युद्धखोर चीनचा बदला भारतीय जवानांनी घेतला होता.

१९६२ सालच्या भारत चीन युद्धाच्या कटु आठवणी विसरता येणं शक्य नाही. नुकताच भारत स्वतंत्र झाला होता. हिंदी चिनीचा भाई भाईचा नारा देण्यात आला होता. अशाच काळात अगदी बेसावधपणे चीनने भारतावर आक्रमण करत भारताला युद्धात हरवले होते.  १९६२ च्या युद्धात भारताचे १४०० सैनिक शहिद झाले होते तर १००० सैनिक जखमी झाले होते. अस ते दुर्देवी युद्ध भारतावर लादण्यात आलं होतं.

मात्र त्यानंतर अशी घटना झाली होती की ज्यामुळे चिनी सिमेवर असणाऱ्या सैनिकांची मान गर्वाने ताठ झाली होती. ती घटना भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी गरजेची होती. युद्धपट स्पेशॅलिस्ट असणारे जे.पी. दत्ता याच घटनेवर सिनेमा घेवून येत आहेत.

पाच वर्षातच घेतला होता चीनचा बदला.

घटना १९६७ सालची. सिक्कीमजवळील नथूला फ्रंटवर भारत आणि चीन दरम्यान जोरदार लढाई झाली होती. या लढाईत भारतीय सैन्याने १९६२ मधल्या युद्धाचा बदला घेत जवळपास ४०० पेक्षा अधिक चीनी सैनिकांना यमसदनी पाठवलं होतं. भारताचेही ८८ सैनिक या लढाईत शहीद झाले होते. दोन्ही देशांदरम्यान जबरदस्त लढाई झाल्यानंतर शेवटी चीनी सैन्याला माघार घ्यावी लागली होती.

Ind China War2
Youtube

या लढाईनंतरच सिक्कीमवरील भारताचं वर्चस्व निर्विवादपणे टिकून राहिलं.

१९६७ साली नथूला ही भारत-चीन सीमेवरील शेवटची पोस्ट होती. दोन्ही देशांच्या सीमेच्या दरम्यान फक्त एक दगड होता. त्यावेळी चीनने नथूला पोस्ट हडपण्याचा डाव रचला होता. चीनकडून सिक्कीमवर दावा ठोकण्यात आला होता. भारतीय सैन्याने नथूला फ्रंटवरून माघार घ्यावी अन्यथा १९६२ प्रमाणेच हाल करण्यात येतील अशी धमकी चीनकडून भारताला देण्यात आली होती.

चीनच्या धमकीच्या प्रत्युत्तरात भारताने ११ सप्टेबर १९६७ रोजी फ्रंटवर काटेरी कुंपण घालण्यास सुरुवात केली. या गोष्टीचा चीनी सैन्याने विरोध केला. फ्रंटवर दोन्ही देशांमधील सैनिकांच्या दरम्यान बाचाबाची व्हायला सुरुवात झाली. धक्काबुक्कीची घटना देखील झाली. त्यानंतर चीनी सैन्य आपल्या बंकरमध्ये परतलं आणि भारतीय इंजिनिअर्सच्या तुकडीने आपलं कुंपण घालण्याचं काम सुरूच ठेवलं.

बंकरमध्ये परतलेल्या चीनी सैन्याने अचानकच बाहेर येत भारतीय सैन्यावर हल्ला चढवला.

चीनी सैन्याच्या या अचानकपणे झालेल्या हल्ल्याने सुरुवातीला तर भारतीय  सैन्याचं नुकसान झालं परंतु नंतर भारतीय सैन्याने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. या लढाईत भारतीय सैन्याने अद्भुत पराक्रम गाजवला. भारतीय सैन्याच्या पराक्रमापुढे चीनी सैन्याचा टिकाव लागू शकला नाही.

३ दिवस भारताकडून रात्रंदिवस फायरिंग करण्यात आलं. अनेक चीनी बंकर नष्ट करण्यात आले. शेवटी १४ सप्टेंबर रोजी ही लढाई थांबली ज्यात भारताचे ८८ आणि चीनचे ४०० पेक्षा अधिक सैनिक शहीद झाले होते. १५ सप्टेंबर रोजी दोन्ही सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकमेकांच्या शहीद झालेल्या सैनिकांच्या मृतदेहाचं हस्तांतर करण्यात आलं.

त्यानंतर ११ दिवसांनी परत एकदा चीनी सैन्याने भारतीय सैन्यावर हल्ला केला परंतु भारतीय सैन्याने तो परतवून लावत चीनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडलं. या दोन्हीही लढाया भारतीय सैन्याच्या शूरवीरतेची साक्ष देणाऱ्या ठरल्या.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.