सगळा देश क्रिकेटच्या मागं धावत असताना, ओडिशानं हॉकीला सोन्याचे दिवस आणलेत…

भारताच्या कुठल्याही खेळाची टीम घ्या, जर्सीवर स्पॉन्सर म्हणून एखाद्या मोठ्या कंपनीचं नाव झळकत असतं. बरं देशाच्या राहूद्या, साध्या आयपीएलच्या टीम बघितल्या तरी भरमसाठ जाहिराती दिसतात. याला अपवाद कोण असेल तर भारताची हॉकी टीम. महिलांच्या आणि पुरुषांच्या टीमवर मोठ्या दिमाखात एक लोगो झळकत असतो,

ODISHA

भारतीय हॉकी टीम्सला कुठली मोठी कंपनी नाही, तर ओडिशाचं राज्य सरकार स्पॉनर करतं. पण फक्त टीमला स्पॉन्सर करुन ओडिशा सरकार थांबत नाही, तर मागच्या ५ वर्षात तिथं २ वर्ल्डकप होतायत, प्लेअर्ससाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभ्या राहिल्यात आणि महत्त्वाचं म्हणजे ओडिशात जगातलं सगळ्यात मोठं हॉकी स्टेडियमही उभं राहिलंय.

पण ओडिशानं भारताचं हॉकी हब बनण्यापर्यंत मजल कशी मारली ? हे पाहण्यासारखं आहे.

नवीन पटनाईक यांनी २००० साली मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली, आपल्या शालेय दिवसांमध्ये हॉकीत गोलकिपर असणाऱ्या पटनाईक यांनी महत्त्वाच्या पदावर आल्यानंतरही आपलं खेळावरचं प्रेम कायम ठेवलं. २००३ मध्ये त्यांची भेट झाली भारताचा माजी हॉकी कॅप्टन आणि सध्याचा हॉकी प्रेसिडेंट दिलीप तिर्की सोबत.

तेव्हा दिलीपनं भुवनेश्वरमध्ये खेळाडूंसाठी ऍस्ट्रो टर्फ असावं अशी मागणी केली होती, तेव्हा पटनाईक यांनी २ कोटी रुपये मंजूर केले. पण प्रत्यक्षात २४ कोटी रुपये खर्च करुन टर्फ बांधण्यात आलं.

ओडिशामध्ये हॉकीतल्या टॅलेंटची कमी पहिल्यापासूनच नव्हती, भारताच्या महिला आणि पुरुष संघाच्या कर्णधारपदी एकाचवेळी ओडिशाचे खेळाडू होते. इतर राज्यांमधले मिळून जितके प्लेअर्स नाहीत, तितके एकट्या ओडिशामधून पुढं आले. पण फक्त ओडिशातच नाही तर देशातही हॉकीला फार प्रोत्साहन दिलं जात नव्हतं ही देखील वस्तुस्थिती होती.

पण ही परिस्थिती सुधारण्यासाठी पहिली पावलं उचलली ती ओडिशानंच.

२०१३ मध्ये आयपीएल, आयएसएलसारखी हॉकी इंडिया लीग सुरु झाली, त्यावेळी ओडिशा सरकारनं या लीगमध्ये कलिना लान्सर्स नावाची टीम घेतली. या लीगमुळं हॉकीला ग्लॅमर तर मिळालंच, पण ओडिशा आणि देशातल्या कित्येक प्लेअर्सला यामुळं संधी आणि पैसा दोन्ही मिळालं.

त्याहीपेक्षा मोठं पाऊल ओडिशा सरकारनं उचललं, २०१८ मध्ये. हॉकी टीमची स्पॉनर होती, सहारा कंपनी. मात्र सहाराचं आर्थिक गणित बिघडलं आणि त्यांनी स्पॉन्सरशिप काढून घेतली.

या अडचणीच्या वेळी ओडिशा सरकार पुढं आलं. त्यांनी २०१८ मध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि वयोगटाच्या संघाला स्पॉन्सरशिप दिली. यासाठी त्यांनी १५० कोटी रुपयेही खर्च केले.

