बाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं

बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारणात अनेक प्रतिस्पर्धी होते, राजकीय टीकाकार होते. विचारधारेच्या मुद्यापासून तर कार्यशैलीपर्यंत बाळासाहेबांच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त प्रसंग घडले. मात्र त्यांचे कडवे टीकाकार सुद्धा त्यांच्या दोन गोष्टी नाकारू शकत नाहीत, ते म्हणजे बाळासाहेबांची मैत्री आणि बाळासाहेबांच्या आत असलेला एक सच्चा कलाकार.

कलाकार हा कालजयी असतो, त्याला वयाचं आणि काळाचं बंधन नसतं. बाळासाहेबांमधील याच सच्च्या कलाकाराची प्रचिती त्यांच्या उतारवयात सुद्धा येत होती. 

असाच एक किस्सा प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी मार्मिकमध्ये सांगितला आहे. 

प्रभाकर वाईरकर शालेय वयात एका मैलावर असलेल्या माळावर रोज शेळ्या मेंढ्यांचा कळप चरायला घेऊन जायचे. तेव्हा त्यांची वयस्कर मंडळी त्यांना पटकळणीच्या पाच पाकळ्यांच्या फुलाची कथा सांगायचे. पटकळणीचे पाच पाकळ्यांचे फूल मिळाले तर आपण भाग्यवान ठरतो किंवा अचानक दैवी लाभ होतो, अशी ती कथा.

या कथेचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला होता. कळपाबरोबर चालताना वाटेतील पटकळणीच्या झुडुपात पाच पाकळ्यांचे फूल शोधण्याचा त्या सर्व गुराख्यांना छंदच लागला होता. अचानक ते फूल हाताला लागले तर सगळ्यांना आनंद व्हायचा.

असाच पटकळणीचं फुल मिळण्याच्या अनुभव त्यांना आला होता पण तेव्हा फुल मिळालं नव्हतं तर बाळासाहेबांमधील सच्चा कलाकार त्यांना दिसला होता. 

मार्मिक साप्ताहिकाचे मुखपृष्ठ तयार करताना वाईरकर यांची बाळासाहेबांशी भेट झाली, तेव्हा बाळासाहेबांनी वाईरकरांच्या एका व्यंगचित्राची आठवण काढली.

बाळासाहेब म्हणाले की, तू एक हत्तीसारखं व्यंगचित्र काढलं होतंस, त्यावर खूप साऱ्या रेषा काढल्या होत्यास.

यावर वाईरकरांना लोकप्रभाच्या कव्हर पेजवरील व्यंगचित्राची आठवण झाली.

पण बाळासाहेबांनी आठवलेल्या व्यंगचित्रात तो हत्ती नव्हता, तर अनेक घोटाळे, भ्रष्टाचार करून गब्बर झालेल्या ढेरपोट्या राजकारणी-साखर कारखानदारांचा ते व्यंगचित्र होतं.

छळ कपटाने कारखाना हडप करण्यासाठी त्यासाठी धोतर सुटून अब्रूचे धिंडवडे निघत होते परंतु तो निडर होता. त्याच्या रंगेलपणाचं प्रतीक असलेली बाटली त्याच्या हातात होती. तर त्या कारखानदारांच्या पाठीमागे त्याच्याच विश्वासघाताने दुखावलेले कष्टकरी शेतकरी दाखवलेले होते.

तेव्हा या व्यंगचित्रावर असलेल्या बारीक बारीक रेषांबद्दल त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं.

“मी वॉटरप्रूफ शाई असलेल्या पेनाने चित्राची आउटलाइन करतो. नंतर चित्रात रंग भरतो. पूर्वी कॅम्लिनची वॉटरप्रूफ काळी शाई यायची ती १०० टक्के वॉटरप्रूफ होती. तिच्या लिक्विड रंग वापरले तरीही काळ्या रेषा विरघळत नव्हत्या आणि आपल्याला हवं तसं व्यंगचित्र होतं.”

ते पुढे म्हणाले की, “परंतु आत्ता जी कॅम्लिनची काळी शाई बाजारात मिळते तिचा वापर करून आउटलाइन काढली आणि त्यात रंग भरले तर आउटलाइन पसरते. पूर्वीच्या शाईसारखी आखीव रेखीव राहत नाही. म्हणून १०० टक्के वॉटर प्रूफ इंक असलेल्या पेनचा वापर करून हे व्यंगचित्र रेखाटलं आहे”

वाईरकरांचे शब्द ऐकून बाळासाहेब स्तब्ध झाले. त्यांनी क्षणात कॅम्लिनचे संचालक सुभाष दांडेकर यांना त्यांनी फोन लावायला सांगितला आणि ते दांडेकरांशी बोलले. 

“माझा एक आर्टिस्ट आहे, त्याची तुमच्या नवीन रंगांसंदर्भात तक्रार आहे, जरा त्याच्याशी बोलून घ्या.”

एवढं बोलून बाळासाहेबांनी फोन वाईरकरांकडे दिला. तेव्हा वाईरकरांनी विशिष्ट काळ्या शाईसंदर्भातील समस्या सुभाष दांडेकर यांना सांगितली.

तेव्हा सुभाष दांडेकर हैद्राबादला होते. त्यांनी समस्या जाणून घेण्यासाठी कंपनीचे अधिकारी पाठवण्याचं आश्वासन दिल. 

यानंतर अवघ्या दोन दिवसांनी कॅम्लिन कंपनीचे तीन विभागांचे वरिष्ठ अधिकारी वाईरकर यांच्या घरी आले. त्यांनी समस्या ऐकून घेतल्या, त्यावर काही उपाय सांगितले. एवढंच नाही तर भविष्यात कोणती समस्या आली तर नक्की सांगा अशी विनंती सुद्धा केली.

या प्रसंगावरून कळते की, बाळासाहेब हे कॅनव्हॉसवर निव्वळ व्यंगचित्र काढत नव्हते. तर त्यांनी कॅनव्हॉसवर रंगांच्या आधारे जी साधना केली होती त्यामुळे त्यांना लगेच घटनेचं गांभीर्य कळलं होतं. बाळासाहेबांना निव्वळ वाईरकरच नाहीत तर ती शाई वापरणाऱ्या सर्व चित्रकारांची समस्या एका क्षणात कळली होती. असे होते कलाकार बाळासाहेब.

(संदर्भ: ई मार्मिक)

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.