सांगली, सातारा, कोल्हापूर घडवण्याचं श्रेय या इंग्रज अधिकाऱ्याकडे जातं.

आज पश्चिम महाराष्ट्र, इथली सुपीक शेती, इथल सहकार क्षेत्र, इथली सुबत्ता अख्ख्या भारतभरात वेगळीच आब राखून आहे. कृष्णा नदी या भागाची जीवनदायनी आहे. सगळे लोक या भागाच्या विकासाचं क्रेडीट इथल्या मातब्बर नेत्यांना, साखर सम्राटानां देतात. त्यांच योगदान तर आहेच पण याशिवाय एका इंग्रज माणसाच क्रेडीट आहे. ज्याचं नाव आज कोणालाही सांगता येणार नाही.

भिडूनो, गोष्ट आहे एकोणीसाव्या शतकातली. पुण्यात पेशवाई नुकतीच संपली होती. इंग्रजांच राज्य आलं होतं. मुंबईमध्ये बसलेला गव्हर्नर अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करत होता. सगळे राजे नामधारी उरले होते. कंपनी सरकार भारताचे भवितव्य ठरवत होती.

इंग्लंडमधून अनेकजण परीक्षा पास होऊन भारतात इस्ट इंडिया कंपनीमधून आपलं नशीब उजळता येत का हे चेक करायला येत होते.

यातच होता हेन्री बार्टल फ्रेअर.

त्याची नेमणूक मुंबई इलाख्यात झाली होती. भारतात आल्यावर त्याने भाषा परीक्षा दिली, त्यात पास झाला आणि वय अवघ २१ असताना थेट पुण्याच्या कलेक्टरचा असिस्टंट  झाला. एकेकाळी माउंट स्टूअर्ट एल्फिन्स्टनने या भागात केलेल्या कामाच्या पदचिन्हावर सरकार चालवलं जात होतं. भारतीयांबद्दल सहानुभूती असणारा एल्फिन्स्टन हा बार्टल फ्रेअरचा देखील हिरो होता. मराठी भाषा, इथले लोक, त्यांची शेती, त्यांची संस्कृती याबद्दल त्यालाही विशेष कुतुहूल होते.

एकदा इंदापूर जवळ त्यांचा लष्करी तळ होता तेव्हा त्याने इंग्लंडमध्ये आपल्या छोट्या भावाला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो,

“आम्हाला पुणे सोडून काही दिवस झाले. पावसाळा सुरु आहे. आम्ही एका देवळात राहतोय. इथून जवळच भीमा नावाची नदी प्रचंड वेगाने वाहतेय. तिला पूर आलाय. तिला बघून मला आपण आपल्या गावात नदीत पोहायला जात होतो याची आठवण होते. पण ही नदी प्रचंड मोठी आहे. त्यामुळे पाण्यात उतरणे शक्य नाही. आसपासच्या गावातील लोक बाहेर पडू शकत नाहीत कारण या भागात नद्यांवर पूलच नाहीत. “

सर बार्टलची कार्यक्षमता पाहून त्याची रवानगी मुबईचे तेव्हाचे गव्हर्नर सर जॉर्ज आर्थर यांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून करण्यात आली. थोड्याच दिवसात सर आर्थरसुद्धा या तडफदार तरुणावर खूप इम्प्रेस झाले. इतकच नाही तर त्यांनी आपल्या मुलीच लग्न हेन्रीबरोबर लावून दिल.

अवघ्या चारच वर्षात त्यांनी साताऱ्याच्या छत्रपतींच्या दरबारातल्या महत्वाच्या पदावर हेन्रीची नेमणूक केली. तेव्हा गादीवर दुसरे शहाजी महाराज होते. खूप वादानंतर त्यांना ही गादी मिळाली होती. त्यात कंपनी सरकारने बराच हस्तक्षेप केला होता. त्यामुळे इंग्रज रिजंटच्या मनानुसार वागणे त्यांना भाग होते.

हेन्री बार्टल जेव्हा साताऱ्याचा रीजेन्ट बनला तेव्हा फक्त ऑफिसवर्क एवढच त्याच कार्यक्षेत्र उरल नव्हत. आपल्या हिरोप्रमाणे म्हणजे एल्फिन्स्टनप्रमाणे वर्षोनुवर्षे आठवण काढतील असं काम करून दाखवायचं त्याच्या डोक्यात होतं. सातारा शहराचा कायपालट त्याने केला. अवघ्या संस्थानात त्याने अनेक दौरे काढले.

एकदा विजापूर संस्थानाला भेट देण्यासाठी तो गेला होता. त्याच्याबरोबर त्याचा अख्खा लवाजमा देखील गेला होता. त्याची फमिलीही होती. यात त्याची छोटी मुलगी देखील होती. तीच नाव मेरी. या मेरीचा सांभाळ करायला एक अॅना नावाची मराठी आया होती. अॅनाने सांगितलेल्या आठवणी, मराठी लोककथा मेरीने old deccan days या जगप्रसिद्ध पुस्तकात लिहिलेल्या आहेत. याच पुस्तकात ती विजापूर भेटीची एक आठवण सांगते ,

“धारवाडपासून पुढे आम्ही जेव्हा कृष्णा नदी पार केली तो खरच कठीण प्रसंग होता. हत्ती, घोडे, उंट, खेचरं, बैल, गाई हे प्राणी नदीतून पोहत चालले होते. बंद डब्यांच्या आणि फुगवलेल्या कातडी पिशव्यांवर बांधलेल्या तराफ्यांवर आमचं सगळं कॅम्पच समान ठेवण्यात आलं होतं. एका गोलाकार सध्या होडीत मी, माझे वडील आणि त्यांचे दोन अधिकारी बसले होते. जसे प्राणी पोहत गेले तशीच सहाशेपैकी उरलेली सर्व माणसे पोहून गेली असावीत.”

