाहीये. म्हणून कंपनीने उरलेल्या जमिनीवर अजून प्रोजेक्ट्स बनवण्याचं ठरवलं आहे. पण इथे कौटुंबिक वाद आडवे येत आहेत.

यात दोन गट पडले आहेत. ‘गोदरेज प्रोप्रर्टीज’ नावाची कंपनी आदी गोदरेज आणि नादिर गोदरेज यांच्या मालकीची आहे. तर ‘गोदरेज अँड बॉइस’ ही कंपनी स्मिता गोदरेज आणि जमशेद गोदरेज सांभाळतात.

यातील आदी गोदरेज यांना या जमिनीवर विकासकामं करायची आहेत. त्यासाठी ते ज्या जमिनीवर झोपडपट्टी आहे ती ३०० एकर जमीन देखील रिक्त करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. कारण या जमिनीच्या मिळण्याने कंपनीच्या प्रॉफीटमध्ये कित्येक पटींनी वाढ होऊ शकते, असं आदी गोदरेज यांचं म्हणणं आहे.

तर दुसरीकडे आहेत स्मिता आणि जमशेद गोदरेज आहेत ज्यांना या जमिनीवर विकासकामं करावी, असं वाटत नाही. त्यांचं म्हणणं आहे की जमीन आहे तशीच राहू द्यायला हवी कारण पर्यावरणीय दृष्ट्या तिचं महत्व आहे. जर जास्त डेव्हलपमेंट केली तर त्याने मुंबई शहराच्या पर्यावरणाला हानी पोहचू शकते. 

गोदरेज कुटुंबातच एकमेकांमध्ये उरलेल्या जमिनीला घेऊन वाद सुरु आहेत. मात्र यातील एक फॅक्ट हा देखील आहे की जर गोदरेज समूहाने या जमिनीवर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स उभारण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी अडकलेली जमीन देखील मिळवली तर…

‘गोदरेज ग्रुप मुंबईतील सगळ्यात मोठा डेव्हलपर ग्रुप बनू शकतोय.’ 

आणि मुंबईतील सगळ्यात मोठा डेव्हलपर ग्रुप असणं म्हणजे काय बाप गोष्ट आहे ना? हे मुंबईचं देशातील महत्व – राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा तिन्ही दृष्टिकोनातून अभ्यासून पहा. जास्तच लोड येत असेल तर तुमचं मुंबईत साधी एक खोली घेण्याचं स्वप्न बघा आणि त्याची किंमत बघा.. सगळा मुद्दा समजून येईल. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.