शांतारामबापूंनी रवी कपूरचं नाव बदललं आणि तो सुपरस्टार “जितेंद्र” झाला

नाव बदलणं ही काही नवी गोष्ट नाही. सिनेसृष्टीत दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी काहीतरी वेगळं नाव ठेवणारी अनेक नट मंडळी पाहायला मिळतात. मराठीत तुलनेने कमी पण हिंदी सिनेसृष्टीत नाव बदलणारे अनेक कलाकार आपल्या सर्वांना माहीत आहेतच. राजेश खन्ना पासून अक्षय कुमार पर्यंत अनेक कलाकारांची उदाहरणं देता येतील.

परंतु हिंदी सिनेसृष्टीतील एका सुपरस्टारचं नाव बदलण्याच्या मागे भारतीय सिनेसृष्टीमधले महान निर्माते आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचा हात होता.

तो सुपरस्टार म्हणजे एव्हरग्रीन अभिनेता जितेंद्र. 

जितेंद्रचं मूळ नाव रवी कपूर. मुंबईच्या गिरगावातल्या एका चाळीत रवीचं बालपण गेलं. रवीचे बाबा आणि काका सिनेमांसाठी दागिने पुरवण्याचं काम करायचे. गिरगावातील सेंट सबॅस्टीयन शाळेत रवीचं प्राथमिक शिक्षण पार पडलं. पुढे मुंबईतल्याच सिद्धार्थ कॉलेज मध्ये रवी पुढील शिक्षण घेत होता. कॉलेजमध्ये शिकत असतानाच रवीच्या बाबांचं हृदयविकाराने निधन झाले. यामुळे अचानक संपूर्ण घराची आर्थिक जबाबदारी रवीच्या खांद्यावर आली. 

त्या तरुण वयात पैसे कमावण्यासाठी नेमकं काय करावं हे रवीला कळत नव्हतं. घराचा आर्थिक भार सांभाळणं त्याला भाग होतं. त्याला कल्पना होती की, वडील आणि काका अनेक वेळा व्ही. शांताराम यांच्या सिनेमांसाठी दागिने पुरवायचे. त्यामुळे रवीने काकांसमोर व्ही. शांताराम यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. 

काकांच्या मध्यस्थीने रवीची व्ही. शांताराम यांच्याशी ओळख झाली.

रवीने गेल्या गेल्या त्यांच्यासमोर सिनेमात एखादी भूमिका देण्याची विनंती केली, जेणेकरून थोडेफार पैसे मिळू शकतील. सिनेसृष्टीत मुरलेले व्ही. शांताराम सहजासहजी कोणालाही सिनेमात घेणार नाहीत हे उघड होतं. व्ही. शांताराम हे भावनेपेक्षा समोरच्या व्यक्तीमध्ये असणारं टॅलेंट शोधायचे. त्यामुळे जेव्हा रवीने त्यांना सिनेमात घेण्याविषयी विचारणा केली तेव्हा व्ही. शांताराम यांनी ‘तू माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस’ असं स्पष्ट सांगितलं. 

व्ही. शांताराम काहीतरी काम देतील, ही अपेक्षा ठेवलेल्या  रवीचा यामुळे मोठा अपेक्षाभंग झाला. परंतु सुदैवाने पुढच्या काही दिवसातच व्ही. शांताराम यांच्याकडून रवीला बोलावणं आलं. व्ही. शांताराम यांना रवी जाऊन भेटला. शांताराम बापू आता कुठलीतरी भूमिका दिसेल अशी रवीला अपेक्षा होती.

त्यादिवशी रवी सोबत आणखी सहा जणांची निवड झाली होती. ‘जेव्हा कोणी अभिनेता आजारी पडेल किंवा त्याला एखादी भूमिका काही कारणास्तव करायला जमणार नाही तेव्हा तुम्हाला संधी देण्यात येईल.

फक्त तुम्हाला रोज स्टुडिओत यावं लागेल’, “असं रवी सकट त्या सहाजणांना सांगण्यात आलं” 

घरची आर्थिक परिस्थिती फारच बिघडल्यामुळे शांताराम बापूंकडून मिळालेलं हे काम रवीने स्वीकारलं.

महिन्याचे १०५ रुपये मिळणार होते. दररोज राजकमल स्टुडिओमध्ये सिनेमात काम मिळण्याच्या आशेने रवीच्या फेऱ्या व्हायच्या. दिवसांमागून दिवस जात होते. हळूहळू शांताराम बापूंच्या नजरेत रवी चमकला. काही दिवसानंतर शांताराम बापू त्यांच्या एका नव्या सिनेमाची तयारी करत होते. या सिनेमातील एका भूमिकेसाठी त्यांनी रवीला स्क्रीन टेस्टसाठी बोलवलं. 

शांताराम बापूंकडून असं बोलावणं आल्यामुळे रवीला काहीसं आश्चर्य वाटलं. याचं कारण असं, याआधी शांताराम बापूंच्या ‘सेहरा’ या सिनेमासाठी रवीने स्क्रीन टेस्ट दिली होती. त्यावेळी एक डायलॉग बोलण्यासाठी रवीला ३० टेक घ्यावे लागले होते. त्यामुळे ‘सेहरा’ सिनेमामधून रवीला काढण्यात आलं होतं. म्हणून शांताराम बापुंकडून नव्या सिनेमाच्या स्क्रीन टेस्टचं बोलावणं आल्यामुळे रवीला आश्चर्य वाटणं साहजिक होतं. 

अखेर अनेक टप्पे पार करून, रवी नव्या सिनेमाची स्क्रीन टेस्ट पास झाला आणि त्याची सिनेमासाठी निवड झाली.

या सिनेमासाठी रवीला १०० रुपये मानधन मिळणार होतं. पण शांताराम बापूंना एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे रवीचं नाव. त्यांनीच मग रवी कपूर हे नाव बदलून त्याचं नाव जितेंद्र ठेवलं. या नव्या सिनेमाचं दिग्दर्शन स्वतः व्ही. शांताराम करणार होते आणि या सिनेमाचं नाव होतं ‘गीत गाया पत्थरो ने’. जितेंद्रचा हा पहिला सिनेमा. 

अशाप्रकारे रवी कपूरचा जितेंद्र झाला. आणि हेच नाव पुढे ठेवून जितेंद्र हिंदी सिनेसृष्टीतला मोठा स्टार झाला. आयुष्याच्या सुरुवातीला शांतारामबापूंनी दिलेली शिकवण आजही जितेंद्र विसरला नाही. त्याच्या पिढीतले अनेक नट अजूनही हिंदी सिनेसृष्टीत सक्रिय आहेत.

पण जितेंद्र मात्र कुठल्याही मोहाला बळी न पडता वेळीच बॉलीवूड मधून रिटायर होऊन स्वतःचं जीवन समाधानाने जगत आहे.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.