कच्छी दाबेलीच काय तर त्याही पुढं जाऊन कच्छी समाजानं मुंबईला बरंच काही दिलंय!

कच्छी दाबेली नुसतं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतंय. पहिले तर पांढऱ्या पावावर उठून दिसणार तो बटाट्याच्या भाजीचा लाल कलर, त्यावर भुरभुरलेल्या शेवेचा पिवळा कलर आणि बटर टाकून दाबेली शेकताना येणारा तो पावाचा खमंग वास….अहाहा पार लांबून दाबेलीच्या गाड्याजवळ आपल्याला ओढून आणतो.

एकदा का तुम्ही गाड्यावर आला की मग तुम्हाला कसं खिळवून ठेवायचं हे दाबेलीवाल्याला बरोबर माहितेय. गोड ,आंबट, तिखट असे सगळे फ्लेवर दाबेलीच्या एका घासत मिळतात आणि मधेच मग शेंगदाणा किंवा डाळिंबाचा दाणा दाताखाली आला तर आह्हह्ह मग तर विचारूच नका.

आपल्या भिडूला मात्र खाण्याबरोबर इतर चौकश्या करण्याची नेहमीचीच सवय. मग काढली माहिती ही एवढी भारी डिश नक्की आलेय तरी कुठून ? तर याचं उत्तर होतं गुजरातमधल्या कच्छमधून. म्हणूनच तर नाव पडलं कच्छी दाबेली.

केशवजी गाभा चुडासमा (केशा मालम म्हणूनही त्यांना ओळखलं जातं ) यांनी सगळ्यात आधी कच्छमधील मांडावीमध्ये दाबेली विकायला सुरवात केली.

१९६०मध्ये केशवभाईंनी दाबेलीची किंमत ठेवली होती फक्त एक आणा. पुढे मग कच्छ मधले लोक भारतभर स्तलांतरित होत होते तेव्हा त्यांनी ही  डिश भारतभर पसरवली.

पण विषय असा आहे की भिडू कच्छची लोक हजारो वर्षांपासून स्तलांतरित होत होती आणि त्यांनी दाबेली बरोबरच इतरही गोष्टी त्यांनी भारताला आणि त्यातल्या त्यात मुंबईला दिल्यात. आता गुजराती म्हणजेच कच्छी असं तुम्ही समजत असाल तर तुम्ही थोडं बरोबर आणि थोडं चुकीचं आहात. सध्या जरी कच्छ गुजरातचा भाग असाला तरी फार पूर्वीपासून कच्छला स्वतःची ओळख राहिली आहे.  

गुजरातचे जे दोन सुळके आपल्याला समुद्रात घुसलेले दिसतात त्यातल्या वरच्या सुळख्यामध्ये कच्छ आहे. 

कच्छची जमीन अरबी समद्रातूनच काढलेली त्यामुळं खारी, नापीक. मग पोटापाण्यासाठी करायचं काय याचा प्रश्न पहिलपासूनच कच्छी लोकांपुढं पडलेला असायचा.

 मग त्यांनी कच्छला दोन्ही बाजूनी वेढा टाकलेल्या समुद्राचा फायदा घ्यायचं ठरवलं.  इसवी सन १५००पासूनच कच्छच्या जडेजा शासकांनी समूद्रातून व्यापार करायला प्रोत्साहन द्यायला सुरवात केली. नुसतं प्रोत्सहानच नाही तर जडेजा म्हणजे क्षत्रिय असेलेल्या शासकांनी स्वतः व्यापार करायला सुरवात केली. 

आफ्रिका, मध्य आशिया, दक्षिण पूर्व आशियाशी फार पूर्वीपासूनच कच्छी लोकांचा व्यापार चालू झाला होता. ते प्रामुख्याने हस्तिदंत, मोती, खजूर तसेच शस्त्रे आणि दारूगोळा यांचा व्यापार करत असत. जहाज बांधणी असू द्या कि समुद्र मार्गाचं ज्ञान कच्छि खलाशी एकदम माहीर होते. त्यामुळं समुद्रातील व्यापारावर त्यांनी चांगलाच जम बसवला होता. 

जेव्हा १७व्या आणि १८ व्या शतकात इंग्रज मुंबईला व्यापारी केंद्र म्हणून विकसित करत होते तेव्हा कच्छी लोकांना ही संधी बरोबर ओळखली. त्यावेळी मुंबईला फक्त समुद्रातुनच पोहचता येत होतं. मग कच्छि खलाशांनी इंग्रजांच्या खांद्याला खांदा लावत व्यापार केला आणि तुफान फायदा मिळवला. 

बरं कच्छी हे त्यांच्या प्रदेशाचं नाव त्यातही सर्व जातीचे, धर्माचे लोक आहेत.

 या समुदायात हिंदू धर्म मानणारे भाटिया आणि लोहाणा, इस्लामला मानणारे खोजा आणि मेमन आणि जैन धर्म मानणारे दशा आणि बिशा ओसवाल यांचा समावेश होतो.

आता या समुदायातील फेमस लोकांची नावं बघा म्हणजे तुम्हाला पटेल या समाजाचं किती योगदान आहे ते. खटाऊ ग्रुप, मोरारजी गोकुलदास ग्रुप ज्यांचा एकेकाळी मुंबईच्या कापड मिल उद्योगात दबदबा होता ते मूळचे कच्छीच. 

सर विठ्ठलदास ठाकरसी ज्यांनी देशातील पहिले महिला विद्यापीठ “श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ” म्हणजेच एसएनडीटी बांधले ते, पुन्हा आझीम प्रेमजींचीचे वडिल मोहम्मद हाशिम प्रेमजी ज्यांना राइस किंग म्ह्णूनही ओळखलं जायचं ते, मुंबईमधील साबुसिद्दिकी कॉलेजवाले हे सगळे कच्छीच. 

बाकी अशाच इंटरेस्टिंग गोष्टी भिडू तुमच्यासाठी घेऊन येत राहिलंच. तुम्हाला अशीच कोणती माहिती पाहिजे असेल तर खाली कंमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

 

Webtitle : Kachhi community’s contribution in Mumbai’s development is more than kachhi dabeli  

 

Leave A Reply

Your email address will not be published.