पोरींना फिरायला मिळावं म्हणून तिने फक्त पोरींसाठी ट्रॅव्हल कंपनी सुरु केलीये

भटकंती करायला कोणाला नाही आवडत. कामाच्या गराड्यातून  थोडा वेळ काढून मित्र मैत्रिणींसोबत प्लॅन बनवून, बॅग पॅक करावी,  पैसे घ्यावे आणि आपल्या मार्गाला निघावं अशी छान स्वप्न रोज पडतात. पण मांजर आडवी गेल्याने कोणामुळे तरी दरवेळचा प्लॅन फ्लॉप होतोच. त्यात ट्रिप जर पोरीपोरींची असेल तर घरचे सोडत नाही, पैसे नाहीत, सेफ्टी प्रॉब्लम अशा अनेक प्रॉब्लमची लिस्ट समोर येते.

आता बायकांचं दुखणं बायकांनाच माहित, असं म्हणत साक्षी बालदेनं या सगळ्या प्रॉब्लमच सोल्युशन काढलं आणि लेट हर ट्रॅव्हल नावाची कंपनी सुरु केली. ज्यातून मागच्या ३ ते ४ वर्षात ५००० पेक्षा जास्त महिलांना सक्सेसफूली ट्रिपवर नेलंय.

या संदर्भात बोल भिडूशी बोलताना साक्षी बालदेनं सांगितलं की,

२०१८ मध्ये मी ही  कंपनी सुरु केली होती. ट्रॅव्हल कंपनी सुरु करायची असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. पण एकदा असं झालं की, कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना आम्ही मुलींनी बाहेर जायचा प्लॅन बनवला. पण, नंतर कोणाच्या घरून परमिशन मिळाली नाही, तर कोणी पैशाची अडचण सांगितली. शेवटी प्लॅन काही सक्सेसफुल झाला नाही. त्यानंतर मी एकटीच फिरायला गेले. ती माझी पहिली सोलो ट्रिप होती.

पण या घटनेवरून साक्षीच्या लक्षात एक गोष्ट आली की, बाहेर ट्रॅव्हल करताना मुलींना अनेक गोष्टी फेस कराव्या लागतात. पण यात तीन गोष्ट कॉमन होती. त्या म्हणजे एकट्या मुलीला प्रवासासाठी बाहेर पाठवणं रिस्क आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेफ्टी त्यामुळं घरचे मुलींना बाहेर पाठवत नाही आणि नंतर मुद्दा येतो तो पैशांच्या.

यावरूनच साक्षीला आयडिया सुचली की, फक्त महिलांसाठी एक ट्रॅव्हल कंपनी सुरु करावी. जी अर्थातच सेफ असेल आणि स्वस्त असेल. यातूनच २०१८ ‘लेट हर ट्रॅव्हल’ला सुरुवात झाली. ५००० रुपयांच्या स्वखर्चातून इंदौर ते माटुंगा अशी पहिली ट्रिप काढली. पुढे त्यात  १५ जणी जोडल्या गेल्या. या सर्व बायकांना सर्व्हिस आवडल्यामुळं आपोआप त्याची माऊथ पब्लिसिटी झाली आणि पुढच्या सगळ्या ट्रिप्सना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

साक्षी सांगते, “माझ्या पहिल्या ट्रिप दरम्यान दोन बहिणी माझ्याकडे आल्या आणि घट्ट मिठी मारली. मला आधी आश्चर्य वाटलं. पण त्यानंतर त्यांनी सांगितलं की, आम्ही अशा प्रकारे पहिल्यांदाच कुठल्या तरी ट्रीपसाठी बाहेर पडलो आहे. कारण घरचे कधीच अशा प्रकारे बाहेर पडण्यासाठी परमिशन देत नसायचे, पण आता सगळ्या मुलीचं म्हटल्यावर जायला मिळाल. या घटनेने मला पुढच्या कामासाठी आणखी प्रोत्साहन दिल”

साक्षी पुढे सांगते की, मी एका मिडलक्लास घरातली मुलगी, जिथे क्वचित कोणी व्यवसाय करतं. जेव्हा मी घरी सांगितले की, मला एक ट्रॅव्हल स्टार्टअप सुरू करायचाय, तेव्हा सगळ्यांचं असं म्हणणं होत की, मी व्यवसाय सुरू करण्यासाठी तू खूप लहान आहे. म्हणूनच सर्वांनी मला माझा अभ्यास पूर्ण करून नोकरी करायचा सल्ला दिला”

पुढं साक्षीने कसतरी घरून घरच्यांना पटवून दिल. त्यांनतर स्टार्टअप वाढवण्यासाठी साक्षीने अनेक पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली आणि मिळालेले पैसे स्टार्टअपमध्ये गुंतवले. पण जानेवारी २०१९ मध्ये जेव्हा तिने दुसरी ट्रिप काढली, तेव्हा ती पूर्णपणे फेल झाली. पण यामुळे साक्षीला एक गोष्ट लक्षात आली की, छंद म्हणून काम करण्याऐवजी व्यवसाय वाढवायचा अधिक काम केलं पाहिजे. 

त्यांनतर २०१९ मध्ये साक्षीने आपली कंपनी रजिस्टर केली आणि कमीतकमी पैशात सगळ्या सोयीसुविधा देऊन ट्रिप ऑर्गनाईज केल्या. हळू – हळू त्याला प्रतिसाद मिळत गेला. भोपाळ आणि इंदौरमध्ये सारख्या शहरात कंपनीचे ऑफिस सुरु केले. सगळं ठीक ठाक सुरु होत,  दरम्यान कोरोना आला. 

कंपनी पूर्णपणे ठप्प झाली. एक वेळ अशी आली की, साक्षीला वाटले आपण सगळ्यात मोठी चूक केली. आपण जॉबच करायला पाहिजे होता. त्यामुळे ऑफिस भाडं आणि इतर गोष्टीमुळे तिचे बरेच नुकसान झाले.

पण काही दिवसांनी सगळ्या गोष्टी सुरु झाल्या. आणि साक्षीचा बिजनेस पुन्हा सुरु झाला. त्यानंतर तिने वर्षभरात जवळपास ३५ ट्रिप केल्या. त्याला महिलांचा, तरुणींचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. साक्षीच्या कंपनीच नाव हळूहळू मध्यप्रदेशाच्या बाहेर जाऊन पोहोचल.

साक्षीने आपल्या ट्रॅव्हल कंपनीतून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय.

साक्षी प्रॉफिटला कमी महत्व देत, आपल्या कस्टमरला कमी पैशात चांगली सर्व्हिस देण्यावर विश्वास ठेवते. यात सेफ्टीवर अधिक भर असतो. त्यात जर एखाद्या महिलेच्या कुटुंबियांकडून परमिशन मिळत नसेल तर. साक्षीची टीम स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्या महिलेच्या पालकांशी बोलतात आणि त्यांच्या प्रॉब्लम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात.

आतापर्यंत लेट हर ट्रॅव्हलने अख्ख्या भारतात ५५ पेक्षा जास्त ट्रिप काढल्यात, ज्यामुळे कंपनीसोबत ५००० पेक्षा जास्त महिला ट्रॅव्हलर जोडल्यात आणि आज कंपनीचा टर्नओव्हर २५ लाखांवर गेला आहे.

साक्षी सांगते, मला महिलांसाठीचा हा फ्रिडम प्लॅटफॉर्म आणखी मोठ्या स्तरावर न्यायचा आहे.  जेणेकरून आणखी महिला घराबाहेर पडून मोकळेपणाने भटकंती करू शकतील.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.