काटेसावर.

पंचागाप्रमाणे चैत्रगौरीचं हळदीकुंकू भले एप्रिलमध्ये असो, कात्रजच्या घाटात जाल तर निसर्गदवीचं हळदी कुंकू जानेवारीत बहरलेलं असतं. गणेर-सोनेरी हळदीच्या वर्णाची तर सावर लाल चुटुक-रक्तरंगी, हे दोन्ही वृक्ष निष्पर्णावस्थेत फुलांचा साज चढवून उभे असतात.

सावर म्हणजे काटेसावर, हिच्या पांढरुक खोडावर भले मोठे त्रिकोणी, टोकदार काटे म्हणून ही काटेसावर.

संस्कृत वाङ्मयातील शाल्मली. या संस्कृत नामाच्या लॅटिनीकरणाने हिचं एक नाव होतं सालमालिया. आणखी एक वानसशास्त्रीय नाव बॉम्बॅक्स. बॉम्बॅक्स या नावाला कारणीभूत म्हणजे वृक्षाच्या बियांना लपेटून टाकणारा रेशमासारखा कापूस. रेशीम कीटकाचं वैज्ञानिक नाम बॉम्बिक्स म्हणून हा वृक्ष बॉम्बॅक्स अर्थात सिल्क कॉटन ट्री.

मात्र अशा कितीही उड्या झाल्या तरी शेवटी एकच नाव ग्राहय धरलं जातं. या घटकेला प्रजाती बॉम्बॅक्स मलबार भागातील हा चिरपरिचित वृक्ष, म्हणून जातिविशेषण मलबारिका.

काटेसावर दणकट बांध्याचा, राखाडी रंगाच्या खोडावर भरपूर काटे, फांद्याची मांडणी वलयांमध्ये त्यामुळे वृक्षाचं एकूण रुप अजस्त्र दीपमाळेसारखं, पानं फांद्यांच्या टोकाशी एकवटलेली, हस्ताकृति, पर्णिका मोठ्या आकारमानाच्या, नऊ ते दहा सें.मी. लांब, दोन्ही बाजूला निमुळत्या होत जाणाऱ्या, सामान्यतः पाच.

काटेसावर बहरते निष्पर्णावस्थेत. फुलाचा निदलपेला मांसल, आतून केसाळ, मुलायम पाकळया पाच, लालचुटुक, मखमली. फूल पूणे उमलल्यावर पाकळया मागे वळत असल्या तरी तळाशी त्यांचा कप असतो. त्यातून पुकेसरांचे पाच समूह उभे ठाकतात. प्रत्येक समूहात दहा ते बारा पुकेसर, खेरीज फुलांच्या मध्यावर सुमारे लांबीला आधिक पंधरा पुकेसरांचा गुच्छ. या मधल्या पुकेसर समूहात स्त्रीकेसर गुरफटलेला असतो. त्यातून कुक्षी बाहेर डोकावते.

सावरीच्या फुलात मकरंद, असतोच पण पक्षीवर्ग बहुधा फुलंही खात असावेत. दररोज सकाळ, संध्याकाळ या वृक्षावर ‘सर्वपक्षीय संमेलन साजरं होत असतं. हे साधंसुधं संमेलन नसून एक मैफलच भरते. साळुक्या, बुलबुल, पोपट, सूर्यपक्षी आणि कावळे देखील त्यात सामील होतात. त्यामुळे सावरीच्या झाडाला केवळ रंगच नसतो. तर नादही फुटतो. विशेषतः सकाळ फारच स्वरमयी होते.

काळ पुढे सरकतो. फुलांची जागा बोंडं घेतात. लांबट, अंडाकृती, प्रारंभी हिरवी, पिकल्यावर पाच कप्पयात उमलतात, त्यातून मऊ मुलायम कापसात लपेटलेल्या बिया साई सद्यो’ म्हणून वा-यावर उघळतात. ‘म्हातारी उडता न येच तिजला’

अशी काव्यातली ओळ नलदमयंती’ मध्ये जेव्हा वाचली तेव्हा ती ओळ कलहंसाने आपल्या आईचं शब्दचित्र रेखाटण्यासाठी केली हे समजलं. पण इथं मात्र म्हातारी झपाटयाने उडत जाते. या बियावरचा कापूस फळभित्तीच्या अंतर्भागापासून तयार होतो.

