भाजपचा भविष्याचा नेता कोण यावरून दुसऱ्या फळीची स्पर्धा वाढली होती…

आज देशातलाच नव्हे तर जगभरातला सर्वात शक्तिशाली पक्षांपैकी एक म्हणजे भारतीय जनता पार्टी. सध्या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपची मजबूत पकड बनली आहे. मोदी व गृहमंत्री अमित शाह हे दोघेही देशाच्या कानाकोपऱ्यात पक्षाला नेऊन पोहचत आहेत. कधी स्वप्नात देखील विचार केला नाही अशा राज्यात देखील भाजपची सत्ता आहे.

कोट्यवधींची सदस्य संख्या असलेल्या भाजपची पूर्वीची अवस्था आजच्या प्रमाणे नव्हती.

पूर्वाश्रमीच्या जनसंघातून तयार झालेला पक्ष भारतीय जनता पार्टी. इंदिरा गांधींच्या आणीबाणीला विरोध म्हणून तयार झालेल्या जनता सरकारचा भ्रमनिरास झाल्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भाजप स्थापन केला.

यात सर्वात आघाडीवर होते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी. वाजपेयी यांचं नेतृत्व तस बघायला गेलं तर मवाळ होतं. गांधीवादी समाजवादी विचारांवर चालून देशाची प्रगती शक्य आहे यावर त्यांचा विश्वास होता. भाजपची सुरवातीची वाटचाल याच विचारांवर चालली.

मात्र १९८४ साली आलेल्या काँग्रेसच्या लाटेत भाजपची धूळदाण उडाली. इंदिरा गांधींच्या हत्येननंतर राजीव गांधी यांच्याबद्दल देशभरात सहानुभूती पसरलेली. त्यावेळच्या निवडणुकीत भाजपचे दोनच खासदार निवडून आले. स्वतः वाजपेयी अडवाणी पराभूत झाले होते.

तेव्हा मात्र भाजपने स्वतःच वेगळं रूप द्यायचं ठरवलं. वाजपेयींच्या जागी अडवाणींनी नेतृत्व स्वीकारलं. मवाळपंथी विचारसरणी टाकून आक्रमक भूमिका घेण्यात आली. निवडणुकीच्या आधी राम जन्मभूमी चा मुद्दा संपूर्ण देशात पोहचवायचं असं ठरवलं.

वाजपेयी काहीसे मागे पडले होते. नेमक्या याच काळात भाजपची दुसरी फळी आकारास आली.

या दुसऱ्या फलित होते प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, अरुण जेटली, वेंकैय्या नायडू, राजनाथ सिंह  असे तरुण नेते. हे नेते सुशिक्षित होते, त्यांची संघ नेवर पकड होती. अमोघ वक्तृत्व त्यांना मिळालेलं. आणीबाणीच्या सारख्या संकटात त्यांनी कारावास भोगला होता.

विशेषतः प्रमोद महाजन प्रचंड उत्साही होते. त्यांनी गोपीनाथ मुंडे याना सोबतीला घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात भाजपला पोहचवलं. शेठजी भटजी यांचा पक्ष म्हणून टीका होत असलेल्या पक्षाला या दोन्ही नेत्यांनी तळागाळात शेतकरी बहुजन समाजात नेलं. अनेक तरुण कार्यकर्ते भाजपशी जोडले गेले.

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवर हि किमया करण्यासाठी प्रमोद महाजन झटत होते. रामजन्मभूमी यात्रा हि देखील त्यांचीच कप्लना. प्रमोद महाजन यांनी वाजपेयींचा क्रोध सहन करून रथयात्रा काढली. अडवाणी या रथाचे सारथ्य करत असले तरी मुख्य सूत्रे महाजनांच्या हातात होती. याचा फायदा त्यांना झाला.

पुढे १९९६ साली भाजपची सत्ता केंद्रात येण्यामागे प्रमोद महाजन होते. भाजपतर्फे वाजपेयी पहिले पंतप्रधान झाले. महाजनांना त्यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रिपद देण्यात आलं. पण दुर्दैवानं हे सरकार फक्त १३ दिवस टिकलं. वाजपेयींना महाजनांचे महत्व त्या दिवशी लक्षात आलं. पुढे महाजन वाजपेयींचे हनुमान बनले.

दोघांनी आपल्या चातुर्याने भाजपला अनेक मित्रपक्ष गोळा केले. महाजनांची परिस्थिती हाताळण्याची हातोटी व मित्र जमवण्याची क्षमता यामुळे वाजपेयी दोनवेळा पंतप्रधान  बनले.

