कधी विचार केलाय का, रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याची अफवा नेमकी कशी पसरली..

साल होतं २००३. जवळपास २ महिने एकच गोष्ट डोक्यात होती, यावेळचा वर्ल्डकप भारत जिंकणार. सचिन फॉर्मात होता, सेहवाग तोडत होता, झहीर-नेहरा-श्रीनाथ हे तीन फास्ट बॉलर्स स्टम्प हवेत उडवायचे, गांगुलीनं टीम इंडियात नवी जान फुंकली होती. दिवस इतके भारी होते की गांगुलीचं बघून बघून आपणही टीशर्टची कॉलर वर ठेवायला लागलो होतो. 

आपल्याला माहीत होतं, इंडिया वर्ल्डकप मारणार, पण फायनलमध्ये खडूस ऑस्ट्रेलिया समोर आली आणि आपण बेक्कार हरलो.

फायनल हरल्याच्या दुसऱ्या दिवशी शाळेत, कट्ट्यावर, कॉलेजला आपल्या सगळ्यांच्या कानावर एक कॉमन गोष्ट आली, ‘भावा तुला माहितीये का, रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती. उद्या परत फायनल घेणारेत, आपण जिंकतोय बघ.’

बरं मन इतकं भोळं होतं की, या स्प्रिंगवाल्या बॅटवर सहज विश्वास बसला. जे कानावर पडलं ते रुबाबात दुसऱ्याला सांगितलं, तोही म्हणला, ‘स्प्रिंग होती म्हणून रे, नायतर आपण हरलोच नसतो.’

पॉन्टिंगच्या बॅटमधली स्प्रिंग आणि फायनल परत खेळवणारेत ही रिक्षा लई दिवस फिरली, पण फायनल काय परत झाली नाही. ही अफवा होती आणि आपण गंडलो होतो, हे लय उशिरानं कळलं.

मात्र हा विषय गंभीर तेव्हा वाटला, जेव्हा समजलं की अफवा एकट्या महाराष्ट्रात नाय, सगळ्या देशात पसरली होती. 

आता तेव्हा काय सोशल मीडिया नव्हतं, जे काय असेल ते पेपर आणि सातच्या बातम्यांमध्ये, मग तरीही स्प्रिंगची अफवा देशभर पसरली. त्यामुळंच आता १९ वर्षानंतर डोक्यात एक प्रश्न आला की,

पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे, ही अफवा नेमकी पसरली कशी..?

आधी थोडंसं बॅकग्राउंड सांगितलं पाहिजे, वर्ल्डकप फायनलला भारतानं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली, ऑस्ट्रेलियानं आपल्याला लई डेंजर हाणला, ५० ओव्हर्समध्ये २ आऊट ३५९ रन्स. यात सगळ्यात मोठा तडाखा खडूस रिकी पॉन्टिंगनं नॉटआऊट १४० रन्स मारत दिला होता.

३६० करायला निघालेली टीम इंडिया २३४ वरच ऑलआऊट झाली. पॉन्टिंगच्या बॅटिंगमुळं आपले वांदे झाले आणि स्प्रिंगची अफवा खरी वाटली. पण ही अफवा पसरण्याची कारणं शोधायची म्हणल्यावर वाचावं आणि ऐकावं लागतंय.

साहजिकच बरीच शोधाशोध केल्यावर ही अफवा भारतात पसरली कशी याच्या तीन थेअऱ्या सापडल्या. त्याच विस्कटून सांगतो.

पहिली थेअरी म्हणजे, 

पॉन्टिंगनं नेहराला मारलेला सिक्स. पॉन्टिंग आपल्या बॉलर्सला किरकोळीत चोपत होता. ४१ व्या ओव्हरला बॉलिंगला आला आशिष नेहरा. नेहराजींनी चौथा बॉल टाकला स्लोअरवन, बॉल नेमका फुलटॉस आला आणि पॉन्टिंगनं एवढ्या स्लो बॉलला जवळपास एका हातानंच छकडा मारला, तेही लांब.

