श्रीरंगपुरचे पोलीस कमिशनर म्हणून आयुष्यभर त्यांचा धाक राहिल..

साधारण १९९० चा काळ. महेश कोठारेचा पंचाक्षरी सिनेमा. सगळा फॉर्म्युला सेट असायचा. लक्ष्या आणि इन्स्पेक्टर महेश ज्याधवची जोडी. या दोघां एवढे बाकीचे करेक्टर सुद्धा फेमस होते. तात्या विंचू, टकलू हैवान, झगड्या रामोशी, कवट्या महाकांळ सारख्या कर्दनकाळ नावे असणारे व्हिलन. लक्ष्याची प्रेमळ आई,  वेंधळ्या लक्ष्याची खाष्ट गर्लफ्रेंड आवडाक्का.

हिचा बाबा बऱ्याचदा हवालदार असायचा. आणि इन्स्पेक्टर महेश जाधवची गर्लफ्रेंड?? ती मात्र असायची पोलीस कमिशनरची मुलगी.

हे पोलीस कमिशनर म्हणून एक चेहरा कायम असायचा. करारी चेहरा, नाकाखाली छोटीशी मिशी, अत्यंत प्रामाणिक कठोर आणि लक्ष्या महेशला पाठीशी खबीर उभे असणारे डीसीपी डोईफोडे.

महेशची बदली ‘श्रीरंगपूर’ ला करणे, लक्ष्याने घातलेले घोळ सावरणे आणि शेवटी जाऊन व्हिलनला ताब्यात घेणे हि त्यांची मुख्य कामे.

हा रोल कायम असायचा जयराम कुलकर्णी यांच्याकडे.

जयराम कुलकर्णी मुळचे बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे गावचे. अगदी गावाकडच्या शाळेत असताना गॅदरिंगमध्ये मोरूची मावशी या नाटकात काम केल आणि तेव्हापासूनच त्यांना अभिनयाची गोडी लागली.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. स.प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवलकर असे नाटकाचे वेड असणारे मित्र भेटले. पु.ल.देशपांडे यांच्या अंमलदार नाटकात त्यांनी केलेला ग्रामीण बाजाचा हणम्याचा रोल प्रचंड गाजला.

याच रोल मुळे त्यांना पुणे आकाशवाणीमध्ये नोकरी मिळाली.

जेष्ठ लेखक व्यंकटेश माडगूळकर तेव्हा आकाशवाणीचे प्रमुख होते. त्यांच्या असिस्टंटपदाची जबाबदारी जयराम कुलकर्णी यांच्याकडे आली. त्याकाळात ग्रामीण भागातील जनतेला आवडेल  असे शेती विषयकचे, जनजागृतीवाले कार्यक्रम गावाकडच्या भाषेत सादर केले जायचे.

माडगूळकरांनी लिहिलेली प्रहसने अस्सल मातीतल्या भाषेत सादर करण्यासाठी जयराम कुलकर्णी आघाडीवर असायचे. त्यांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीचे वाचन जयराम कुलकर्णी यांनीच केले.

अगदी खेडोपाड्यातही जयराम कुलकर्णी याचं नाव पोहचलं. त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध झाले.  व्यंकटेश माडगुळकर यांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता.

आकाशवाणी च्या काळात दर्जेदार साहित्य त्यांच्या वाचनात आले. पुलं देशपांडे, गदि माडगुळकर अशा थोर साहित्यिकांशी, मोठमोठ्या कलाकारांशी थेट ओळख झाली. एक कलाकार म्हणून घडण्यासाठी त्याचा त्यांना फायदा झाला. भाषेतला लेहजा पकडण्याची कला त्यांना गवसली होती.

यामुळेच ग्रामीण रोल वर त्यांचा हातखंडा बसला होता. आकाशवाणीच्या नोकरीबरोबरच नाटकातली कामे सुरूच होती.

