पर्रिकरांनी झटक्यात निर्णय घेतला आणि गोव्यातलं पेट्रोल रातोरात ११ रुपयांनी स्वस्त झालं…

आजकाल रोजच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदासाठी चाललेल्या मारामाऱ्या आपण पाहत असतो. सबंध  राज्याचा कारभार हाकायची संधी देणारी खुर्ची अनेकांचं स्वप्न असते. मुख्यमंत्र्याचा थाटमाट, त्यांच्या खुर्चीची ऐटच काही और असते. मुख्यमंत्री निघाले कि त्यांच्या पुढे मागे असणारा पोलिस गाड्यांचा ताफा या पदाची ताकद दाखवून देणारा होता.

मात्र आपल्या देशात असाही एक मुख्यमंत्री होऊन गेला जो स्कुटरवरून आपल्या ऑफिसला यायचा. आपल्या पदाच अवडंबर कधी त्यांनी केलं नाही. साधेपणा आणि स्वच्छ चारित्र्य ही त्यांची ओळख होती.

तुमच्या लक्षात आलंच असेल. ते मुख्यमंत्री म्हणजे मनोहर पर्रीकर.

त्यांचा जन्म उत्तर गोव्याच्या म्हापसा या गावी एका मराठी कुटुंबात झाला. लहानपणापासून शाळेत हुशार होते. वडीलांचं छोटसं दुकान होत. मात्र त्यांची इच्छा होती की मुलाने डॉक्टर अथवा सीए बनावं. पण मनोहर यांचा ओढा इंजिनियरिंग कडे होता.

त्यांना इंजिनियर व्हायचं होतं आणि तेही भारतातल्या सर्वोत्कृष्ट कॉलेजमधून. आयआयटी मुंबई 

आयआयटी मध्ये प्रवेश मिळवणे हे त्याकाळीही मोठं आव्हान असायचं. अत्यंत अवघड समजली जाणारी प्रवेश परीक्षा पास करून या संस्थेत प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोत्तम टॅलेंट म्हणून गणलं जातं. कोणतेही क्लासेस वगैरे न लावता फक्त अभ्यासाच्या जोरावर पर्रिकरांनी आयआयटी मुंबईमध्ये मेटालर्जी इंजिनियरिंगच्या पदवीसाठी प्रवेश मिळवला.

मात्र याच आयआयटीमध्ये आपल्या मित्रांना मदत करण्यातून ते विद्यार्थी चळवळीत आले आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीस सुरवात झाली.

अन्याय सहन करण्याची सवय पूर्वीपासूनच नव्हती. तिथल्या होस्टेल मेसच्या जेवणावरून एकदा विद्यार्थ्यांनी जोरदार वाद झाले. मनोहर पर्रीकर यांनी विद्यार्थ्यांना गोळा करून मेसवाल्या विरुद्ध जोरदार आंदोलन केलं व आपला हक्क मिळवला. पर्रीकर पुढे कॉलेजचे जनरल सेक्रेटरी देखील झाले.

आयआयटी मध्ये असतानाच यांच्यातील नेतृत्व गुण सामोरे आले. तिथे एक प्रचंड लोकप्रिय विद्यार्थी नेता म्हणून त्यांना ओळख मिळाली.

पुढे पासआउट झाल्यावर अमेरिकेला वगैरे नोकऱ्यांचे अमिष धुडकावून लावत गोव्याला परत आले. गोव्यातच एक नोकरी करून पाहिली पण त्यात मन रमले नाही. पुढे स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

हे सगळं सुरु होतंच मात्र सोबत त्यांनी सामाजिक भान देखील जपलेलं होतं. मापश्यातील लोकांचे छोटे मोठे प्रश्न ते मांडत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तर त्यांचा लहानपणापासूनच संबंध होता.

अशातच रामजन्मभूमीचे आंदोलन सुरु झाले व पर्रिकर या आंदोलनातून भारतीय जनतापार्टीकडे व एकूणच  राजकारणाकडे ओढले गेले.

पोर्तुगीजांचा छाप असलेल्या गोव्यात रामजन्मभूमीचे आंदोलन  रुजवण्यात मनोहर पर्रीकर यांचा मोठा वाटा राहिला. अयोध्येमध्ये कारसेवकांवर झालेल्या पोलिसांच्या हल्ल्यात पर्रिकर देखील जखमी झाले. पण तिथून ते गोव्यात परतले एक लोकप्रिय नेता बनूनच.

भाजपचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते प्रमोद महाजन यांनी ओळखल की या तरुणांना प्रोत्साहन दिल तर गोव्यात राजकीय चमत्कार घडू शकतो. रामजन्मभूमीच्या आंदोलनात काम जीव तोडून करणाऱ्या, गोव्याच्या कानाकोपऱ्यात भाजपला पोहचवणाऱ्या मनोहर पर्रीकर यांच्यातील क्षमतेचा प्रत्यय आला होता. महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी गोव्यात सरकार भाजपचे स्थापन करण्यासाठी सर्वपरीचे प्रयत्न सुरु केले.

मनोहर पर्रीकर यांना पाठींबा दिला व पक्षातर्फे लागेल ती सगळी मदत पुरवली गेली.

१९९१ मध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरले मात्र काँग्रेसचे हरिश झांट्ये यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर १९९४ मध्ये त्यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दणदणीत विजय मिळवला.

२००० मध्ये पर्रिकर सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले. सामान्य गोवेकरांचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती. ते स्कूटीवरून मुख्यमंत्री कार्यालयात जायचे. स्कूटीवरून जातानाचे पर्रिकरांचे अनेक फोटो तेव्हा व्हायरल झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरही पर्रिकर पणजीतील शासकीय निवासस्थानी न राहता म्हापसा येथील वडलोपार्जित घरात राहायचे.

विशेष म्हणजे देशातील पहिले आयआयटी पदवीधर मुख्यमंत्री हा बहुमान पर्रिकर यांना मिळाला.

२००५ साली मनोहर पर्रीकर यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. पुढच्या दोनच वर्षात आलेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपचा मोठा पराभव झाला. पर्रिकरांनी पुन्हा शून्यापासून सुरवात करायचं ठरवलं.

२०१२ साली जनसंपर्क यात्रा काढत जनतेशी संवाद साधला. जनतेचे प्रश्न काय आहेत ते त्यांनी समजावून घेतले. पर्यटन हाच गोव्याच्या इकॉनॉमीचा मुख्य आधार होता. जगभरातून आलेल्या पर्यटकांना सुखसोयी उपलब्ध करून दिल्या तर त्याचा फायदा थेट नागरिकांना होईल याचा त्यांना अंदाज आला.

प्रचारावेळी लोकांशी थेट संपर्क केल्याचा योग्य परिणाम झाला. या यात्रेचं फळ पर्रिकर आणि भाजपला मिळालं व २१ आमदारांसह पूर्ण बहुमतातलं भाजपचं सरकार गोव्यात विराजमान झालं.

दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या झाल्या मनोहर पर्रीकर यांनी एक धडाकेबाज निर्णय घेतला. तो निर्णय होता,

राज्यातल्या पेट्रोलवरून व्हॅट हटवणे.

त्याकाळच्या मानाने हा क्रांतिकारी निर्णय होता. राज्याच्या तिजोरीवर मोठा खड्डा पडणार याची पर्रीकरांना जाणीव होती पण तरीही जाणीवपूर्वक त्यांनी हे निर्णय घेतले. अगदी रातोरात गोव्याचं पेट्रोल चक्क ११ रुपयांनी खाली आलं.

इतर राज्यांच्या मानाने गोव्यात पेट्रोल प्रचंड कमी किंमतीत मिळू लागलं.

यावरून देशभरात खळबळ उडाली. विरोधकांनी पर्रीकरांवर टीका देखील केली पण ते मागे हटले नाहीत.दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, सायबरएज योजना, सीएम रोजगार योजना या माध्यमातून पर्रिकर यांनी गोवेकरांच्या हृदयसिंहासनावर राज्य केलं. त्यामुळेच गोव्याला सलग तीन वर्षे योजना आयोगाने ‘बेस्ट गव्हर्निंग स्टेट’ हा बहुमान दिला. पुढे ते राष्ट्रीय राजकारणात गेले. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना संरक्षण मंत्री बनवण्यात आलं.

आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या तिसऱ्या टर्मवेळी मनोहर पर्रिकर यांना कॅन्सरने घेरलं. तरीही त्यांनी अगदी जिद्दीने आपलं सरकार चळवळ. बजेट देखील सादर केलं. पण हि लढाई ते जिंकू शकले नाहीत. १७ मार्च २०१९ रोजी त्यांचे निधन झाले. 

पर्रिकरांनी पेट्रोलवरचा व्हॅट काढून टाकला  या गोष्टीला जवळपास ९ वर्षे उलटली. आज पेट्रोलने देशभरात शंभरी पार केली मात्र कोणतेही सरकार एवढा धाडसी निर्णय घेऊ शकत नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.