हृदयविकाराला हरवत मुकेशनं ‘सावन का महिना’ हे गाणं अजरामर केलं…
हिंदी सिनेमाच्या संगीतातील साठच्याच्या दशकातील गाणी त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे अजूनही रसिकांच्या लक्षात आहे. त्या काळात गाणं बनवणं हे ‘टीमवर्क’ होते. गीतकार, संगीतकार, गायक, गायिका , दिग्दर्शक अभिनेता, अभिनेत्री हे सर्व तर एकत्र येऊन मीटिंग अटेंड करत असत. त्यामुळे या सर्वांच्या भावना या गाण्यांमध्ये आपोआप उतरत असत.
अलीकडच्या काळामध्ये डिजिटल रेकॉर्डिंगच्या काळामध्ये हा असला प्रकार राहिलेला नाही. प्रत्येक जण आपल्या वाट्याचा पीस गाऊन जातो किंवा वाजवून जातो आणि नंतर हे सगळे पिसेस एकत्र करून गाणं बनतं. त्यामुळे या गाण्यांना एक कृत्रिमता आलेली असते.
पूर्वीच्या गाण्यांमधील होमोजीनियसपणा नवीन गाण्यांमध्ये औषधालाही सापडत नाही.
त्यामुळेच आज पन्नास – साठ वर्षे उलटून गेली तरी ही गाणी आपल्याला त्यातील म्युझिक पिसेस सहित आठवतात. इतकी ही गाणी आपल्या मनात खोलवर रुजलेली आहेत. या गोल्डन इरा मधील गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या कथा तर थक्क करायला लावतात. परस्परांवरील विश्वास, एकमेकांची घेतलेले काळजी आणि चांगलं असंच काही घडवायचं याचा ध्यास त्यातून अप्रतिम कलाकृती घडत होत्या.
१९६७ साली सुनील दत्त आणि नूतन यांचा ‘मिलन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पुनर्जन्मवर आधारित ‘मिलन’ चित्रपटातील गाणी अतिशय गोड होते. ही गाणी लिहिली होती आनंद बक्षी यांनी आणि त्याला संगीत दिला होता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं ‘सावन का महिना पवन करे सोर जियरा रे झुमे ऐसे जैसे बनवा नाचे मोर’ हे गाणं १९६७ सालच्या बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात या गाण्याने पहिला क्रमांक पटकावला होता.
सावन का महिना गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा खूप भावस्पर्शी असा आहे.
झालं असं होतं या गाण्याच्या रिहर्सल झाल्या. गाणं रेकॉर्ड करायचा दिवस ठरला. पण रेकॉर्डिंग पूर्वी अचानक गायक मुकेश यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही महिने आराम करायला सांगितला. त्यानंतर काही महिन्यांच्या विश्रांती नंतर मुकेश पुन्हा रेकॉर्डिंग साठी फिट झाले.
त्यांच्या आजारापूर्वी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी या गाण्याची जी धून बनवली होती त्यावेळी या गाण्यात लता मंगेशकर आणि मुकेश यांना दोन मोठे आलाप गायचे होते. होते. परंतु आता सिच्युएशन बदलली होती. डॉक्टरांनी मुकेश ला हाय पीचची गाणी गायला बंदी घातली होती. आपली तब्येत सांभाळून गाणी गा असाच सल्ला त्यांना दिला होता.
त्यामुळे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी मुकेश यांच्या साठीचा आलाप काढून टाकला व त्या ठिकाणी म्युझिक पिसेस टाकण्याचा निर्णय घेतला. कुठून तरी ही बातमी मुकेश यांना कळाले त्यांना आधी वाईट वाटले पण संगीतकार आपली काळजी करतात हे ऐकून बरे देखील वाटले.
गाण्याच्या पूर्वी पुन्हा रिहर्सल झाल्या. अर्थातच त्यात मुकेशचा आलाप नव्हता. फक्त लताचा होता. टेक पूर्वी लता आणि मुकेश आपापसात बोलत होते. त्यावेळी मुकेश यांनी लताला सांगितले, “ तू एलपी ला काही सांगू नकोस पण या गाण्यातील आलाप मी घेणारच आहे!” त्यावर लता म्हणाली ,”मुकेश भैय्या तुम्ही असे करू नका.” पण मुकेश आपला भुमिकेवर ठाम होता.
तो लताला असे देखील म्हणाला,” जर माझा आलाप खराब असेल तर आपण तो काढून टाकायला सांगू.” मुकेशच्या हट्ट पुढे लता शांत राहिली. मामला दोघांमध्येच होता. गाण्याचे फायनल रेकॉर्डिंग सुरू झाले. पहिला अंतरा झाला. त्यानंतर लताचा आलाप झाला.
आता दुसरा अंतरा झाला. इथे मुकेशचा आलाप होता. एल पी यांनी म्युझिक पीसेस वाजवण्याकडे इशारा केला. पण त्याच वेळी म्युझिक रूम मधून मुकेश ने आलाप गायला सुरुवात केली. सर्व जण अचंबित झाले. मुकेशने हातानेच चालू ठेवा असे सांगितले.
एल पी चा नाईलाज झाला. आणि मुकेशचा आलाप या गाण्यात आला! एल पी यांनी मुकेश ला विचारले ,”तुम्ही आलाप का घेतला? डॉक्टरांनी तुम्हाला हाय पीचची गाणी गाऊ नका असे सांगितले आहे न?” त्यावर मुकेश जी यांचे उत्तर होते,” मेरी स्वास्थ की वजह से तुम्हारी इतनी सुंदर काम्पोजिशन खराब नही करना चाहता था. आलाप के बिना ये गीत अधुरा रहता!”
आज तुम्ही जेव्हा हा मुकेशचा आलाप ऐकता त्यावेळी कुठेही तुम्हाला तो बदसुरा वाटत नाही. मुकेश करीता हि मोठी आत्म विश्वास वाढवणारी घटना होती.
-भिडू धनंजय कुलकर्णी
हे ही वाच भिडू
- राज ठाकरेंच्या सभेत शाहीर साबळेंच्या सिनेमाचा टिझर दाखवला, असे होते शाहीर साबळे..!!!
- राजदीप सरदेसाईंनी अंबानींविरोधात रान उठवलं; अंबानींनी थेट चॅनेलच विकत घेतला