काही जैन मुनी पांढरे कपडे घातलेले तर काही नग्न असे का?

धर्म परंपरा हा कायम आस्था आणि आकर्षणाचा विषय असतोय.

आपण कुठे कुठे या परंपरा पाहतो आणि आपण याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या सर्वांच्या पाहण्यात जैन साधू असतात आणि यांना पाहिल्यावर आपल्या मनात एक प्रश्न तयार होतो की यातल्या काहींनी पांढरे कपडे घातलेले असतात तर काही नग्न असतात.?

याला एक इतिहास आहे त्याच झाल की चंद्रगुप्त मौर्याच्या काळात  (कार. इ. स. पू. ३२२–२९८) मगधात मोठा दुष्काळ पडला होता अन्न,पाणी यासाठी वणवण झालेली. त्यावेळी आचार्य भद्रबाहूंच्या नेतृत्वाखाली १२,००० जैन अनुयायी दक्षिणेत गेले. जे अनुयायी मगधातच राहिले त्यांचे नेतृत्व आचार्य स्थूलभद्र यांनी केले. पुढे पुढे स्थूलभद्रांनी एक परिषद भरवून जैन धर्मात काही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. परंतु भद्रबाहू दक्षिणेतून मगधात परतल्यावर त्यांनी हे नवे निर्णय मान्य केले नाहीत. या मतभेदातूनच पुढे जैन धर्मात श्वेतांबर व दिगंबर असे दोन प्रमुख पंथ निर्माण झाले. या दोन पंथांतील वेगळेपणा इ. स. पहिल्या शतकात स्पष्ट दिसू लागला आणि नंतर त्याला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले.

दिगम्बर  पंथ आणि परंपरा 

भद्रबाहू आपल्या शिष्यांसह दक्षिण भारतात आला. त्यावेळी त्याच्या सोबत वृद्ध चंद्रगुप्त मौर्य राजा होता. चंद्रगुप्त मौर्याने त्याचे अखेरचे आयुष्य श्रवणबेळगोळ येथे घालविले, असे जैन परंपरा सांगते;  ‘दिगंबर’ शब्दाचा अर्थ “दिशा” हेच ज्याचे वस्त्र आहे म्हणजे नग्न, असा होतो. दिगंबर पंथाचे अनुयायी मोक्षप्राप्त्यर्थ नग्नतेचा पुरस्कार करतात.

यामुळे दिगंबर पंथाचे आदर्श साधू नग्न असतात. त्यांच्याजवळ मोरपिसांचा कुंचा किंवा पिंछी कमंडलू (कुंडिका) व शास्त्रग्रंथ या वस्तू असतात. दिवसातून एक वेळच ते अन्नपाणी घेतात. उभे राहून व पात्राचा उपयोग न करता हातातून ते अन्न सेवन करतात. पूर्वी वनात राहणारे साधू आता गावातील मंदिरांमध्ये किंवा मठांमध्ये राहतात. काही साधू वस्त्र धारण करणारे आहेत. त्यांना “क्षुल्लक” म्हणतात.

श्वेतांबर पंथ आणि परंपरा 

श्वेतांबर पंथाचे साधू पांढरे कपडे घालतात कारण पांढर कापड हे त्यागी आणि संयमी जीवनाच प्रतीक आहे तर रंगीत कापड हे विलासी जीवनाचं प्रतीक आहे.आणि हे वस्त्र फक्त पांढऱ्या रंगाच असून चालत नाही तर सुती आणि कापसापासूनच बनवलेल हव असा नियम आहें. पात्र, पात्रबंध, पात्रप्रमार्जनिका, रजस्त्राण, दोन चादरी, मुखवस्त्र अश्या चौदा गोष्टी ते जवळ बाळगतात. सुरूवातीला उपकरणांची संख्या कमी होती व जरूरी असेल तेव्हाच कटिवस्त्र धारण करीत. पुढे या कटिवस्त्राचा विस्तार होत गेला.

जैन परंपरेतील मूर्तिपूजा

मूळच्या जिनप्रतिमा नग्नस्वरूपात होत्या; परंतु मंदिरासंबंधी व मूर्तीसंबंधी वाद होऊ लागले, तेव्हा श्वेतांबर पंथीय अनुयायी वस्त्रांकित मूर्तीची पूजा करू लागले व मूर्तीवर पूजेच्या वेळी इतर अलंकारही घालू लागले. दिगंबरांच्या मंदिरात पुजारी जैन धर्मीय असतो; परंतु श्वेतांबर मंदिरामध्ये अन्य धर्मीयही मूर्तीची पूजा करू शकतो. आंघोळ करून व धुतलेली वस्त्रे नेसून जैन श्रावक मूर्तीची जलपूजा, चंदनपूजा आणि पुष्पपूजा करतो. धूपपूजा, दीपपूजा, अक्षतपूजा, नैवेद्यपूजा आणि फलपूजा हे पूजेचे इतर प्रकार श्रावक किंवा श्राविका साध्या पोशाखातसुद्धा करू शकतात.

विशेष प्रसंगी सवाल धरून पूजा करण्याचा मान मिळविला जातो. संध्याकाळी मंदिरामध्ये आरती केली जाते.तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी – उदा., अबू , गिरनार, शत्रूंजय इ. ठिकाणी – मोठया ऐश्वर्याने पूजा केली जाते व ती अधिक पुण्यकारक समजली जाते.

भारतामध्ये राहणाऱ्या जैन धर्मीय लोकांतील दिगंबरांची वस्ती मुख्यत्वेकरून महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू आणि श्वेतांबरांची वस्ती मुख्यत्वेकरून गुजरात व राजस्थान यांमध्ये आढळते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.