अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगा माझे सहकारी मला सर म्हणतात.

गोष्ट आहे 1966 सालची. भारतीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं ताष्कंद करारावेळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यांच्या रिकाम्या झालेल्या खुर्चीत इंदिरा गांधी स्थानापन्न झाल्या.

इंदिरा गांधी तरुण होत्या. राजकारणावर त्यांची अजून पकड नव्हती. नेहरूंची मुलगी या व्यतिरिक्त त्यांची स्वतःची ओळख अजून बनली नव्हती. विरोधक गुंगी गुडीया अस म्हणून त्यांची हेटाळणी करत होते. इंदिरा गांधी यांना विरोधी पक्षासोबतच स्वपक्षातील विरोधकांशी लढावं लागत होतं

अशातच अमेरिकेचे अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी इंदिरा गांधी यांना स्टेट व्हिजिटचे आमंत्रण दिले.

इंदिराजी पंतप्रधान होऊन काही महिने सुद्धा झाले नव्हते. त्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा झाली. नुकताच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा होता.

28 मार्च 1966 ला इंदिरा गांधी अमेरिकेला पोहचल्या. जेट लॅगमुळे व्हाइट हाऊसची भेट दुसऱ्या दिवशी आखली होती.

त्यांचे चुलत भाऊ जेष्ठ सनदी अधिकारी बी.के.नेहरू भारताचे अमेरिकेतील राजदूत होते.

29 तारखेला इंदिराजीना व्हाइट हाऊसला नेण्यासाठी ते लवकर आले होते. त्या दिवशी सकाळ पासून इंदिराजीचा मूड काहीसा ठीक नव्हता. काही ना काही कारणाने त्यांची चिडचिड होत होती.

इंदिरा आवरत होत्या. अचानक एक फोन आला. बी के नेहरू यांनी तो रिसिव्ह केला. फोन व्हाइट हाऊस मधून आला होता. बी के नेहरूंनी इंदिरा गांधींना सांगितलं,

“राष्ट्राध्यक्ष विचारत आहेत की आपल्याला प्राईम मिनिस्टर म्हणायचं की मॅडम प्राईम मिनिस्टर म्हणायचं?”

दोन देशांचे प्रमुख जेव्हा भेटतात तेव्हा अनेक शिष्टाचार पाळले जातात. समोरच्याला कोणत्या संबोधनाने हाक मारायची याचे देखील विशिष्ट संकेत असतात. पण इंदिराजीना तो प्रश्न ऐकून प्रचंड राग आला. त्यांनी फटक्यात उत्तर दिलं,

“राष्ट्राध्यक्षांनी कोणतेही संबोधन वापरावे माझी काही हरकत नाही, पण त्यांना एक गोष्ट सांगा माझे सहकारी मला सर म्हणून हाक मारतात.”

त्याकाळी राष्ट्राध्यक्ष अथवा पंतप्रधानपदावर एखादी महिला असणे ही खूपच दुर्मिळ गोष्ट होती. मोठमोठ्या देशांना देखील एखादी महिला एवढ्या उच्च पदावर असणे पचलेले नव्हते. असा प्रश्न कधी कुठल्या पुरुष पंतप्रधानाला कोणी विचारला नसता.

फक्त महिला आहे म्हणून अमेरिकन अध्यक्षांनी ही चूक केली आणि इंदिरा गांधींच्या त्या बाणेदार उत्तरामुळे भारताचा स्वाभिमान जपला गेला होता.

या एका प्रसंगामुळे फक्त अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनाच नाही तर भारतातील विरोधकांना देखील कळले की अननुभवी आहे किंवा एक महिला आहे म्हणून इंदिरा गांधींना हलक्यात घेता येणार नाही.

एका आयर्न लेडीशी सामना होणार आहे याची चुणूक तेव्हा पहिल्यांदा दिसली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.