हातोडा गँगची खरी दहशत वेबसिरीजमध्ये नाही पाकिस्तानमध्ये होती
२ एप्रिल १९८५ ची उत्तररात्र. अल्लाह वसाया नावाचा एक माणूस, रेल्वेनं कराचीत आला. त्याला नातेवाईकांकडे क्लिफ्टनला जायचं होतं. रात्रीची वेळ होती, जायला फार वेळ लागेल म्हणून यानं ठरवलं असावं इथं ब्रिजखाली झोपू आणि उजाडल्यावर निघू.
सकाळी सूर्य उजाडला पण अल्लाह वसायाचे डोळे नाही. त्या रात्रीच त्याचा निर्घृण खून झाला. खुनाची पद्धत विचित्र होती, कुणीतरी त्याच्या डोक्यात जड वस्तूनं प्रहार केल्यासारखं त्याचं डोकं छिन्नविछीन्न झालं होतं.
८५ चा काळ, ना रस्त्यावर सीसीटीव्ही होते, ना पोलिसांची गस्त.
कराचीमध्ये दिवसभर चर्चा झाली, लोकांनी आपापल्या बुद्धीनुसार अंदाज लावले आणि कामाच्या रेट्यात एक खून विसरुनही गेले.
दोन दिवस उलटले आणि सकाळी बातमी आली. कराचीतच दर्ग्या जवळ झोपलेल्या दोन लोकांचा खून झाला. ही लोकं बेघर होती, त्यांच्याकडे ना पैसे होते, ना लुटण्यासाठी काही. पण त्यांचा खून झाला, कुणीतरी त्यांच्या डोक्यात जड वस्तूनं प्रहार केल्यासारखं त्यांचं डोकं छिन्नविछीन्न झालं होतं.
२ एप्रिल पासून पुढच्या २२ दिवसांत एकूण नऊ खून झाले. या नऊ जणांच्या खुनात दोन गोष्टींचं साम्य होतं, एक म्हणजे ही सगळी लोकं गरीब, बेघर, रस्त्यावर झोपलेली या गटात बसणारी होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे… कुणीतरी त्यांच्या डोक्यात जड वस्तूनं प्रहार केल्यासारखं त्यांचं डोकं छिन्नविछीन्न झालं होतं.
मध्ये काही दिवस गेले, मग एका सकाळी बातमी आली की, ‘एका घरात एक पोरगं जिवंत सापडलंय.’
तुम्ही म्हणाल यात बातमी काय आहे, पण जर असं सांगितलं की,
“एका घरात एकच पोरगं जिवंत सापडलंय.” बाकीच्यांचं काय झालं? खून. पद्धत तीच… जड वस्तू, प्रहार, डोकं छिन्नविछीन्न.
पण मग एक पोरगा कसा काय वाचला?
ही घटना घडलेली गोलीमार भागातल्या ल्यारी नदीच्या किनारी असलेल्या हसन औलिया गावात. वस्तीतल्या एका घराचं दार सकाळी उघडलं गेलं नाही, म्हणून आजूबाजूच्या लोकांनी थेट घरात उडी घेतली, तेव्हा समजलं की घरातल्या सगळ्यांचा खून झालाय. एक बारकं पोरगं झोपेत सोफ्याखाली गेलं आणि वाचलं.
लोकांमध्ये दहशत पसरली, काही दिवसांनी लोक परत निवांत झाले… तेवढ्यात एक बातमी आली की आठ मजुरांचा सेम पॅटर्नमध्ये खून झाला.
आता मात्र कराची पोलीसच नाही, तर गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्या. तपासाची चक्रं वेगानं फिरू लागली. लोकांमध्ये चौकशी करताना अनेकांनी अकलेचे तारे तोडले. एक जण म्हणाला, ‘ही लोकं अंगाला तेल आणि ग्रीस लाऊन फिरतात, ते रात्री ३ ते पहाटे ५ या वेळेत फिरतात. अंगाला लावलेल्या तेलामुळं कुणी त्यांना पकडू शकत नाही आणि रात्री लोकं झोपेत असल्यानं त्यांना दरोडा घालायला सोपं पडतं.’
पण हे समजायला कुणी त्यांना पाहिलंच नव्हतं आणि खून झालेल्या बेघर गरीब लोकांवर दरोडा तरी काय टाकणार?
तेवढ्यात पोलिसांना एक माणूस सापडला, जो सिरीयल किलर होता.
