चेन्नई, मुंबई, दिल्लीला नाही जमलं, ते गुजरातनं या साध्या गोष्टींमुळं करुन दाखवलं…

आयपीएलचा पंधरावा सिझन सुरु होऊन बरोबर दोन महिने होत आले. जाहिरात लागली की चॅनेल बदलणाऱ्या आपल्याकडच्या प्रेक्षकांना टीव्हीसमोर दोन महिने खिळवून ठेवणं ही काय सोपी गोष्ट नाही. ही ताकद ‘सास-बहू ड्रामा’ नंतर कुणामध्ये असेल, तर क्रिकेटमध्ये आणि त्यातही विशेषत: आयपीएलमध्ये.

गेली १४ वर्ष जे जमलं ते यंदा १५ व्या वर्षी जमणार नाही असा अनेकांचा अंदाज होता, कारण सुरुवातीला टीआरपी गंडलेला, बऱ्याच हुकमाच्या प्लेअर्सच्या टीम्स चेंज झालेल्या; त्यामुळे फुल ‘रीश्तो के भी रुप बदलते है’ वाला फील आला. त्यात मुंबई, चेन्नई प्लेऑफच्या रेसमधून बाहेर गेल्या.

पण तरीही आयपीएलचा ‘माहौल’ बनलाच. ज्याला कारणीभूत ठरली गुजरात टायटन्स.

हा गुजरातचा पहिलाच सिझन, त्यात नवा कॅप्टन, बरेच यंगस्टर्स टीममध्ये होते. तरीही गुजरातनं मॅच जिंकण्याचा सिलसिला कायम ठेवला, आधी गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये जाणारी पहिली टीम ठरली आणि नंतर फायनल गाठणारीही पहिली टीम.

पण जे यंदा मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली या बड्या टीम्सला जमलं नाही, ते गुजरातनं कसं जमवलं? त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये १० मॅचेस कशा काय मारल्या? तर कारणं एकदम साधी आहेत.

कारण क्रमांक एक- टॉस फॅक्टर

गेल्या काही वर्षातल्या आयपीएलमध्ये एक गोष्ट सातत्यानं बघायला मिळतेय, ती म्हणजे जी टीम दुसरी बॅटिंग करते, तिनं मॅच जिंकायची शक्यता जास्त असते. कारण ग्राऊंडवर दव पडलेलं असतं, बॉलर्सला बॉल ग्रीप करणं कठीण जातं… त्यामुळे बऱ्याचदा चेस करणं सोपं असतं.

गुजरातनं मात्र एक वेगळी खेळी करुन पाहिली, त्यांनी अनेकदा टॉस जिंकल्यावरही पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर एकदा कॅप्टन हार्दिक पंड्याला विचारणा झाली होती, तेव्हा तो म्हणाला होता, “समजा आम्ही प्लेऑफपर्यंत धडकी मारली आणि तिथं आम्हाला पहिली बॅटिंग करायला लागली, तर आमची तयारी असायला हवी. म्हणून लीग स्टेजमध्ये ट्राय करतोय.”

क्वालिफायरमध्ये हार्दिकनं टॉस जिंकला आणि पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. चेस करण्याचा फायदा झाला आणि त्यांनी १८९ रन्सचं आव्हान पार केलं. जेव्हा शक्य होतं, तेव्हा त्यांनी रिस्क घेऊन पाहिली आणि प्लेऑफमध्ये नशिबानं त्यांना साथ दिलीच.

कारण क्रमांक दोन- कोचिंग पॅटर्न

भारतानं २०११ चा वर्ल्डकप जिंकला, त्याचं बरंचसं श्रेय आजही भारताच्या कोचेसला दिलं जातं. गुजरातच्या बाबतीतही हाच विषय आहे. कुठलीही गोष्ट जास्त फॅन्सी किंवा वाढीव न करता, आशिष नेहरा, गॅरी कर्स्टन यांनी गोष्टी सिम्पल ठेवल्या. बाकीचे कोचेस लॅपटॉप वैगेरे घेऊन खुंखार काम करायचे तेव्हा नेहराजी हातात एक कागद आणि पेन घेऊन निवांत असायचे. कर्स्टन तर फार पडद्यापुढं यायचाही नाही, त्यांनी ना जास्त प्रयोग केले, ना ऐनवेळेस काही बदल केले… कोचिंग स्टाफच्या या पॅटर्नचं फळ त्यांना कुणी मिळवून दिलं असेल, तर प्लेअर्सनी.