फास्ट बॉलला टायमिंग लावलं आणि एका हातानं सिक्स गेला तर आपण समजून घेतो, पण स्लो बॉलला इतक्या किरकोळीत उचलल्यामुळं लोकांना पॉन्टिंगनं काहीतरी झोल केलाय असं वाटू लागलं. त्यात भारत हरला आणि मनाची समजूत काढायला या शॉटचा दाखल देऊन पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याच्या अफवेला हवा देण्यात आली.

दुसरी थेअरी एकदम डीप आहे,

हा वर्ल्डकप झाला २००३ साली. त्यानंतर २००६ साली पॉन्टिंग वापरत असलेल्या बॅटवर आयसीसीनं बंदी आणली. तेव्हा पॉन्टिंग कुकाबुरा कंपनीची काहुना नावाची बॅट वापरत होता. वर्ल्डकप पासूनच गडी तुफान फॉर्मात होता, अशातच २००५ साली त्याच्या या काहुनावरुन वाद रंगला. 

पॉन्टिंगच्या बॅटच्या मागच्या बाजूला जे स्टिकर लावण्यात आलं होतं, त्याच्यात ग्रॅफाईट वापरण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. या ग्रॅफाईटमुळं त्याच्या बॅटला सपोर्ट मिळायचा आणि ताकदही. 

कुकाबुरा कंपनीनं मात्र आम्ही कुठलीही नियमबाह्य गोष्ट करत नसल्याचं सांगितलं होतं, तरीही बंदीची कारवाई झाली. 

या सगळ्या राड्यात आणखी दोन गोष्टी घडल्या. २००३ च्या वर्ल्डकपमध्ये आकारानं मोठ्या आणि नियमात न बसणऱ्या काही बॅट वापरण्यात आल्याचं आयसीसीनं सांगितलं. साहजिकच याचं कनेक्शन लावलं गेलं रिकी पॉन्टिंगशी. दुसरं म्हणजे ही काहुना बॅट वापरणारे आणखी दोन कार्यकर्ते होते, डॅमियन मार्टिन आणि सनथ जयसूर्या. 

मार्टिननं फायनलला पॉन्टिंगसोबतच उभं राहून आपल्याला ८८ रन्स चोपले होते आणि जयसूर्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे ही अफवा १९९६ ला सगळ्या जगानं ऐकली होती. त्यामुळं जशी पॉन्टिंगच्या बॅटची बातमी बाहेर आली, तशी फायनलवेळी बॅटमध्ये स्प्रिंग असल्याची अफवा खतरनाक व्हायरल झाली.

आता थेअरी क्रमांक ३, 

अनेक ठिकाणी वाचण्यात किंवा ऐकण्यात येतं की एका भारतीय पेपरनं एप्रिल फुलचा जोक म्हणून ही अफवा पसरवली होती. पण हे खरं मानायचं तर लॉजिक काय लागत नाही, कारण फायनल झाली २३ मार्चला, त्यानंतर १ एप्रिल आला आठवड्याभरानंतर. पण ही अफवा पसरायला आठवड्याचाही वेळ लागला नव्हता.

परत कुठल्या पेपरमध्ये हा जोक छापून आला होता, ते पण कुठं सापडत नाही. त्यामुळं या थेअरीवर पटकन विश्वास बसत नाही.

थोडक्यात काय झालेलं, तर भारत जिंकण्याची शंभर टक्के खात्री असताना पॉन्टिंगनी आपली स्वप्न पार चोळामोळा करुन टाकली. दुसऱ्या दिवशी पेपर आणि टीव्हीवर फक्त त्याचंच नाव दिसत होतं. त्यामुळं आपल्या पराभवावर फुंकर घालायला म्हणून लोकांनी बॅटमधल्या स्प्रिंगचा मुद्दा वर काढला, ज्याच्यात लॉजिक नव्हतं, पण त्यावेळी तेवढ्यापुरतं का होईना बरं वाटलं होतं. 

बाकी २००३ च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया त्या वर्ल्डफेमस निळ्या जर्सीमध्ये ज्या पद्धतीनं भिडली त्याचा आजही अभिमान वाटतो आणि पॉन्टिंग, हेडन, गिलख्रिस्ट, सायमंड्स, मॅक्ग्रा ही नावं ऐकली की आजही भीती वाटते, हे मात्र खरं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.