तर लता मंगेशकर हिरॉईन म्हणून राज कपूरच्या अजिंठा पिक्चरमध्ये दिसल्या असत्या

पन्नासच्या दशकाच्या मध्यावर ज्यावेळी ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक के असिफ त्यांच्या ‘मुगल ए आजम’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. त्यावेळी या चित्रपटाच्या सेट्सचा बॉलीवूड मध्ये खूप बोलवाला होता. विशेषतः त्यांनी बनवलेल्या शीश महल ने हिंदी सिनेमाच्या प्रोडक्शनच्या कक्षा रुंदावल्या होत्या. 

अख्ख बॉलीवूड ‘मुगल ए आजम’चा सेट पाहण्या साठी तिकडे लोटत होते.

राजकपूर यांना देखील हा सेट खूप आवडला होता. हा सेट पाहून आपण देखील एखादा ऐतिहासिक चित्रपट बनवावा असे त्यांच्या मनात आले. त्यासाठी त्यांनी आपले छायाचित्रकार राघू-कर्माकार यांना खास विदेशात चित्रपटाच्या छायाचित्रणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले.

आर के कॅम्पस मध्ये त्यावेळी या चित्रपटावर चर्चा सुरू झाली. गुप्तकालीन ऐतिहासिक कालखंडातील कथानकावर एका चित्रपटाची प्राथमिक तयारी सुरू झाली. या चित्रपटाचे नाव ठरले ‘अजिंठा’. यासाठी कला दिग्दर्शक एम आर आचरेकर यांनी अनेक छोटे-छोटे मॉडेल्स करून राज कपूर यांना दाखवले. राजकपूर यांना ते मॉडेल्स खूपच आवडले आणि त्यांनी त्यावर चित्रपट निर्मिती करायचे तयारी दाखवली.

हे सर्व काही घडत होते पण ऐन वेळी याच काळात देशात विनोबा भावे यांच्या ‘डाकूंचे पुनर्वसन’ हा चर्चेचा विषय होता. राज कपूर या विषयापासून स्वत:ला अलिप्त ठेवू शकले नाही. याच काळात दिलीपकुमार ‘गंगा जमना’, सुनील दत्त’मुझे जिने दो’ हे डाकू पट बनवत होते. 

देशात दरोडेखोरांना पुन्हा समाज प्रवाहात आणण्याचा प्रवाह सुरू झाला होता.

यावेळी राज कपूर यांना अर्जुन देव रश्क यांनी एक कथा ऐकवली. राज कपूर या कथानकाने खूपच प्रभावित झाले आणि ‘अजिंठा’ या चित्रपटाचा विषय बाजूला ठेवून त्यांनी ‘जिस देश मे गंगा बहती है’ या चित्रपटाला प्रारंभ केला. ‘अजिंठा’ सारखा ऐतिहासिक विषय मात्र मागे पडला. राज कपूर ने जर या विषयावर चित्रपट बनवला असता तर नक्कीच अप्रतिम बनला असता.

याच काळामध्ये राजकपूर कॅम्पस मधून लेख टंडन बाहेर पडले आणि ते एफ सी मेहरा यांच्याकडे गेले. त्यांच्यासोबत काही वर्षानी त्यांनी एक चित्रपट अप्रतिम चित्रपट बनवला ‘आम्रपाली’. १९६६ साली आलेल्या या चित्रपटामध्ये सुनील दत्त, वैजयंतीमाला यांच्या भूमिका होत्या.

बौध्दकालीन वातावरण, तिथली युद्धानंतर होणारी परिस्थिती, तिथला व्यापक नरसंहार आणि यावरील गौतम बुद्धांनी केलेले भाष्य! या सिनेमातील डान्स करीता वैजयंतीमाला ने खूप मेहनत घेतली होती. या सिनेमाच्या कॉस्चुम डिझायनर भानू अथय्या होत्या तर कोरियोग्राफी करीता गोपी कृष्ण यांच्या सहायक म्हणून सरोज खान होत्या. 

‘आम्रपाली’ या चित्रपटाला शंकर जयकिशन यांचे संगीत होते. तर गाणी शैलेंद्र आणि हसरत यांनी लिहिली होती. ‘जाओ रे जोगी तुम जाओरे’,’तुम्हे याद करते करते गुजरेगी रैन सारी’’,’नील गगन की छाव में’,’तडप ये दिन रात की’,’’नाचो गाओ धूम मचाओ’. या सिनेमा साठी सर्वानी अफाट मेहनत घेतली.

भानू अथय्या यानी स्वत:हा अजिंठा लेण्याना भेट देवून नायिकेचे कॉस्चुम डिझायन केले.

यातील ‘तडप ये दिन रात की’ हे गाणे डिजिटली कट करून २००७ सालच्या ‘ओम शांती ओम’ या सिनेमात घेतले आहे. ज्यात सुनील दत्त आणि दीपिका पदुकोने एकत्र नृत्य करताना ‘धूम ताना’ या गाण्यात दिसतात.

काही सिने अभ्यासकांचे म्हणणे असे आहे राजकपूर जो ‘अजिंठा’ चित्रपट बनवणार होते; त्याचे कथानक देखील याच प्रकारचे होते. खरे खोटे राजकपूरच जाणे! परंतु राजकपूर यांच्या हातून हा ऐतिहासिक विषयावरील चित्रपट बनला नाही हेच खरे.

काहींच्या मते ‘अजिंठा’ चा विषय राज कपूर यांच्या डोक्यातून जातच नव्हता सत्तरच्या दशकात ज्या वेळी त्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट बनवला त्यावेळी सुद्धा त्यांच्या डोक्यात सुरुवातीला हाच विषय होता. 

पन्नासच्या दशकात ‘अजिंठा’ या चित्रपटात लता मंगेशकर यांना नायिका म्हणून पडद्यावर त्यांना हा चित्रपट बनवायचा होता. अशी देखील दंतकथा त्या काळातील मिडीयात ‘मशहूर’ झाली होती! खरं खोटं राज च जाणे! आपण फक्त त्या गोल्डन इराच्या आठवणीत रमून जायचं!

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.