त्यानंतर राज्यात त्यांनी स्टेडियम बांधलं आणि तिथं इंटरनॅशनल, नॅशनल मॅचेस, वेगवेगळे कप आणि सिरीज यांचे सामने होत राहतील याकडे लक्ष दिलं. यामुळं आधीच लोकप्रिय असलेल्या हॉकीला ओडिशात आणखी प्रोत्साहन मिळालं. पटनाईक यांनी प्रत्येक जिल्ह्यात मिनी हॉकी स्टेडियम उभारण्याची घोषणा केली. सोबतच १७ ऑगस्ट २०२१ ला ओडिशा सरकार पुढची १० वर्ष भारतीय हॉकीला स्पॉन्सर करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

या सगळ्याचं फळ हॉकीच्या टीमला मैदानातही मिळत होतं, कधीकाळी हॉकीमध्ये सलग गोल्ड मेडल मारणाऱ्या या टीमला ऑलिम्पिकमध्ये यश मिळत नव्हतं. हेच २०२१ ला झालेल्या टोकियो ऑलिंपिक्समध्ये भारताच्या पुरुषांच्या टीमनं ब्रॉन्झ मेडल जिंकलं, तर महिलांना थोडक्यात चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

२०१८ मध्ये ओडिशानं हॉकी वर्ल्डकप होस्ट केला, या वर्ल्डकपमुळं चांगल्या दर्जाच्या सुविधा तर उभ्या राहिल्याच पण ओडिशामध्ये परकीय गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर आली. जर बजेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर, ओडिशानं २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात ४०५ कोटी रुपयांचं बजेट क्रीडा विभागासाठी जाहीर केलं होतं, तर २०२२-२३ या वर्षासाठी त्यांचं क्रीडा विभागाचं बजेट एकूण ९११ कोटी रुपये इतकं आहे. यातले ७१९ कोटी रुपये क्रीडा आणि युवा विभागाला आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीला देण्यात आले आहेत, क्रीडा शिक्षणाला ११५ कोटी, खेलो इंडियासाठी ११ कोटी आणि प्रशासकीय कामांसाठी ५९ कोटी रुपयांची तरतूद या बजेटमधून करण्यात आली आहे.

आता मागच्या वर्ल्डकपचं बघायचं झालं तर,

ओडिशा सरकारनं जगातलं सगळ्यात मोठं हॉकी स्टेडियम राउरकेला मध्ये बांधलं. यामुळं भुवनेश्वर आणि राउरकेला अशा दोन स्टेडियम्सनं हॉकी वर्ल्डकप होस्ट केला. या स्टेडियमला बिरसा मुंडा यांचं नाव देण्यात आलं, ज्यात तब्बल २० हजार प्रेक्षकांची बसायची सोय आहे. विशेष म्हणजे हॉकी वर्ल्डकप होस्ट करायला २ शहरं असावीत अशी अट समोर आल्यानंतर जवळपास वर्षभरात हे टॉप क्वालिटी स्टेडियम उभं राहिलं.

यापलीकडे जाऊन बघायचं झालं, तर या दोन्ही वर्ल्डकपमुळे ओडिशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही झाली. ‘मेक इन ओडिशा’ या स्कीम अंतर्गत कित्येकांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या, तर परकीय गुंतवणूकदारांनीही ओडिशाचीच निवड केली.

भारताच्या पुरुष संघाला वर्ल्डकपमध्ये पराभव स्वीकारावा लागला असला, तरी एशियन गेम्समध्ये मात्र टीमनं गोल्ड मेडल मिळवलंय. विशेष म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये हॉकीत सॉफ्ट पॉवर असणारं ओडिशा आता पॉवरहाऊस झालंय. इथून पुढं भारताला हॉकीमध्ये जे यश मिळेल, त्याचं श्रेय अर्थातच हॉकीला सोन्याचे दिवस आणणाऱ्या ओडिशालाच दिलं जाईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.