महाराष्ट्राच्या या राज्यपालांवर दिल्लीतून दबाव आला पण ते झुकले नाहीत

१९८० च्या दशकातली गोष्ट आहे. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती प्रचंड अस्थिर असण्याचा हा काळ.

अंतुले, बाबासाहेब भोसले असे प्रयोग करुन इंदिरा गांधींना पुन्हा वसंतदादांनाच मुख्यमंत्री करावं लागलं होतं. वसंतदादांवर काही अंशी अंकुश रहावा म्हणून उपमुख्यमंत्री पदाची धुरा देण्यात आली होती ती रामराव आदिक यांच्याकडे…

पण योगायोगाने एक घटना घडली ज्यामुळे रामराव आदिक यांना राजीनामा द्यावा लागला.

आणि हाच राजीनामा स्वीकारायचा की नाही यावरून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये वादात्मक परिस्थिती निर्माण झाली. पण राज्यपाल काय शेवटपर्यंत दिल्लीच्या दबावाला झुकले नाहीत. ते राज्यपाल कोण होते तर इद्रिस हसन लतीफ. 

पण याआधी या घटनेची पार्श्वभूमी बघूया,

११ एप्रिल, १९८४ या तारखेच्या वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी झळकली. यां बातमीनुसार, ७ एप्रिल रोजी युरोपला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी भरपूर वाईन प्यायली होती. याच नशेत त्यांनी हवाईसुंदरीला अपशब्द वापरले. स्वतःच्या पदाच्या प्रतिष्ठेला बाधा येईल अशा पद्धतीने वागले.  

या घटनेची बातमी प्रसिद्ध झाली त्याच दिवशी दुपारी मुख्यमंत्र्यांनी कौन्सिल हॉलमधील आपल्या कार्यालयात त्यांचे सचिव राम प्रधान यांना बोलावून घेतले. या बातमीबद्दल विधिमंडळात गदारोळ झाला होता आणि मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या दिवशी सभागृहात निवेदन करायचे असल्यामुळे या बातमीची सत्यता तपासून घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सचिवांस सांगितले.

सचिवांनी तात्काळ एअर इंडियाचे कार्यालयाशी संपर्क साधला. घडलेल्या प्रसंगाबाबतचा प्राथमिक अहवाल प्राप्त केला. मंत्रीमंडळ सचिवांकडून या माहितीची अधिक खातरजमा करून घेतली गेली. त्यांनीही या गोष्टीची पुष्टी दिली. परराष्ट्र सचिवांशी खातरजमा करून घेतली गेली.

प्रकरण चिघळलं अन त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली.

मंत्री देशात परतताच आपण त्यांना मंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यायला सांगू असे मुख्यमंत्र्यांनी ठरविले. 

ठरल्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचे पत्र मिळवले आणि ते पत्र घेऊन सचिवांना राज्यपालांना भेटायला सांगितले. या राजीनाम्याच्या पत्रासोबत राजीनामा स्वीकारला जावा, अशी शिफारस करणारे मुख्यमंत्र्यांचे पत्र देखील होतेच.

सचिव मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानापासून जेमतेम दहाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या राजभवनात पोहचतात. राजीनाम्याचे पत्र असलेले पाकीट खुर्चीशेजारील टेबलावर ठेवतात.

 मुख्यमंत्री माझ्याशी फोनवर बोलू इच्छितात, असे राज्यपाल इद्रिस लतीफ यांनी सचिवांना  सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांना फोन लावला जातो. मुख्यमंत्री सचिवांना फोनवर कळवतात कि, राज्यपालांना राजीनाम्याचे पत्र सादर करण्याचा आदेश आहे आणि तो आदेश कायम राहणार आहे. दिल्लीहून त्यांच्यावर दबाव येत आहे. 

सचिवांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमधले संभाषण मराठीतून होते. तरी राज्यपालांना त्यांच्यातल्या संभाषणाचा मथितार्थ समजतो. 

जेंव्हा राजीनाम्याचे ते पाकीट सचिव राज्यपालांना देण्यासाठी उचलतात तेवढ्यात राज्यपाल हातानेच खूण करून त्यांना थांबवतात आणि विचारतात की,

“हे बघा, घटनेनुसार आणि या पत्रानुसार कारवाई व्हावी अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, याची मला खात्री पटल्याशिवाय मी पत्राला हात देखील लावणार नाही. एकदा का मी ते हातात घेतले की, मी मुख्यमंत्र्यांची शिफारस स्वीकारणार, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय फिरवला आणि मला राजीनामा न स्वीकारण्याचा सल्ला दिला, तर मी तो सल्ला स्वीकारण्यास नकार देईन. मी तसे केले तर मी दिल्लीहून आलेल्या दबावापुढे झुकलो, असा त्याचा अर्थ होईल. 

माझ्यासाठी हा सदसद्विवेकबुद्धीचा प्रश्न आहे.”

एवढं बोलून राज्यपाल थांबले नाहीत तर वरून ते सचिवांना, मला पत्र देण्याआधी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी खातरजमा का करून घेत नाही?” असा सल्ला देतात. 

सचिव पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना फोन करतात. पुन्हा एकदा राजीनाम्याबाबत खातरजमा करून घेतात.  पुन्हा खातरजमा का करून घेतली जातेय, असा मुख्यमंत्र्यांना प्रश्न पडला.  पण समोर राज्यपाल उभे असल्यामुळे सचिव मुख्यमंत्र्यांच्या सवालावर काही स्पष्टीकरणच देऊ शकत नव्हते.  

मुख्यमंत्र्यांनी एकदा का निर्णय घेतला की, काय वाट्टेल ते झाले तरी ते त्यावर ठाम राहतात असं देखील म्हणायला मुख्यमंत्री विसरले नाहीत. 

त्यांच्या याच ठामपणाच्या जोरावर सचिव राज्यपालांना पत्र सोपवतात. राज्यपाल ते पत्र स्वीकारतात. आणि नेमकं त्याच क्षणी पंतप्रधानांच्या एका वजनदार साहाय्यकाकडून राज्यपाल लतीफ यांना फोन आला. 

त्यांनी फोन कानाला लावला, समोरून काय वाक्ये होती माहिती नाही पण इकडून राज्यपाल ठामपणे म्हणाले, “सॉरी, राजीनामा स्वीकारला गेला आहे. माझा निर्णय फिरवण्याची घटनेत कोणतीही तरतूद नाही.”

त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना दिल्लीच्या दबावाला देखील न झुकलेला राज्यपाल दिसला होता.

पण कोण होते हे इद्रिस हसन लतीफ ?

लतीफ यांची दुसरी महत्वाची ओळख म्हणजे, ते भारताचे पहिले हवाई दल प्रमुख होते. त्यांचा जन्म हैद्राबादचा. वयाच्या 18 व्या वर्षी रॉयल इंडियन एअर फोर्स मध्ये दखल झाले. त्यांनी हवाई दलाच्या अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं. भारताच्या पहिल्या फ्लाय पास्टचे नेतृत्व केले. 

जग्वार एयर स्ट्राइक एअरक्राफ्ट च्या खरेदीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. तत्कालीन सरकारला या डील साठी मान्यता देण्यास राजी केले होते.

ते IAF चे पहिले मुस्लिम हवाई दल प्रमुख ठरले. 1981 च्या सालात ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर लतीफ यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालाची जबाबदारी घेतली. तसेच फ्रान्समधील भारतीय राजदूत म्हणून देखील त्यांनी भूमिका पार पाडली होती.

संदर्भ : माझी वाटचाल – राम प्रधान (माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव)

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.