रिक्षावाले भाडं नाकारत आहेत, हे उपाय करा ; फरक पडेल का माहित नाही पण मनाला बरं वाटेल

आज सकाळी खूप पाऊस पडत होता. मी ऑफिसला आले आणि कामाला सुरुवात करत होते तितक्यात एका भिडूने चिडचिड करत ऑफिसमध्ये एंट्री घेतली. चिडचिड सुरु होती म्हणून साहजिकच काय झालं विचारलं. तेव्हा त्याने फाडफाड बोलायला सुरुवात केली..  

‘अरे हे रिक्षावाले, पाऊस येतोय म्हणून अगदी अडून बघतात माणसाला. रोज माझे ऑफिसला यायला ३० रुपये होतात आज ५० रुपये मागत होता. मी म्हटलं मीटरने जाऊया तर मीटर सुरु करायला तयारच नाही. हे तुम्ही चुकीचं करताय म्हटल्यावर तो मलाच उंच आवाजात बोलतोय’ 

या भिडूचं बोलणं सुरु होतं तेवढ्यात एका आवाजाची भर पडली. दुसरा भिडू सांगायला लागला… 

‘हो ना, मलाही असाच अनुभव आला. एकतर पावसात लवकर रिक्षावाले थांबवत नाही. मिळाली तर शेअरिंग मिळते. मी त्यानेच आलो पण रिक्षेवाल्या गाडीने आमच्या दोंघाचे मीटरनुसार वेगवेगळे पैसे घेतले.’ 

हळूहळू चर्चेत माणसं वाढत गेली. माझ्या एका मित्राला हा अनुभव आला, दुसऱ्याला हा आला असं म्हणत ‘पावसाळयात रिक्षावाल्यांची नाटकं’ हा विषयही वाढत गेला. 

जरा विस्तृत समजून घेण्यासाठी काही ओळखीच्या लोकांना फोन केला जे प्रवासासाठी रोज रिक्षा वापरता. तेव्हा समजलं पावसाळा सुरु झाला की दरवर्षी सामान्य नागरिकांना अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. अगदी जवळचं भाडं असलं तरी नाही म्हटलं जातं आणि होकार असेल डबल भाडं, मीटर सुरु न करणं, ट्राफिकमध्ये अडकले तर मध्येच उतरवून देणं, आवाज उंचावून बोलणं आणि काय काय…

म्हणून म्हटलं जरा याचा छडा लावूया… जर एखादा रिक्षावाला ग्राहकांशी असं वर्तन करत असेल तर ग्राहकांचे काय अधिकार आहेत? ते याबद्दल कुठे तक्रार करू शकतात? हे जाणून घेण्यासाठी आम्ही आरटीओशी संपर्क साधला… 

पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितलं… 

अशाप्रकारे कोणत्याही रिक्षावाल्याने नागरिकांसोबत वर्तन केलं असेल तर त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच RTO मध्ये तक्रार करता येते.

ही तक्रार तुम्ही ऑनलाईन इमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे पत्र पाठवून देखील करू शकतात. rto.12-mh@gov.in हा मेल आहे तर ०२० २६०५८२८२ हा RTO चा नंबर आहे त्यावर तुम्ही माहिती घेऊ शकतात.  हवं तर प्रत्यक्ष जाऊन सुद्धा तक्रार नोंदवू शकतात. 

तक्रार करताना तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगाव्या लागतात…

पाहिलं म्हणजे ठिकाण. कोणत्या ठिकाणी तुमच्या सोबत हा प्रकार घडला आहे, वेळ काय होती. दुसरं म्हणजे रिक्षाचा नंबर. तुम्ही साधा नंबर सांगितलं तरी चालतं किंवा जमलं तर तुम्ही रिक्षाचा फोटो देखील देऊ शकतात. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं की कोणत्या प्रकारची वागणूक तुम्हाला मिळाली आहे. म्हणजेच तक्रारीचा प्रकार. 

जसं की, भाडं नाकारणे, जास्त भाडं घेणं, अपशब्द बोलणं, एक्झॅक्ट काय झालं ते सांगायचं. 

तक्रार नोंदवताना तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर सांगावा लागतो मात्र हे गोपनीय ठेवल्या जातं. संबंधित रिक्षावाल्याला ही माहिती दिली जात नाही. तेव्हा नागरिकांना टेन्शन घेण्याची गरज नाही. 

या तक्रारीच्या आधारावर मग RTO त्या रिक्षावाल्याला नोटीस जारी करते. नोटीस जारी झाल्यानंतर  त्याला २-३ दिवसांचा वेळ दिला जातो. याकाळात संबंधित रिक्षावाल्याला त्याची बाजू मांडायला हजर राहावं लागतं. त्याचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तो दोषी असला, त्याने आरोप स्वीकार केले की तात्काळ पुढची कारवाई केली जाते. 

