अंपायर्सच्या चुकीमुळे भारत हरल्यावरही सविता भक्कम राहिली, कारण तिच्या कष्टाची गोष्ट भारी आहे

सोशल मीडियावर सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हॉकी मॅचची चर्चा सुरू आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये झालेल्या महिलांच्या हॉकी सेमीफायनलमध्ये या दोन टीम्स भिडल्या. मॅच अगदी अटीतटीची झाली, रिझल्टसाठी पार पेनल्टी शूटआऊटमध्ये जावं लागलं आणि तिथं भारताचा पराभव झाला, सगळ्या मॅचमध्ये जीव तोडून खेळलेल्या भारतीय पोरी हरल्या.

आणि या पराभवाचं मुख्य कारण ठरलं अंपायर्सकडून झालेली एक चूक.

झालं असं की, पहिल्याच क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियानं गोल केला. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरपर्यंत भारत पिछाडीवरच होता, अखेर चौथ्या क्वार्टरमध्ये भारतानं बरोबरी साधली आणि फायनल टाइम झाला तेव्हा स्कोअर होता १-१. मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली. ऑस्ट्रेलियाकडून पहिली पेनल्टी घेतली, ती अँब्रोसिया मलोननं.

तिनं काहीशी आक्रमक चाल खेळली, मात्र भारताची कॅप्टन आणि गोलकिपर असलेल्या सविता पुनियानं तिचा हा प्रयत्न मोडून काढला. अगदी टायमिंगला डोकं लावत तिनं गोल होऊ दिला नाही. त्यानंतर लगेचच भारताची स्ट्रायकर लारेमसियामी पेनल्टी घेण्यासाठी आली, मात्र तिला अंपायर्सनं थांबवलं.

कारण मॅच ऑफिशियल्स शॉट क्लॉक सुरू करायला विसरले होते. 

त्यांच्या या चुकीमुळं ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा पेनल्टी बहाल करण्यात आली आणि यावेळी मलोननं कोणतीच चूक नाही केली. पहिल्याच पेनल्टीला असं झाल्यानं भारतीय खेळाडूंची एकाग्रता तर भंगलीच पण आत्मविश्वासही ढासळला. भारताला एकाही पेनल्टीचं रूपांतर गोलमध्ये करता आलं नाही आणि ऑस्ट्रेलियानं ३-० नं मॅच जिंकत फायनल गाठली.

या चुकीनंतर हॉकीच्या ग्लोबल गव्हर्निंग बॉडीनं माफी मागितली, पण तोवर गोल्ड मेडल जिंकण्याची संधी भारताच्या हातून निसटली होती.

या सगळ्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सविता पुनियाच्या डोळ्यात पाणी होतं, तिनं केलेले जवळपास २१ सेव्ह, प्रचंड प्रेशरमध्ये असताना अडवलेली पहिली पेनल्टी, या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरल्या होत्या. मात्र त्याहीवेळेस ती म्हणाली, ‘खेळात अशा गोष्टी घडत असतात, हे पचवणं आमच्यासाठी कठीण आहे, पण हे विसरुन पुढं तर जावंच लागेल.’

भारताची कॅप्टन, जिनं जवळपास २१ गोल अटेम्प्ट सेव्ह केलेत, जिनं अगदी शेवटच्या क्षणी एक पेनल्टी रोखलीये, तिला रडूही कोसळलं पण तरी सविता भक्कम उभी राहिली.

याचं कारण सापडतं तिच्या प्रवासात.

सविता मूळची हरियाणातल्या जोदखनची. तिच्या घरात खेळाची परंपरा वैगेरे काहीच नव्हती. तिचे आजोबा एकदा दिल्लीला गेले होते आणि त्यांनी तिथं हॉकीची मॅच पाहिली, त्यांनी सविताला हॉकी खेळण्याचा आग्रह केला, त्यांच्या शाळेतही हॉकी शिकवलं जात होतं, मात्र फारशा सुविधा नव्हत्या. तरीही सवितानं आपल्या खेळातून नाव आणि संधी दोन्ही कमावलं.

सविताला हॉकी खेळणं आवडायचं नाही, याचं कारण होतं तिची शाळाच घरापासून ३० किलोमीटरवर होती आणि जाण्यासाठी बसशिवाय कोणताच पर्याय नव्हता. गोलकिपर असलेल्या सविताची किटबॅग प्रचंड मोठी आणि वजनदार असायची, त्यामुळं बस कंडक्टर तिला बॅग एकतर बसच्या टपावर किंवा मागच्या बाजूला ठेवायला सांगायचे. पण सवितानं आपली किटबॅग कधीच आपल्यापासून लांब ठेवली नाही, कित्येकदा तिनं टपावर बसून ६० किलोमीटर प्रवास केला, कारण तिचं स्वप्न मोठं होतं.

सविताच्या घरी सगळं काही निवांत होतं अशातलीही गोष्ट नव्हती, ती लहान असतानाच तिची आई आजारामुळं अंथरुणाला खिळली आणि पाचवीत असल्यापासून सवितानं घर, अभ्यास आणि खेळ या तिन्ही गोष्टी सांभाळल्या. एक एक टप्पा पार करत खेळात प्रगती केली.

या सगळ्या प्रवासात तिला आणखी एका गोष्टीचा सामना करावा लागला, छेडछाडीचा.

ती बसमधून जात असताना काही मूलं तिची छेड काढायचे, तिनं यामुळं हॉकी सोडून देण्याचाही विचार केला मात्र, तिच्या वडिलांनी तिला हार मानू दिली नाही. तिनं जागतिक पातळीवर देशाला मिळवून दिलेलं यश हे तिनं त्या छेडछाडीला दिलेलं उत्तर ठरलं.

सविता हार मानणारी नाही हे हॉकीच्या फिल्डवरही अनेकदा दिसून आलंय. टोकियो ऑलिंपिक्सची ब्रॉंझ मेडलची मॅच, भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन. मॅच अगदीच घासून झाली, ब्रिटननं भारतीय गोल पोस्टवर सातत्यानं हल्ले चढवले. मात्र पुनियानं किमान १२ गोल वाचवले. भारतानंही प्रयत्नांची शर्थ केली पण मॅचचा रिझल्ट लागला भारत ३ – ग्रेट ब्रिटन ४. ऑलिम्पिक मेडल जिंकून इतिहास लिहायची संधी सविता आणि तिच्या टीमच्या हातून गेली.

त्या मॅचनंतर सविता भर मैदानात रडली, हातातोंडाशी आलेलं यश एका गोलमुळं हुकलं. पण त्या अपयशानंतर तिनं पुन्हा एकदा स्वतःसकट भारतीय टीम उभी केली, कॉमनवेल्थमध्ये तरुण पोरींना घेऊन सेमीफायनल गाठली. 

गोल्ड हुकलं असलं, तरी अजूनही भारतीय संघाला ब्रॉंझ मेडल जिंकण्याची संधी आहेच.

या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमुळं, ‘चक दे’ इंडिया पिक्चरसारखं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं, फक्त त्याचा शेवट पिक्चरसारखा झाला नाही.. कदाचित पुढच्या स्पर्धेत घडेल कारण सविताचा प्रवास बघता, ती सहज हार मानेल असं वाटत नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.