हा आहे, “महार रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास..”
देशाच्या संरक्षणात अतुलनीय शौर्य दाखवलेल्या ‘महार रेजिमेंट’मधील सैनिकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून आज त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम मुंबईच्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे सध्या पार पडतोय.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला,
अशा प्रकारे ‘महार रेजिमेंट’चा सन्मान करणारं महाराष्ट्र शासन हे देशातलं पहिलंच राज्य सरकार ठरलं आहे.
महार रेजिमेंटचा स्थापना दिन १ ऑक्टोबर रोजीच पार पडला. शिवाय १९४१ सालची स्थापना असलेल्या महार रेजिमेंटला २०१६ सालीच ७५ वर्षे पूर्ण झाली. असं असतानाही रेजिमेंटच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून या कार्यकमाचं आयोजन करण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलाय.
आज हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे गेल्या वर्षीच्या भीमा कोरेगाव प्रकरणानंतर सरकारवर नाराज असलेल्या दलितांना खुश करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असल्याचं राजकीय अभ्यासकांकडून सांगण्यात येतंय.
महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणून घेऊयात महार रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहासाविषयी…
‘महार रेजिमेंट’ देशातली अशी एकमेव रेजिमेंट आहे, ज्यामध्ये देशातल्या सगळ्या भागातल्या वेगवेगळ्या समुदायातील सैनिकांचा समावेश आहे. रेजिमेंटचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आहे, परंतु भारतीय सेनेमध्ये या रेजिमेंटचा समावेश १ ऑक्टोबर १९४१ रोजी करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य झाल्यानंतर या रेजिमेंटच्या भारतीय सैन्यातील समावेशासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.
या रेजिमेंटने देशाला अनेक शूर-वीर सैनिक दिले ज्यांनी युद्धभूमीवर मायभूमीसाठी प्राणार्पण केले. अनेक युद्ध जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली. भारताचे २ सेनाध्यक्ष के.व्ही. कृष्ण राव आणि कृष्णास्वामी सुंदरजी हे महार रेजिमेंटमधूनच आले होते.
१९६२ सालचं चीनविरोधातील युद्ध असेल, १९७१ सालची पाकिस्तानविरुद्धची लढाई असेल किंवा १९८७ साली राजीव गांधींनी श्रीलंकेत पाठविलेली शांतीसेना असेल या प्रत्येक वेळी महार रेजिमेंटमधील सैनिकांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि शौर्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनेक पुरस्कारांवर आपली मोहर देखील उमटविली.
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज-मराठा युद्धात इंग्रजांकडून लढताना १ जानेवारी १८१८ रोजी महार रेजिमेंटच्या ५०० सैनिकांनी पेशव्यांच्या २५०० सैनिकांच्या फौजेचा पराभव केला होता. महार रेजिमेंट त्यावेळी इस्ट इंडिया कंपनीकडून लढत होती. पेशव्याच्या विरोधातील हा विजय ही महार रेजिमेंटच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली घटना समजली जाते.
या युद्धातील सैनिकांच्या शौर्याच्या स्मृतीप्रित्यर्थ ईस्ट इंडिया कंपनीने भीमा कोरेगाव येथे युद्ध स्मारक उभारलं. या स्मारकावर सैन्यात इंग्रजांकडून शहीद झालेल्या ४९ सैनिकांची नावे कोरण्यात आली. ज्यात २२ महार सैनिकांचा समावेश होता.
१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार सैनिकांच्या शौर्याचं प्रतिक असलेल्या भीमा कोरेगाव येथील जय स्तंभाचं दर्शन घेतलं होतं. तेव्हाचपासून दलित समुदाय १ जानेवारी हा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो.
‘महार रेजिमेंट’ पेशव्यांच्या विरोधात इंग्रजांच्या बाजूने का लढली…?
अठराव्या शतकाचा तो काळ. देशातील बहुतांश ठिकाणी दलितांवर अनन्वित अत्याचार करण्यात येत असत. अस्पृश्य म्हणून त्यांना वाळीत टाकलेलं होतं. दलितांवर केल्या जाणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’मध्ये सविस्तरपणे लिहिलंय.
मराठा साम्राज्याची सूत्रे पेशव्यांच्या हातात असताना पेशव्यांनी दलितांविरोधात ‘मार्शल लॉ’ लागू केला होता. या कायद्यान्वये महारांना कमरेत झाडू आणि गळ्यात मटका बांधण्याचे आदेश देण्यात आले होते. महार ज्यावेळी रस्त्यावरून जातील, त्यावेळी त्यांच्या पाऊलखुणा देखील झाडल्या जाव्यात म्हणून झाडू आणि त्यांची थुंकी सुद्धा जमिनीवर पडू नये म्हणून गळ्यात मटका असं प्रचंड चीड आणणारं हे चित्र होतं. दलितांना पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणूक देण्याच्या कर्मठ मानसिकतेतून हा कायदा लागू करण्यात आला होता.
साहजिकच या अन्यायाविरोधात लढण्यासाठी महार सैनिक तयार होते. इंग्रजांनी पेशव्यांच्या विरोधातील लढाईत या सैनिकांना आपल्या बाजूला घेतलं होतं. त्यामुळेच १ जानेवारी १८१८ साली झालेल्या इंग्रज-मराठा युद्धात महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले. या युद्धात पेशव्यांचा पराभव झाला.
भीमा-कोरेगाव येथे झालेल्या घनघोर लढाईत इंग्रजांनी पेशव्यांवर मिळवलेल्या विजयात महार सैनिकांची अतिशय महत्वपूर्ण भूमिका होती. इतिहासकार या घटनेकडे दलितांनी आपल्या आत्मसन्मानाच्या लढाईत केलेल्या कर्मठ मानसिकतेच्या लोकांचा पराभवाचं प्रतिक म्हणूनही बघतात.
हे ही वाच भिडू.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने प्रयत्न केलेले ?
- दलित समाजाला शासक बनवायचय : चंद्रशेखर आझाद
- लोहियांनी खासदार बनवलेला नेता, रेल्वेच्या फरशीवर बसून दिल्लीत पोहोचला !
- ‘बलुतं’ उपेक्षिलेल्या जगाचा प्रतिनायक !