वाजपेयींच्या पंतप्रधान पदाच्या काळात महाजन यांचे वाढत असलेले महत्व भाजपमधल्याच अनेकांना सहन होत नव्हते. महाजन भावी पंतप्रधान आहेत, वाजपेयींचे वारसदार तेच आहेत या चर्चा जोर धरू लागल्या. तेव्हाच त्यांचे पंख कापायचे यासाठी प्रयत्न सुरु झाले.

त्यांच्याबरोबर मुख्य स्पर्धा होती सुषमा स्वराज यांची व अरुण जेटली यांची.

लालकृष्ण अडवाणी यांचा रोष ओढवून घेतलेले महाजन मात्र वेगळ्याच आत्मविश्वासात होते. त्यांची व धीरूभाई अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींची मैत्री देखील अनेकांना खटकत होती. पण प्रमोद महाजन आपल्यावरील ठिकाण भाव देण्यार्यातले नव्हते.

राजस्थानच्या वसुंधरा राजे किंवा मध्यप्रदेशचे बाबूलाल गौर यासारखे मुख्यमंत्री प्रमोद महाजनांच्या आग्रहावरून पक्षाने निवडले. सुषमा स्वराज यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध केंद्रीय राजकारणातून काढून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर बसविण्याची व पुढे सोनिया गांधींविरुद्ध बेल्लारी मतदार संघात उभे करण्याची खेळी प्रमोद महाजनांची आणि उमाभारतींना मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या त्यांच्या गच्छंतीनंतर वाट्याला आलेला विजनवास भोगायला लावण्याची किमयाही त्यांचीच.

मुरली मनोहर जोशी, मदनलाल खुराणा, अरुण जेटली, सुषमा स्वराज या साऱ्यांच्या अगोदर महाजनांचे  नाव पक्षात घेतले जायचे आणि त्यांचा शब्द संसदेतही आदराने ऐकला जायचा. प्रमोदच्या व्यक्तिमत्त्वाने अनेकांना नुसती भुरळच घातली असे नव्हे तर पार दिपवून टाकले होते.अंबाजोगाईसारख्या मराठवाड्यातील आडगावात एका सामान्य शिक्षकाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाने स्वकर्तृत्वाने गाठलेली ही उंचीच त्याचे वेगळेपण सांगणारी होती.

मात्र या मुळे त्यांनी आपल्या विरुद्ध असंख्य शत्रू निर्माण केले.

यातच होते पक्षप्रमुख वेंकैय्या नायडू. भाजपला दक्षिण भारतात पोहचवण्याच्या दृष्टीने पक्षाची सूत्रे नायडू यांच्या हातात दिली होती. पण नायडू यांच्यापेक्षा पक्षाचे सरचिटणीस प्रमोद महाजन जास्त शक्तिशाली होत होते. नायडू यांचे अरुण जेटली यांच्याशी चांगले संबंध होते.

२००४ सालच्या लोकसभा निवडणुकीआधी प्रमोद महाजन यांचे पंख कापले जावेत यासाठी प्रयत्न सुरु झाले. तत्पूर्वी येणाऱ्या प्रादेशिक निवडणुकांवेळी प्रमोद महाजन व सुषमा स्वराज यांची नाकेबंदी करण्यात आली.

आपल्याच नेत्यांकडून ही वागणूक मिळावी याच सुषमा स्वराज व प्रमोद महाजन यांना वैषम्य वाटलं. प्रमोद महाजन यांनी तर थेट बंडाचं निशाण फडकवलं. वाजपेयींचा पाठिंबा असल्यामुळे नायडू यांच्याशी झालेल्या वादात प्रमोद महाजन यांनी बाजी मारली. २००४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारची मुख्य जबाबदारी प्रमोद महाजनांकडेच देण्यात आली.

मात्र दुर्दैवाने भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला आणि प्रमोद महाजन भावी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतुन काहीसे मागे पडले. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर उरली सुरली आशा देखील संपुष्टात आली. आज त्यांच्याही पेक्षा तुलनेने राजकारणातील नवखे असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तर वेंकैया नायडू सध्या उपराष्ट्रपती आहेत. सुषमा स्वराज, अरुण जेटली, प्रमोद महाजन आज नाहीत. पण ते असते राजकारणात वेगळाच रंग असता हे नक्की.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.