सर हेन्री बार्टल फ्रेअर यांच्यावर मुलीच्या जीवावर बेतले या प्रसंगामुळे बराच मोठा परिणाम झाला. त्यांनी ठरवलं की कृष्णा नदीवर पूल बांधायचे.

यापूर्वी कृष्णा नदीवर पूलचं नव्हते. शिवरायांसारख्या दूरदृष्टीच्या राजांनी पूल बांधलेले मात्र त्याकाळात आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे मोठे पात्र असणाऱ्या नद्यांवर पूल बांधणे शक्य झाले नव्हते.

पेशवाईत तर कृष्णा ही पवित्र नदी असल्यामुळे तिच्यावर पूल बांधू नये असं म्हटल जाई.

फ्रेअरने साताऱ्यात आल्या आल्या हुकुम काढले. कृष्णेवर ब्रिटीश पद्धतीचे पूल बांधायचे. दरबारातला सिव्हील इंजिनियर स्मिथ याची नेमणूक या कामावर केली. त्याने सातारा महाबळेश्वर दरम्यान रस्ता बांधला, भलं मोठं पात्र असणाऱ्या कृष्णेवर पूल उभारले.

असं म्हणतात की फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात मोठ्या नदीवर बांधले गेलेले हे पहिले पूल होते. पण सुरवातीला वाई सारख्या छोट्या गावातले काही कर्मठ लोक या पुलावरून पवित्र कृष्णामाईला ओलांडताना आपल्या वहाणा उचलून हातात घ्यायचे.

पण काही वर्षांनी हळूहळू चित्र पालटत गेलं. या पुलांमुळे बऱ्याच जणांचं अवघ जीवनमान बदलून गेलं. पावसाळ्यात उतर जगाशी संपर्क तुटणारी गावे माणसात आली. पुढे भारतभर ब्रिटीशांनी बरेच पूल बांधले. शंभर दीडशे वर्षे झाली यापैकी अनेक पूल आजही मजबूत आणि सुस्थितीत आहेत. तरीही इंग्लंडहून पत्र येत असतात की या पुलांचे आयुष्यमान संपले असून त्यांची डागडुजी तरी करा अथवा याला पर्यायी पूल उभा करा. पण आपलीच लोकं याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे पुलांचे अपघात होतात.

सातारा संस्थानच्या प्रगतीमध्ये सर बार्टल फ्रेअर यांच्या कारकीर्दचं मोठं योगदान आहे. त्यांनीचं सातारामध्ये नगरपालिका सुरु केल्या. रहिमतपूर ही भारतातल्याचं नाही तर आशिया खंडातल्या पहिल्या नगरपालिकापैकी एक आहे, पुणे सातारा रोड तिथले बोगदे या सगळ्याच क्रेडीट या एका माणसाला आहे.

पुढे काही वर्षांनी कंपनी सरकारचं राज्य जाऊन इंग्लंडच्या राणीचं राज्य आलं तेव्हा व्हाईसरॉयचा सल्लागार म्हणून फ्रेअर ची नेमणूक झाली. यानंतर लगेचच सर हेन्री बार्टल फ्रेअर मुंबईचे गव्हर्नर बनले. मुंबई शहराची तटबंदी मोडून शहराला मोकळा श्वास घेण्याची संधी दिली. त्यांच्याच काळात पुण्यात डेक्कन कॉलेजची स्थापना झाली. त्यांच्याच काळात सीओईपी हे भारतातलं दुसर इंजिनियरिंग कॉलेज सुरु झालं.

खऱ्या अर्थाने लॉर्ड माउंट स्टूअर्ट एल्फिन्स्टनचा तो वारसदार बनला. तो ब्रिटीश सत्तेचा प्रामाणिक सेवक होताच पण त्याने भारतीय जनतेसाठी जी कामे केली तीचे परिणाम आजही आपण अनुभवतो आहोत. जर हेन्री बार्टल फ्रेअर सारखा अधिकारी साताऱ्यात आला नसता तर आज पश्चिम महाराष्ट्राचा विकास जसा दिसतोय तो दिसला नसता हे नक्की.

आज या सर बार्टल फ्रेअरचा पुतळा लंडन मध्ये दिमाखात उभा आहे मात्र महाराष्ट्रात त्याचं नाव देखील आपल्याला ऐकून माहित नसते हे दुर्दैव मानलं पाहिजे.

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. Vivek Date says

    I am happy to read this. Someone is writing about the contribution of British to the develepment of Satara region of Maharashtra

  2. डी.डी. पाटील says

    संदर्भ दिले, काही पुस्तकांची नावे दिली तर फार छान होईल. बघा पटतंय का.

  3. Ajit yele says

    Bhidu plz write on fergusson college Pune

Leave A Reply

Your email address will not be published.