कोल्हापुरातल्या एका गावाला हॉकीची पंढरी म्हंटल जातंय…!

चक दे इंडिया म्हंटल कि डोळ्यासमोर आपसूकच येते महिला हॉकीची टीम आणि त्या पिक्चर मधले  डायलॉग..एकदम आयकॉनिक डायलॉग…त्यातलाच एक खूपच फेमस आहे.

हर टीम में सिर्फ एक ही गुंडा हो सकता  है…और इस टीम का गुंड में हुं!

अगदी त्याचप्रमाणं,

अख्या भारतात हॉकी विश्वाची एकच पंढरी असू शकते. आणि ती आहे आपल्या कोल्हापुरात..अहो कोल्हापुरातल्या नूल गावात..

कोल्हापुरातल्या नूलच्या इंदिरादेवी जाधव इंग्लिश स्कूलन भारताच्या हॉकीला आजवर तगड्या खेळाडूंची रसद पुरवण्याचे काम गेल्या अनेक दशकांपासून केलंय.

आजच्या घडीला दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय महिला हॉकी संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करत पहिल्यांदाच ग्रुप स्टेजमधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम केला. पण पदक मिळवण्यात महिला हॉकी संघ अपयशी ठरला. तर दुसरीकडे ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचत कांस्य पदक पटकावले.

आणि अशाच हॉकीपटूंची रसद देश पातळीवर पोहचवण्याचं काम कोल्हापूरच्या नूल गावातल्या इंदिरादेवी जाधव इंग्लिश स्कूलने केलंय. हे आत्ताच नाही बरं का…खूप पूर्वीपासूनच, म्हणजे १९७७ सालापासुनच..

हे नूल चंदगड तालुक्यात आहे. त्या गावात इंदिरादेवी जाधव इंग्लिश स्कूल नावाची शाळा आहे. या गावातला जो विद्यार्थी त्या शाळेत जातो त्या त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात या शाळेने हॉकी स्टिक दिली आहे. आणि अजूनही ही देत आहे. घरटी हॉकीपटू आहे या गावात .

तुम्ही जर नूल गावात शाळेच्या सिजनमध्ये एंट्री केली ना, तर तुम्हाला हमखास पोर हॉकी खेळताना दिसणार.

हे दृश्य बघण्यासाठी तुमची गावात एंट्री झाली कि लागलीच उजव्या हाताला बघायचं हां. भल्या मोठया क्रीडांगणावर एवढी एवढीशी पोरं हातात हॉकी स्टीक घेवून चेंडू टोलवताना दिसतील. या दृश्याचं श्रेय या शाळेला हमखास दिल जात. सन १९७७ साली माजी क्रीडा शिक्षक एस. आर. जाधव यांनी हॉकीचा पाया घातला. आता त्या काळात हॉकी हा महागडा खेळ होता. पण या शिक्षण प्रसारक मंडळाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अर्थसाहाय्य करून हा खेळ जिवंत ठेवण्याचे काम केले आहे.

जाधव सरांच्या नंतर सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक बी. बी. तराळ, कै.डी. एस. चव्हाण, विद्यमान क्रीडाशिक्षक आर. ए. चौगुले, एम. पी. मांगले, अनिकेत मोरे तसेच काही माजी खेळाडूंनी हॉकीची परंपरा अखंडित राखली आहे.

मागच्या त्रेचाळीस वर्षात या शाळेने ५०० पेक्षा जास्त राष्ट्रीय हॉकी खेळाडू निर्माण केले. दरवर्षी  ८ ते १० खेळाडूंची तर महाराष्ट्राच्या संघात निवड ठरलेलीच असते. आत्तापर्यन्त शाळेच्या दहा ते बारा खेळाडूंची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झालीय.

शाळेचा हॉकीचा इतिहास पाहून भारतीय खेल प्राधिकरणाने मिनी खेलो इंडिया सेंटर शाळेला मंजूर केलयं. त्या मिनी खेलो इंडिया सेंटरच्या माध्यमातून तज्ज्ञ प्रशिक्षक, क्रीडा साहित्य, क्रीडांगण देखभाल दुरुस्ती इत्यादी सुविधा खेळाडूंना उपलब्ध होतंय.

देशांतर्गत हॉकी खेळात प्रतिष्ठेचा मानला जाणारा जवाहरलाल नेहरु चषक १९८४, २००३, २०१२ असा तीनवेळा आपल्या नावावर करण्याचा विक्रम पण याच शाळेचा. आता सांगा मग, का बरं म्हणू नये या गावाला हॉकीची पंढरी..

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.