हसत हसत फासावर गेलेला सिंध प्रांताचा भगतसिंग : हेमू कलानी.

पारतंत्र्याच्या साखळदंडात भारतमातेला ब्रिटिशांनी जखडून ठेवलं होत. तिला यातून बाहेर कसं काढायचं हाच ध्यास तेव्हा काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकाच्या मनात होता. ब्रिटिशाना भारतातून हुसकावून लावण्यासाठी भारतातल्या असंख्य वीरांनी आपापल्या परीने योगदान दिले.

यापैकीच एक होते हेमू कलानी.

२३ मार्च १९२३ रोजी सिंध प्रांतामधील सख्खर या गावी हेमू कलानी यांचा जन्म झाला. शाळेत असतानाच हेमू भगतसिंह यांच्या हौतात्म्याने प्रेरित झाला होता. आपल्या देशावर अन्याय करणाऱ्या ब्रिटिश सरकारबद्दल चीड निर्माण झाली होती.

वयाच्या सातव्या वर्षीच तो आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्याने एका क्रांतिकारी गटाची स्थापना केली. त्याला भगतसिंह यांच्या प्रमाणे हसत हसत देशासाठी हुतात्मा व्हायचं होत.

शाळा संपल्यावर गांधीजीनी सुरु केलेल्या १९४२च्या भारत छोडो आंदोलनात तो सहभागी झाला.

तो आणि त्याचे मित्र “भारत माता कि जय ” अशा घोषणा देत रात्रीच्या वेळी ब्रिटीश अधिकाऱ्याच्या घरावर दगड फेक करणे, परदेशी मालावर बहिष्कार टाकून स्वदेशी मालाचा प्रचार करणे असे उद्योग करत.

एकदा त्याच्या काही मित्रांना इंग्रज अधिकाऱ्यांनी अटक केली. तेव्हा हेमूनी गावातले सगळे तरुण गोळा करून गावच्या पोलीस स्टेशन वर मोर्चा नेला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अनेकजण मृत्युमुखी पडले. या घटनेचा हेमूवर खूप मोठा परिणाम झाला.

ब्रिटीशांच्या विरुद्ध त्याने हातात शस्त्र घेतले. याकाळात हेमू कलानी आणि त्याच्या साथीदारांची दहशत अख्ख्या सिंध प्रांतात पसरली. एकदा इंग्रज सैनिकांशी झालेल्या झटापटीमध्ये त्यांनी ४० सैनिकांना यमसदनी पाठवले.

सरकार वेड्याप्रमाणे या क्रांतिकारकांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे हात धुवून लागली होती.

एक दिवस त्यांना बातमी कळाली कि त्यांच्या भागातून ब्रिटीश सैनिकांची एक तुकडी दारुगोळा भरून एका रेल्वेगाडीतून  बलुचिस्तानला जाणार आहे. त्यांना काहीतरी धमाकेदार करून ब्रिटीश सरकारला झटका द्यायचा होता आणि ती संधी त्यांना चालून आली होती.

त्यांनी आपल्या मित्राबरोबर रूळ उखडून सैनिकांची ट्रेन पाडण्याचा कट केला.

ठरल्या प्रमाणे हेमू कलानी आणि साथीदारांनी रूळाचे फिशप्लेट उखडले पण अस करताना तिकडून जाणाऱ्या ब्रिटीश पोलिसांना ते दिसले. त्यांनी लाल झेंडा दाखवून रेल्वे थांबवली. पोलीस क्रांतीकारकांना पकडण्यासाठी धावले.

यावेळी हेमू कलानी यांनी मित्रांना तिकडून पळून जायला सांगितले आणि ते स्वतः तिथेच थांबले.

त्यांना पोलिसानी पकडून तुरुंगात टाकले. तुरुंगात त्यांनी त्यांच्या साथीदारांची नाव सांगावीत म्हणून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले . त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून बेदम मारहाण करण्यात आली. मित्रांची नावे सांगितल्यास माफ करण्यात येईल असे प्रलोभन दाखवले.

पण त्यांनी देशाच्याविरुद्ध गद्दारी केली नाही. मित्रांच नावे काही केल्या सांगितली नाहीत.

हेमू कलानी विरुद्धचा खटला सख्खर न्यायालयात चालवण्यात आला .तिथे त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार या निकालाविरुद्ध  हैदराबादच्या वरिष्ठ न्यायालयात गेले. तिथल्या ब्रिटीश न्यायाधीशाने हेमू कलानीच्या बद्दल द्वेष होता. त्यांनी त्यांच्या कृत्याला कठोर आणि गंभीर ठरवुन हेमूला फाशीची शिक्षा सुनावली.

या निकाला विरुद्ध अनेक याचिका दाखल करण्यात आल्या . खुद्द महात्मा गांधीनी त्यांना फाशीची  शिक्षा देऊ नये म्हणून सरकारकडे मागणी केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

हेमू कलानी तुरुंगात असताना त्यांना त्यांच्या आई भेटायला आल्या होत्या. आपल्या बाळाला अस तुरुंगात पाहून त्या माऊली टाहो फोडतील अस बाकी कैद्यांना वाटल होत पण तस काही झाल नाही. उलट हेमू कलानीनी आपल्या आईला सांगितली कि मला फाशी झाल्यानंतर तुम्ही चळवळ अजून जोमाने चालवायची .

२१ जानेवारी १९४३. त्यांच्या फाशीचा दिवस उगवला.

त्या दिवशी ते आनंदाने एकदम खुश होते.  भारत मातेसाठी आपल्या जन्माच सोन झाल असच त्यांच म्हणन होत. शेवट जवळ आला आहे हे कळल्यावर भल्याभल्यांचा धीर सुटतो भीतीने वजन निम्म्यावर येते.पण हेमू कलानी निवांत होते.

फाशीच्या आधी त्यांची शेवटची तपासणी करताना लक्षात आले की त्यांचे वजन उलट आठ पौंडाने वाढले आहे.

भगतसिंग यांच्याप्रमाणे आपल्याला सुद्धा देशासाठी शहीद होण्याचं भाग्य मिळतय यामुळे ते खुश होते. हातात भगवत गीता घेऊन  ” भारत माते की जय ”  “इन्कलाब जिन्दाबाद ” ह्या घोषणा देत हसत हसत ते फाशीच्या जागेकडे निघाले.  बाकिचे कैदी आणि इंग्रज अधिकारी आश्चर्याने या वीराकडे पहात होते.

मला फाशी देताना माझा चेहरा काळ्या कपड्याने झाकू नका अशी विनंती त्यांनी अधिकाऱ्याना केली. आनंद साजरा करतच ते फासावर गेले .त्यावेळी ते अवघ्या एकोणवीस वर्षाचे होते.

images

हेमू कलानी यांना फाशी दिल्याची बातमी कळाताच सिंध प्रांतमध्ये बंद पुकारण्यात आला. त्याला प्रतिसाद हि तितकाच जोरदार मिळाला. संपूर्ण देशात  शोककळा पसरली. तरुणामध्ये संताप उसळला. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ब्रिटीश सरकार विरुद्ध निदर्शने केली.

हेमू कलानी यांच्या फाशीची बातमी कळल्यानंतर महात्मा गांधीजींना ही अश्रू अनावर झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.