हसलेल्या बुद्धाची गोष्ट-अर्थात पोखरण अणुचाचणीविषयी सारं काही…!!!

जॉन अब्राहम, डायना पेंटी आणि बोमन इराणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘परमाणु- द स्टोरी ऑफ पोखरण’ हा चित्रपट येत्या २५ मे रोजी रिलीज होतोय. त्यानिमित्ताने एक नजर टाकूयात हा चित्रपट ज्या सत्य घटनेवर आधारित आहे, त्या पोखरण चाचणीवर आणि एकंदरीत भारताच्या अणुउर्जा राष्ट्र म्हणून जगासमोर येण्याच्या प्रवासावर..
भारताने अणुउर्जा निर्मितीच्या दृष्टीने आपले पाऊल टाकण्यास स्वातंत्र्यपूर्व काळातच सुरुवात केली होती. १९४५ सालीच भारतीय अणुउर्जा क्षेत्रातील जनक ज्यांना म्हणता येईल त्या डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या अध्यक्षतेखाली ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ची स्थापना करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ‘होमी भाभा’ यांच्या नेतृत्वाखाली ३ ऑगस्ट १९४८ स्थापलेल्या ‘अणुउर्जा आयोग’ हे त्यादृष्टीने टाकलेलं दुसरं महत्वाचं पाऊल होतं. अणुउर्जेबाबतीत कायमच ‘शांततेसाठी अणुउर्जा’ ही भारताची भूमिका राहिलेली आहे. भारताने अणुबॉम्बची निर्मिती करावी अशी नेहरूंची इच्छा नव्हती, परंतु ते सामर्थ्य आपल्या राष्ट्राकडे असावं असं त्यांचं मत होतं. त्याचदृष्टीने या क्षेत्रातील संशोधनावर मोठ्या प्रमाणात जोर देण्यात आला.

१९६२ च्या चीन विरुद्धच्या युद्धात भारताचा पराभव झाला आणि त्यानंतर भारतात अणुबॉम्ब निर्मितीच्या समर्थनार्थ आवाज उठू लागले. २४ ऑगस्ट १९६२ रोजी भारत १८ महिन्यांमध्ये अणुबॉम्ब बनवू शकतो, अशी घोषणा डॉ. होमी भाभा यांनी केली. परंतु १९६५ साली होमी भाभा याचं निधन झालं त्यामुळे काही काळ हे प्रयत्न थंडावले. १९६८ मध्ये मात्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अणुकार्यक्रम राबवण्यास गुप्तरीत्या परवानगी दिली. १९७२ पर्यंत भारताने यशस्वीरीत्या अणुबॉम्ब बनवला होता. १९७४ साली १८ मे रोजी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी भारताने अणुबॉम्बची पहिली चाचणी घेतली. या ऐतिहासिक घटनेचं वर्णन ‘बुद्ध हसला’ असं करण्यात आलं. ही घटना जगापासून लपवून ठेवण्यात आली. भारताने फक्त अणुचाचणी केलीये, या चाचणीचा अणुबॉम्ब निर्मितीशी काहीही संबंध नाही असं जगभरातील राष्ट्रांना सांगण्यात आलं. यानंतर देखील अणुउर्जेच्या क्षेत्रातील भारताचं संशोधन सुरूच राहिलं.
त्यानंतर यासंदर्भात महत्वाच्या घडामोडी घडल्या त्या पी. व्ही. नरसिंह राव हे देशाचे पंतप्रधान असताना. नरसिंह राव अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब यांच्या चाचण्या करू इच्छित होते पण काही कारणास्तव त्यांना ते शक्य झालं नाही. नरसिंह राव हे परीक्षण का करू शकले नाहीत, यासंदर्भात अभ्यासकांमध्ये मतभेद बघायला मिळतात. काही जणांच्या मते अमेरिकेच्या भारतावरील दबावामुळे नरसिंह रावांना ते शक्य झालं नाही, तर काहींच्या मते शास्त्रज्ञांची तयारी कमी पडल्यामुळे पी.व्ही. नरसिंह राव यांचा नाईलाज झाला आणि इच्छा असूनदेखील ते अणुबॉम्बची चाचणी घेऊ शकले नाहीत. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार सत्तेत आलं.
पी.व्ही. नरसिंह राव यांनी ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे पदभार सोपवला त्यावेळीच त्यांनी अणुबॉम्ब चाचणी करण्याविषयी वाजपेयी यांना सुचवलं होतं.वाजपेयी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री राहिलेल्या जसवंत सिंग यांनी यासंदर्भात ‘एबीपी न्यूज’च्या प्रधानमंत्री या कार्यक्रामात याविषयी सांगितलंय. जसवंत सिंग सांगतात की, पी.व्ही. नरसिंह राव सांकेतिक भाषेत अटल बिहारी वाजपेयींना म्हणाले होते की, “मै नही कर पाया, तुम कर देना” पी.व्ही. नरसिंह राव यांचा हा इशारा अणुबॉम्ब संदर्भातच होता. अणुबॉम्ब चाचणीची तयारी पी.व्ही. नरसिंह राव सरकारच्या शेवटच्या काही दिवसातच पूर्ण झाली होती. त्यामुळेच सत्तेवर आल्यावर दुसऱ्या दिवसानंतरच अणुबॉम्ब चाचणीची घोषणा करताना वाजपेयींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. परंतु, वाजपेयींचं सरकार अवघ्या १३ दिवसात कोसळल्याने त्यावेळी ही चाचणी होऊ शकली नाही. त्यानंतरच्या २ वर्षांच्या काळात देशात अस्थिर सरकार राहिल्याने या चाचणीमध्ये परत अडथळा निर्माण झाला.
मार्च १९९८ साली वाजपेयी पुन्हा सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शास्त्रज्ञांशी झालेल्या बैठकीत अणुचाचणीसाठी तयार राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. ९ एप्रिल १९९८ रोजी झालेल्या बैठकीत पंतप्रधानाच्या आदेशानंतर ३० दिवसांनी अणुचाचणी घेण्यास शास्त्रज्ञ तयार असती, अशी माहिती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पंतप्रधान वाजपेयी यांना दिली. वाजपेयींनी तयारी करण्याचे आदेश देताच अत्यंत गुप्तपणे चाचणीची तयारी सुरु झाली. अमेरिकी सॅटलाईटपासून वाचण्यासाठी बहुतेक काम रात्रीच्या वेळीच करण्यात येत असे. ऑपरेशनच्या तयारीच्या वेळी सर्व शास्त्रज्ञ सैन्य पोशाखात असत. सर्वांनाच वेगवेगळी टोपणनांव देखील देण्यात आली होती. अब्दुल कलमांचं नांव होतं, मेजर जनरल पृथ्वीराज तर अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष आर.चिदंबरम ओळखले जायचे ‘नटराज’ या नावाने.
११ मे १९९८. बुद्धपौर्णिमेचा दिवस. ‘ऑपरेशन शक्ती’. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्वाच्या घटनेचा हा दिवस साक्षीदार झाला. शास्त्रज्ञांच्या टीमने राजस्थानातील पोखरण येथे ३ अणुबॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती देशवासियांना आणि जगाला दिली. २ दिवसांनी म्हणजेच १३ मे रोजी भारताने अजून २ अणुबॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. या अणुचाचणीनंतर हादरलेल्या अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. अमेरिका आणि चीनने संयुक्त राष्ट्रात तसा ठराव देखील संमत करून घेतला.