शेवरीचा कापूस म्हणून ओळखला जाणारा हा कापूस अतिशय आखूड धाग्यांचा, म्हणून त्यापासून कापड विणता येत नाही. गाद्या, उशा तयार करण्यासाठी उपयोगी. सावरीचे लाकूड अतिशय हलकं आणि ठिसळ. बांधकामासाठी किंवा फर्निचरसाठी कूचकामी. त्यापासून केवळ आगकाडया आणि आगपेटया बनवता येतात. झाडाला झालेल्या जखमेतून जो द्रव पाझरतो, हा डिंकासारखा साका म्हणजे मोचरस, आयुर्वेदीय उपचारात वापरतात. सुकलेली फुलं पांडुरोगावर उपयुक्त, बिया रुजून रोपं वाढू लागतात. त्यांना रताळयासारखी जाडजूड मुळे तयार होतात, सालंमिस्त्रीसारखाच पुष्टिवर्धक म्हणून त्याचा उपयोग करता येईल, इतकं त्याचं आणि सालंमिस्त्रीचे गुणधर्म साम्य आहे. खोडावरचे कोवळे काटे सुपारीसारखे चघळतात.

काटेसावरीशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. ब्रह्मदेवाने चराचर सृष्टी निर्माण केली. त्यानंतर तो दमला. सावरीला पानं असली की त्याची छानदार, छत्रीसारखी आकृती तयार होते. या छत्रीखाली मग ब्रह्मदेवानं विश्रांती घेतली.

दणकट बुंध्यामुळे सावर वृक्ष अतिशय गर्विष्ठ झाला होता. पर्वी त्याची पानं गळून पडत नसतं. तेव्हा तो नेहमीच रसरशीत हिरवागार असे.

एकदा नारदमुनी साबरवृक्षाला म्हणाले,

‘तुझी  आणि पवनदेवाची फारच मैत्री दिसते, कारण तो तूझी पान पाडण्याचा उपद्व्याप करीत नाही.’

यावर सावरवृक्ष गर्वानं म्हणाला,

‘मी इतका बलवान आहे की मला कुणाच्या मैत्रीबित्रीची गरजच काय? मी नाही पवनदेवाला जुमानत’.

हे सर्व भाषण नारदमुनींनी पवनदेवाला सांगितलं. पवनदेव मग फारच संतापला.

तो सावरवृक्षाला म्हणाला,

तू स्वतःला फारच सामर्थ्यवान समजतोस काय? ब्रह्मदेव तुझ्या सावलीत बसले होते, म्हणून आतापर्यंत तुझ्या वाटेला गेलो नव्हतो. आता बघतोच तुझ्याकडे !

यावर सावर म्हणाला,

‘पवनदेवा, मी तुला भीत नाही. जा, काय हवं ते कर’,

यावर पवनदेव फारच चिडला त्याने आपलं सैन्य म्हणजे पाऊस, वादळ, विजा यांना निमंत्रण पाठवलं आणि सावरवृक्षावर हल्ला करण्यास सांगितलं पण तोपर्यंत सावरवृक्षाला आपल्या उद्धटपणाची जाणीव झाली होती, स्वतःच्या चुकीचं प्रायश्चित म्हणून त्यानं आपली सगळी पानं गाळून टाकली, शेंडाही खाली झुकवला. ते पाहून पवनदेवानं आपल्या सैन्याला माघारी बोलावलं.

तो सावर वृक्षाला म्हणाला, तुला तुझी चूक उमजली, त्याचं मला फार बरं वाटलं, यापुढे कधीही गर्वानं वागू नकोस.

सावरवृक्षाला पुन्हा पान फटली तो परत हिरवागार झाला. मात्र आपल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून तो दरवषी आपली सर्व पान गाळतो. म्हणजे कबुलीजबाब देतो. माणसानं हा धडा गिरवायला काय हरकत आहे?

सावरवृक्षाला यमद्रम असंही नावं आहे. त्याची मुळे इतकी खोलवर जातात की पाताळापर्यंत पोचतात असाही समज आहे. बेरोज नरकवासात पापी व्यक्तींना सावरीचे काटे टोचून दुःख आणि शिक्षा दिली जाते. म्हणून याला यमद्रम असं म्हटलं जातं. सामान्यतः काटेसावर म्हणजे लाल बूंद फलं. पण याखेरीज एक दुर्मिळ वाण म्हणजे पांढरी काटे सावर, मात्र हा फारच तुरळक आढळतो.

लाल काटेसावरही दोन स्वरुपात, नीट निरखल्यावर हे फरक जाणवतात. एका प्रकारात पाकळया मागे वळतात आणि फुलात पुकेसरांचे कडेचे पाच आणि मधला एक असे सहा पुकेसर संघ असतात. दुस-या प्रकारच्या काटेसावरीत पाकळया ताठ उभ्या असतात आणि सर्व पुकेसर मुक्त असतात. सावर अतिशय देखण्या फुलांचा, अर्थात काटेही आहेत. या सावरचा आणि सावरियाचा काही संबंध असेल का? कारण सावरिया बरोबर अनेकदा काटयांचं साहचर्य असतंच.

वनस्पतींच्या दंतकथा. डॉ. हेमा साने. 

2 Comments
  1. Shailesh Pramod Chaudhari says

    फारच छान माहिती दिली आहे

  2. Arvind says

    Bolbhidu always give me right and important information 👍🏻❣️✨

Leave A Reply

Your email address will not be published.