बायकोने दिलेल्या १० हजारांच्या भांडवलावर पुण्यात इन्फोसिसची स्थापना झाली

गोष्ट आहे ७० च्या दशकातली. पुण्यात नरेंद्र पाटनी आणि पूनम पाटनी या दांपत्याने पटनी कॉम्प्यूटर्सची सुरवात केलेली. त्यांच्या कंपनीत सॉफ्टवेअर डिपार्टमेंटच्या हेडपदी एक तरुण इंजिनियर होता, नाव नारायण मूर्ती. मुळचा कर्नाटकचा. आयआयटी कानपूरमध्ये मास्टर्स पूर्ण करून आलेला.

त्यांच्या एकखांबी नेतृत्वाखाली पटनीच्या गगनभरारी सुरु होत्या.

एकेकाळी राजकारणात उडी घेऊन कम्युनिस्ट पार्टीची आंदोलने करायची स्वप्ने बघणारे नारायण मूर्ती कर्नाटकच्याच सुधा कुलकर्णीशी लग्न करून नोकरी संसाराला लागले होते.  सुधा या पुण्याच्या टाटा मोटर्समध्ये नोकरीला लागणाऱ्या पहिल्या महिला इंजिनियर होत्या.

एका कॉमन मित्रामार्फत पुस्तकांच्या देवाणघेवाणीतून दोघे एकमेकांच्या संपर्कात आले आणि प्रेमात पडले. 

नारायण मूर्ती दिवसेंदिवस प्रगतीच शिखर गाठत होते. त्यांना पाटणी कम्प्युटर्सने ट्रेनिंगसाठी अमेरिकेला पाठवलं. तिथून परत आल्यावर त्यांनी मुंबईत बांद्रामध्ये एक फ्लट विकत घेतला. सुधा मूर्ती देखील टाटांच्या बॉम्बे हाऊस या ऑफिस मध्ये रुजू झाल्या. सुखाचा संसार सुरु होता. त्यांना आता एक गोड पुत्ररत्न देखील झालं होतं.

अचानक एक दिवस नारायण मूर्ती घरी आले आणि म्हणाले,

“मी नोकरीचा राजीनामा देऊन नवीन सॉफ्टवेअर कंपनी सुरु करायची म्हणतोय. “

सुधा मूर्ती यांना धक्का बसला. यापूर्वी एकदा नारायण मूर्तींनी कंपनीसुरु करायचा प्रयोग फसला होता. बराच पैसा आणि मनस्ताप या प्रकरणी खर्च झाला होतं. त्या आठवणी सुद्धा परत नको होत्या. सुधा यांनी आपल्या नवऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण अखेर नारायण मूर्ती यांनीच सुधाला तयार केले.

पण भांडवलाच काय?

नारायण मूर्ती आणि त्यांचे इतर सहा मित्र मिळून ही कंपनी सुरु करत होते. प्रत्येकजण १० हजार गुंतवणार होते. नारायण मूर्ती यांच्याकडे ते दहा हजार रुपयेदेखील नव्हते. त्यांनी सुधाकडे ते पैसे मागितले. सुधा आपल्या नकळत पैसे साठवते हे त्यांना ठाऊक होतं पण त्या पैसे देण्यासाठी तयार झाल्या नाहीत.

लग्नापूर्वी देखील ते दोघे जेव्हा डेट वर जायचे तेव्हा बिल भरायच्या वेळी मूर्ती कधीच पैसे काढायचे नाहीत. सुधा मूर्ती बिचाऱ्या सगळा हिशोब लिहून ठेवायच्या पण पैसे कधीच मिळाले नाही. एवढ्या साठीच त्यांना नारायण मूर्तीनां आपण साठवलेले पैसे द्यायचे नव्हते.

पण शेवटी नवऱ्याची क्षमता त्यांना ठाऊक होती. त्याच्या पाठीशी उभ रहायचं ठरवलं. दोघांनी आपआपल्या सुखाच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि

आपल्या लाडक्या पुण्याला परत आले. कंपनीच नाव ठरलं,

“इन्फोसिस”

मूर्तींनी पुण्यातच एक घर घेतलं. भांडवल इतक कमी होत की याच घरात इन्फोसिसच ऑफिस होतं. शिवाजीनगरला पद्मनाभन हौसिंग सोसायटीमधल्या या फ्लॅटमध्ये  नारायण मूर्ती यांचे एक मित्र आणि सहकारी नंदन निलेकणी यांचं कुटुंबसुद्धा राहायला होतं. खर्च वाचण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न सुरु होते.

25c8ebf8 6961 49b9 8b63 a5bfa0d144d2

सुधा मूर्ती तेव्हा घरखर्च चालवा यासाठी पुण्यातच वालचंदमध्ये नोकरी करायच्या. पण त्याशिवाय इन्फोसिसचे प्रोग्राम लिहिण्यापासून ते कर्मचार्यांना चहा बनवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच होती.