अशातच त्यांना सिनेमाचे ऑफर येऊ लागले. जेष्ठ सिनेदिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम यांना पहिल्यांदा चित्रपटात काम दिले. त्याकाळात मराठी सिनेमाचे शुटींग बहुतांशी कोल्हापूरला किंवा मुंबईला व्हायचे. या दोन्ही टोकाच्या ठिकाणचे शुटींग आणि मध्ये पुण्यातील आकाशवाणीची नोकरी यात जयराम कुलकर्णी यांची तारेवरची कसरत सुरु झाली.

त्यामुळेच अखेर १९७० मध्ये त्यांनी आपल्या सुरक्षित नोकरीचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवले आणि पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राला वाहून घेतलं.

आकाशवाणीच्या शेतीवरच्या कार्यक्रमातील प्रसिद्धीमुळे  चित्रपटातही काम करताना जयराम कुलकर्णी यांना सुरूवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका मिळत गेल्या. त्यांची कॉमेडीवरील पकड पाहता पुढे विनोदी भूमिका सुद्धा ऑफर होऊ लागल्या.

हा काळ अशोक सराफ आणि लक्ष्याचा होता. त्यांच्या विनोदाच्या टायमिंग ला मॅच करणारे अभिनेते मराठीत फारच कमी असायचे. जयराम कुलकर्णी यांनी मात्र यात स्पेशालिटी सिद्ध करून दाखवली.

Untitled

लक्ष्याबरोबरच अशोक सराफ बरोबर देखील त्यांची जोडी जमली. त्यांच्या प्रत्येक सिनेमात छोट्या मोठ्या रोल मध्ये गंभीर चेहऱ्याने वावरणारे जयराम कुलकर्णी यांना कोणीही विसरू शकणार नाही.

उदाहरणच घ्यायचं झाल तर माझे पती करोडपती या सिनेमातील एक सीन.

अशोक सराफ हा जयराम कुलकर्णी यांच्या ऑफिसमधील एक वेंधळा कर्मचारी आहे. त्याने काही तरी कामात घोळ घातलेला असतो. कुलकर्णी त्याला लुकतुके म्हणून हाक मारतात, अशोक सराफ त्यांच्या केबिनमध्ये येतो, सुरवातीला त्यांच्या शिव्या खातो मात्र बोलता बोलता तो त्यांनाच फिरवतो.

“काय लाज शरम आहे कि नाही…आम्हा लोकांना? सांगितलेलं एक काम धड करत नाही…आम्ही लोक…आजच्या आज जर कोटेशन पोहचले नाहीत तर उद्या आम्हाला ऑफिसमध्ये घ्याल तर याद राखा !”

अशोक सराफने या सीन मध्ये भन्नाट काम केलंय, पण त्याच्या काउंटर अटॅकने गांगरून गेलेला बॉस सुद्धा जयराम कुलकर्णी यांनी तितकाच भारी रंगवलाय. सचिन पिळगावकर असो कि महेश कोठारे, त्यांनी आपल्या सिनेमात जयराम कुलकर्णी यांच्यावर विश्वास दाखवला.

आजही आपण पाहिलं तर त्याकाळच्या गाजलेल्या प्रत्येक सिनेमात जयराम कुलकर्णी छोट्या मोठ्या रोल मध्ये हमखास दिसतील. 

धूमधडाका, ‘झपाटलेला, माहेरची साडी, नवरी मिळे नवरयाला, आमच्या सारखे आम्हीच’ अशी ही बनवाबनवी , आयत्या घरात घरोबा,  माफीचा साक्षीदार, बजरंगाची कमाल, चल रे लक्ष्या मुंबईला,  गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’अश्या  जवळपास १५०  चित्रपटांमधे त्यांनी साकारलेल्या चरित्र भूमिका संस्मरणीय ठरल्या.

अशा या जेष्ठ कलाकाराचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८८ वर्षांचे होते. सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही त्यांची सून होती,  जयराम कुलकर्णी यांच्यामागे पत्नी डॉ. हेमा कुलकर्णी, मुलगा रुचिर आणि सून मृणाल असा परिवार आहे.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.