प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांना एकत्र येण्यात काय प्रॉब्लेम आहे?

ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार या चर्चा तर, अनेक दिवसांपासून सुरू होत्या. तसं या दोन्ही नेत्यांच्या विधानांनी या चर्चांना खतपाणीही घातलं. आज संयुक्त पत्रकार परिषद घेत या दोन्ही नेत्यांनी युतीची अधिकृत घोषणा केली.

आता या युतीचा कोणत्या पक्षांना काय फायदा होईल आणि कुणाला फटका बसेल हा मुद्दा वेगळीकडे राहतो आणि आधीपासून महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं वंचितशी जूळणार का हा मुद्दा वेगळीकडे.

खासकरून प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार एकत्र येतील का हा प्रश्न राजकीय वर्तुळातील अनेकांना पडलेला. आजच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी याच मुद्द्यावर भाष्य केलंय. ते म्हणाले,

“शरद पवार आणि आमचं भाडण फार जुनं आहे, शरद पवार आणि काँग्रेस आमच्याबरोबर येतील अशी अपेक्षा करतो.”

आता प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं ते जुनं भांडण काय आहे बघुया…

शरद पवारांना विरोध असण्याचं मुळ कारण प्रकाश आंबेडकर प्रस्थापित मराठा व विस्थापित मराठा या मांडणीद्वारे स्पष्ट करतात. मराठा समाजाकडे राष्ट्रवादीच्या माध्यमातून सत्ता राहिली. त्यातून ठराविक घराण्याची मक्तेदारी उभारली असा दावा प्रकाश आंबेडकर करतात.

त्यांच्या या सोशल इंजिनिरिंगमध्ये ते शरद पवार व पर्यायाने प्रस्थापित मराठा बसत नाही, याऊलट वंचित सोबत विस्थापित मराठ्यांची मोट बांधण्याकडे प्रकाश आंबेडकरांचा कल आहे. राज्यात हाच प्रयोग शिवसेनेमार्फत देखील करण्यात आला होता. तत्कालीन प्रस्थापित काँग्रेस मराठा नेत्यांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरेंनी विस्थापित मराठ्यांची व इतर जातींची मोट बांधली. राजकारणाचा हा पॅटर्न प्रकाश आंबेडकरांना घेवून जायचं असल्यास शरद पवार हे नाव आंबेडकरांना गैरसोयीचं ठरताना दिसून येतं.

म्हणूनच भाजप, संघ यांच्यावर टीका करताना देखील शरद पवारांसोबत व्यासपीठ शेअर करणं प्रकाश आंबेडकर टाळताना दिसतात.

शिवाय, व्होट बँक हा एक महत्वाचा मुद्दा आहे.

या विरोधाच्या राजकारणात व्होट बँकेचं राजकारण महत्वाचं आहे. काँग्रेसमधून फुटलेल्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या नेतृत्वात दलित, वंचित व मुस्लिम समाजाची व्होटबँक आपल्याकडे खेचून घेण्याचा बराच प्रयत्न केला.

काही प्रमाणात राष्ट्रवादीला यामध्ये यशही आले. मात्र २०१९ च्या लोकसभेत वंचितने तब्बल ४१ लाख मते घेतली तर विधानसभेत २४ लाख मते घेतली. ही व्होटबॅंक राष्ट्रवादीसाठी देखील पूरक असल्याचं बोललं जातं. अर्थात मतदारसंघात हे राजकारण कस चाललं हे बघायचं झालं तर राज्यातल्या एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ३९ ठिकाणावर वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते.

त्यामुळे राष्ट्रवादीला जवळपास ११ जागा वंचितमुळे गमवाव्या लागल्याचा दावा राष्ट्रवादीकडून झाला होता.

तसंच २०१९ च्या विधानसभेत वंचितमुळे चाळीसगाव, जिंतूर, घणसावंगी, पैठण, नांदगाव, उल्हासनगर, दौंड, खडकवासला, गेवराई, उस्मानाबाद, माळशिरस अशा ११ जागा गमावाव्या लागल्याचा दावा देखील राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला होता. थोडक्यात आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीला ज्या व्होटबॅंकेची गरज भासते तीच व्होटबॅंक वंचितला पाठींबा देत असल्याने समान मुद्द्यांवरून दोन्ही पक्ष आमनेसामने येत असल्याचं बोललं जातं.

आता शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली आहे. ही घोषणा करतानाच उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना उद्देशून म्हटलं,

“वंचितने महाविकासआघाडीचा घटक म्हणून वाटचाल करायला हरकत नाही.”

‘आंबेडकर आणि शरद पवारांमधील संबंध सुधारावे यासाठी प्रयत्न करणार’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे ठाकरेंनी आता आंबेडकर आणि पवारांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत हे स्पष्ट लक्षात येतंय.

बरं, ठाकरेंच्या या वाक्यानंतर बोलताना प्रकाश आंबेडकरांनीही शरद पवारांशी जुना वाद असला तरी, एकत्र काम करायला हरकत नाही अशा अर्थाची भुमिका मांडली. त्यामुळे आता काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस या युतीकडे कशाप्रकारे बघते? महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचंं स्वागत केलं जाईल का? आणि जुना वाद विसरून शरद पवार प्रकाश आंबेडकरांसोबत एकत्रितपणे काम करतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही येत्या काळात स्पष्ट होतील. असं असलं तरी, राजकीय वर्तुळात भाजप-शिंदेगटाला हरवण्यासाठी आता वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र येतील अशी चर्चा  दबक्या आवाजात सुरू आहे. आता या चर्चा खऱ्या ठरतायत की नाही त्यानुसार महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार याचाही अंदाज लावला जाईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.