कारण क्रमांक तीन- पंड्या 2.0

हार्दिक पंड्याची एक इमेज कित्येक चाहत्यांच्या डोक्यात फिट बसली होती, ती म्हणजे ‘बदनाम गली का बेताज बादशहा.’ कित्येक जणांनी पांड्याला निकालात काढलं होतं, हा संपलाय असं म्हणलं जात होतं. त्यात मुंबईनं पंड्याला रिलीझ केलं, पण गुजरात टायटन्सनं त्याला थेट कॅप्टन केलं. पंड्या बॉलिंग टाकेल का यावर प्रश्नचिन्ह होतंच, त्यात त्याच्या बॅटिंगचंही खरं नव्हतं. पण कधी तीन नंबरला, कधी चार-पाच नंबरला येत, पंड्यानं गुजरातकडून सर्वाधिक ४५३ रन्स केलेत. बॉलिंगमध्येही ५ विकेट्स काढल्यात.

एकदा शमीवर उचकलेलं सोडलं, तर पंड्यानं शांत राहून कारभार केलाय. कॅप्टन म्हणून प्लेअर्सला विश्वास दिलाय आणि खात्रीही. त्याचे डावपेच योग्य ठरलेत आणि निर्णयही.

कारण क्रमांक चार- टीमचं वातावरण

टायटन्सला फायनलपर्यंत नेण्यात सगळ्यात मोठा वाटा होता, डेव्हिड मिलरचा. हाच मिलर ऑक्शनच्या पहिल्या दिवशी अनसोल्ड गेला होता. पण टायटन्सनं त्याच्यावर विश्वास दाखवला. पहिल्या काही मॅचेसमध्ये फेल जाऊनही त्याला प्रत्येक मॅचमध्ये खेळवलं.

मिलर स्वतः म्हणाला, ‘या टीमनं माझ्यावर सर्वात जास्त विश्वास दाखवला.’

टीम प्लेऑफ्समध्ये जाणार हे नक्की झाल्यावर, स्पिनर आर साई किशोरला खेळायची संधी मिळाली. तरीही तो जीव तोडून खेळला. त्यानंही सांगितलं की, ‘या टीममध्ये प्रत्येकाला सेफ वाटतं, टीमसाठी काहीतरी करावं असं वाटतं. मला संधी मिळाली नव्हती तरी डावललं जातंय असं कधी वाटलं नाही.’

इतकं निवांत वातावरण असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, हेड कोच आशिष नेहरा. आपल्या टीमला लेक्चर द्यायचं सोडून, नेहराचं तत्वज्ञान सिम्पल असतं, ‘पोटभर खा. अंघोळ करा आणि निवांत झोपा.’

शेवटचं कारण म्हणजे ‘की प्लेअर्स’-

आत्ताची आकडेवारी बघितली, तर गुजरातच्या प्लेअरकडे पर्पल कॅपही नाही आणि ऑरेंज कॅपही नाही. पण तरी टीम पुढं गेली कारण टीमवर्क. मुंबईनं जेव्हा सलग कप जिंकायचा सपाटा लावला होता, तेव्हा मुंबईच्या जिंकण्याचं कारणही हेच होतं.

गुजरातमध्ये हार्दिक पंड्या नाही चालला, तर डेव्हिड मिलर आहे, शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा आहेत. सगळी टॉप ऑर्डर गंडलीच, तर राहुल तेवातीया आणि राशिद खान मॅच जिंकवून देऊ शकतात.

राशिद खाननं विकेट्स काढल्या नाहीत, तरी तो रन्स देत नाही. क्वालिफायर वनमध्ये राशिदनं एकही सिक्स किंवा फोर दिलेली नाही. ज्या मॅचमध्ये तो बॉलिंगला फेल गेला, त्या मॅचमध्ये त्यानं बॅटिंगनं कसर भरुन काढली. शमी सुद्धा पॉवरप्लेपासून धमाका सुरू करतोय… त्यामुळं प्रत्येकाचं गाणं वाजतंय आणि गुजरातचा दांडिया हिट होतोय.

आता आयपीएलची फायनल होतीये, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर. म्हणजेच गुजरातच्या होम ग्राऊंडवर. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या टीमला फायनलमध्ये हरवणं कुणालाही कठीणच जाणार आहे.

हार्दिकची टीम जिला कुणी प्लेऑफमध्ये जाईल म्हणूनही गिणत नव्हतं, तिची झेप आता फायनलपर्यंत गेलीये आणि विशेष म्हणजे फार कांगावा किंवा मोठी स्टारकास्ट न घेता निवांत राहून, शहाळ्याचं पाणी पिऊन…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.