तक्रारीच्या प्रकारानुसार मोटार वाहन कायद्यानुसार त्याला दंड ठोठावला जातो. पहिल्या तक्रारीवर ५०० रुपये दंड आणि १० दिवस लायसन्स रद्द होतं. तर दुसऱ्या तक्रारीला १००० रुपये दंड आणि ३० दिवस लायसन्स रद्द होतं. 

पण यात एक प्रश्न पडतो. रिक्षावाल्याने जर आरोप मान्य करण्यास साफ नकार दिला तर? फक्त अशावेळी मग तक्रारदाराला बोलावलं जातं आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात. आणि मग त्याआधारे अधिकारी दोषी ठरवतात. मात्र अगदी क्वचितवेळा असं होतं, असं संजीव भोर म्हणाले. 

आता परत एक प्रश्न उरतो. हे झालं मीटरने जाणाऱ्या रिक्षावाल्यांचं. ओला-उबर सारख्या रिक्षाचं काय. ते देखील पावसाळ्यात त्रास देतात. जास्तीचे पैसे घेतात, अनेकदा तर कन्फर्म केलेली राईड कॅन्सल करतात. तेव्हा काही करता येतं का? त्यावर RTO अधिकाऱ्यांनी सांगितलं…

ओला-उबरला अग्रीगेटर म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. अग्रीगेटरने कोणत्या प्रकारे काम करावं हे नियम अजून शासनाने सांगितले नाहीयेत. म्हणून सध्यातरी RTO त्यावर काही कारवाई करत नाही. मध्यंतरी कोर्टाने ओला-उबरला डिटेल माहिती देण्यास सांगितलं होतं. हे प्रकरण अजून कोर्टात प्रलंबित आहे. 

अशाप्रकारे ही सर्व प्रोसेस आहे, ज्याने नागरिक तक्रार करू शकतात. मात्र यात परत प्रश्न पडला.. रिक्षावाले असं का करत असावे? त्यांना कोणता त्रास सहन करावा लागतो का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही रिक्षावाल्याशी बातचीत केली. 

नाव न घेण्याच्या अटीवर त्यांनी माहिती दिली… 

लोकेशनवर हे ठरत असतं. अनेकदा भाडं जर शहराच्या बाहेर असेल तर तिथून परत येताना भाडं मिळत नाही. म्हणून परतीचे थोडे पैसे जास्त आकारले जातात. मीटरपेक्षा २०-३० रुपये जास्त मागितले जातात. कारण सीएनजी परवडत नाही.

सध्या सगळ्या रिक्षावाल्यांना सीएनजीचे वाढलेले दर हा त्रास सहन करावा लागतो आहे. आधी सीएनजी होता ५५ रुपये किलो आता त्याचे दर ८५ रुपये किलोवर पोहोचले आहेत. त्यात लांबच लांब रांगा सीएनजीच्या पंपाबाहेर असतात. २-३ तास सहज तिथे जातात. अशा स्थितीतून गॅस भरून बाहेर आले आणि जवळचं भाडं मिळालं तर तो नकार देतो. 

शिवाय गेल्या कित्येक वर्षांपासून मीटरचे रेट वाढवले गेले नाहीत. अगदी २-३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे रेट वाढवावे अशी मागणी रिक्षावाले आणि संघटना करत आहे. मीटरने परवडत नसल्याने काही जण असं करतात. 

पुन्हा ओला-उबरची वाढलेली संख्या हे एक मुख्य कारण आहे. 

त्यांना प्रेफरन्स दिला जात असल्याने मीटर रिक्षाकडे लोक वळत नाही. तेव्हाही भाडं मिळालं तर पैसे जास्त मागतात, असं रिक्षावाल्यांनी सांगितलं आणि पुढे म्हणाले… खरं तर हे सर्व चुकीचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे सगळेच रिक्षावाले असं वागत नाही. काही रिक्षावाले असं वागतात ज्यामुळे सगळ्यांचं नाव खराब होतं, असं रिक्षावाल्यांनी सांगितलं. 

पुढे ते असंही म्हणाले की… जर कुणी रिक्षावाला असा वागला तर हमखास ग्राहकांनी RTO कडे तक्रार करावी. कारण रिक्षा संघटना त्यांचं समर्थन करत नाही. 

असा हा ओव्हरऑल प्रकार आहे. तुम्ही काय करू शकतात हे देखील सांगितलं आहे आणि रिक्षावाले असं का करतात? हे देखील सांगितलं आहे. तेव्हा आता तुम्ही ठरवू शकतात की तुम्हाला काय भूमिका घ्यायची आहे. बाकी ही माहिती महत्वाची वाटत असेल तर नक्की शेअर करा…

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.