पण त्याचा आणि इतर खुनांचा संबंध नव्हता, कारण तो फक्त बायकांचे खून करत होता. मारल्यावर तो बलात्कारही करत नव्हता, तर फक्त त्यांचे कंबरेखालचे कपडे घेऊन पसार व्हायचा.
त्यामुळं कोडं अजून वाढलं, दोन वर्षात कराची आणि आसपास एकाच पॅटर्नमध्ये जवळपास १०० खून झाले होते. हे खून करणारा एक माणूस आहे की पूर्ण गॅंग याचा काहीच तपास नव्हता.
अशातच एक खबर लागली, एका माणसावर हल्ला झाला. ज्यात त्याच्या डोक्याला मार लागला पण तो वाचला. त्यानं पोलिसांना सांगितलं की, “मी रस्त्यावर झोपलो होतो. रात्री अचानक गाडीचा आवाज आला, त्यानंतर पांढरे कपडे घातलेली काही माणसं गाडीतून उतरली, त्यांच्या तोंडाला पांढरं कापड होतं आणि हातात लोखंडी शस्त्र. त्यांनी ते माझ्या डोक्यात घातलं, त्यांना वाटलं मी मेलो म्हणून ते निघून गेले. पण मी वाचलो.”
ही बातमी तिकडच्या पेपरमध्ये छापून आली आणि माध्यमांनी या गॅंगला नाव दिलं ‘हातोडा गॅंग.’
ही गॅंग पाकिस्तानमधले लोक चालवतात, पाकिस्तान बाहेरचे लोक चालवतात की आंतरराष्ट्रीय गॅंग, ही माणसं आहेत की भुताटकी असं लय आभाळ मारलं गेलं. पण हाती काहीच लागलं नाही.
या हातोडा गॅंगची दहशत सगळ्या पाकिस्तानमध्ये पसरली होती. लोकं सवयीनुसार अंगणात झोपायला, अंगणात गप्पा मारायला ठसत होती. पाकिस्तानमध्ये बोललं जाऊ लागलं, की हे स्थानिक दहशतवादाचं पहिलं उदाहरण आहे.
मग पिक्चरमध्ये आणले गेले, स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे कमांडो ‘कर्नल सईद’
पाकिस्तानचे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी हातोडा गॅंगचं कनेक्शन शोधून काढलं होतं. पण त्यांच्या सूत्रधाराला अटक करणं अवघड होतं. हीच जबाबदारी कर्नल सईद यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्यांनी बजावलीही.
पाकिस्तानमध्ये पाक-लिबिया होल्डिंग्स (बँक) नावाची एक संस्था होती. त्याचा प्रमुख होता ‘अम्मार’ नावाचा माणूस. सदानकदा ड्रायव्हर सोबत फिरणाऱ्या अम्मारला फुल फिल्मी स्टाईल पकडण्यात आलं आणि हातोडा गॅंगचा उलगडा झाला.
पाकिस्तानची अमेरिकेसोबत वाढलेली सलगी लिबीयन लोकांना आवडली नाही.
अम्मार या अशा लोकांचा नेता बनला. त्यानं लिबियामधल्या पाकिस्तानी लोकांना भडकावण्यातही यश मिळवलं. एका विमानतळावरच्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला हाताशी तो पाकिस्तानी लोकांनाच आपल्या देशात आणायचा आणि आपल्याच नागरिकांना मारायला लावायचा.
कधी एक कधी आठ असे करत त्यांनी शंभर खून केले. माणसं गाडी घेऊन यायची, डोक्यात हातोडा मारुन खून करुन सकाळी पुन्हा लिबिया गाठायची.
फक्त अमेरिकेशी सलगी हेच कारण असावं की लोकांमध्ये दहशत पसरावी हे…
हे कधीच स्पष्ट झालं नाही. कारण अम्मारला ‘नावडता व्यक्ती’ म्हणून लिबियाला पाठवण्यात आलं. कारण तर स्पष्ट झालं नाही, पण लोकं रस्त्यावर, अंगणात झोप लागली… कारण अनेक खून पचवून पसार झालेल्या हातोडा गॅंगची दहशत आता बंद झाली होती.
हे ही वाच भिडू:
- ‘दुपट्टा किलर’च्या भीतीमुळं गोव्यातल्या पोरी ओळखीच्या लोकांशी बोलायलाही घाबरायच्या…
- कर्नाटकचा सिरीअल किलर महिलांवर बलात्कार करुन खून करायचा, तेही त्यांच्या अंतर्वस्त्रांसाठी
- म्हणून ४२ खून करणाऱ्या रमण राघवला फाशी देण्यात आली नव्हती.