पण पुण्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होत. कित्येकदा सिनेमा पाहण्यासाठी त्या सायकलवरून कँपच्या थिएटरमध्ये जात. फर्ग्युसन कॉलेजरोड वर रविवारी भटकत. तिथल्या कॅफेमध्ये मित्रांसोबत गप्पांचे अड्डे टाकत. पुण्यातच रहायचं त्यांचं फायनल झालेलं.

पण या काळात काही अशा घटना घडल्या की त्यांना पुणे सोडून बेंगलोरला जावे लागले. 

इन्फोसिसमध्ये बरेच इंजिनियर दाक्षिणात्य होते. त्यांना आपल्या घरापासून दूर परभाषिक पुण्यात राहणे एवढे पसंत नव्हते. पुण्यामुंबईत राहण्याचा खर्चदेखील तुलनेने जास्त होता. इथल जेवणदेखील त्यांना सूट होत नव्हत.

याच दरम्यान मूर्ती कुटुंबाला दुसर बाळ झालं. या बाळाच्या देखभालीसाठी सुधा यांच्या आई वडिलाना पुण्याला येणे शक्य नव्हते. नोकरी, इन्फोसिसची कामे यातून सुधा मूर्ती यांची ओढाताण सुरु होती. गावाकडून आलेली एक मुलगी देखील टिकली नाही.

नंदन नीलेकणी यांची पत्नी रोहिणी मूर्तींच्या पोरीला सांभाळायची आणि सुधा मूर्ती कोडींग करायच्या.

त्याकाळात भारतात लायसन्स राज सुरु होता. गंमत म्हणजे इन्फोसिससारख्या सोफ्टवेअर कंपनीकडे स्वतःचा कॉम्प्यूटरदेखील नव्हता. साधे टेलिफोन कनेक्शन मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट बघायला लागत होती. अशात स्वतःचा व्यवसाय चालवायचा तर खूप अवघड होत चालल होतं.

एकदा नारायण मूर्ती यांना विमानात कर्नाटक राज्याचे औद्योगिक गुंतवणूक व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष भेटले. योगायोगाने त्यांचे नाव देखील नारायणमूर्ती होते. त्यांनी इन्फोसिसला बेंगलोरला येण्याचे निमंत्रण दिले व लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. कमी दरात वीज व इतर सोयी सुविधा देण्याबद्दल त्यांनी सांगितलं.

नारायण मूर्ती यांनी बेंगलोरच्या दृष्टीने चाचपणी सुरु केली.

बेंगलोरमध्ये मायको नावाची एक प्रतिथयश कंपनी होती. विक्रम भट्ट त्याचे अध्यक्ष होते. मूर्ती आणि त्यांचे एक सहकारी त्यांना जाऊन भेटले. आपल्या कंपनीची ओळख करून दिली. आपल्या बोलण्यातून पटवून दिले की इन्फोसिस ही भारताचा भविष्यकाळ असणार आहे. अखेर विक्रम भट्ट यांनी त्यांना सव्वा करोड रुपयाची ऑर्डर दिली. ते फक्त म्हणाले,

“पुढच्यावेळी मिटिंग साठी येताना स्कूटरच्या ऐवजी कार मधून या”

नारायणमूर्ती यांच्या कडे त्याकाळात कार नव्हती. एका मित्राकडून गडबडीत स्कूटर मागून ते त्या मिटिंगला गेले होते. ती मिटिंग इन्फोसिसचं नशीब पालटवणारी ठरली.

१९८३ साली इन्फोसिस आणि मूर्ती कुटुब पुणे सोडून बेंगलोरला आले. कर्नाटकातली ती पहिली आयटी कंपनी ठरली.

नारायण मूर्ती यांनी पुण्यातील घर विकलं. ते घर सोडताना सुधा मूर्ती दिवसभर रडल्या. पुण्याशी त्या भावनिकदृष्ट्या जोडल्या गेल्या होत्या. ते त्यांचं पहिलं घर होत. आजही पुण्याबद्दल बोलताना त्या म्हणतात,

“आम्ही पुण्यात होतो म्हणून इन्फोसिसने जन्म घेतला.”

पुढच्या काळात राजीव गांधीनी भारतात संपर्क क्रांती केली. आयटी क्षेत्रावरचे सगळे निर्बंध उठवले. महाराष्ट्रातही शरद पवारांसारख्या तरुण मुख्यमंत्र्याने भावी काळाची पावले ओळखून हिंजवडीमध्ये आयटीपार्क सुरु केलं. आज तिथेही इन्फोसिसच एक ऑफिस आहे.

मात्र त्यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी दूरदृष्टी झाली असती तर म्हैसूरला असलेल इन्फोसिसचं महाप्रचंड हेडक्वार्टर्स हिंजवडी मध्ये असते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.