नगर जिल्ह्यातल्या या गावात देशभरातल्या ख्रिश्चनांची जत्रा का भरते?

साखरेची पंढरी म्हणून फेमस असलेला अहमदनगर जिल्हा. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्हीच संगम असलेला हा भाग, दुष्काळी पट्टा असला तरी महाराष्ट्रात साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ इथल्याच प्रवरा नदीच्या साक्षीने झाली. इथल्या मातीने आणि नगरच्या लोकांच्या जिद्दीने ही ऊस शेती फुलवली आणि साखरेची चळवळ राज्यभर पसरवली.

पण सुरवातीला ही परिस्थिती नव्हती. इथल्या शेतकऱ्यांना पाटाने पाणी पाजायचं असत हेच ठाऊक नव्हतं. पावसाच्या पाण्यावर जे पिकेल तेच आपलं असं वाटायचं. काळीभोर सुपीक जमीन असल्यामुळे पावसाच्या पाण्यावर पीक तरारून यायचं.

श्रीरामपूर हे असंच प्रवरेच्या खोऱ्यात वसलेलं गाव. तस बघायला गेलं तर इथला इतिहास खूप जुना नाही. विसाव्या शतकाच्या दरम्यानच रस्त्याचं काम करायला आलेल्या गंगाराम डावखर नावाच्या एका बांधकाम कंत्राटदाराने हे गाव वसवलं. बेलापूर रोड रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जेवण खाण देणे, बारीक सारीक माल पाठवणे यातूनच हे गाव एक बाजारपेठ म्हणून उदयास आलं.

एकोणीशे दहाच्या दशकात तत्कालीन इंग्रज सरकारने डेक्कन इरिगेशन स्कीम आणली.

भंडारदऱ्याच्या धरणातल पाणी कालव्यातून श्रीरामपूर बेलापूर भागात आणलं गेलं. पण वर सांगितल्याप्रमाणे पाटाने पाणी पाजणे पाप आहे असं समजून शेतकरी या इरिगेशनच पाणी पिकाला वापरत नव्हते. इंग्रज अधिकाऱ्यांनी गावातल्या थोड्याफार सुशिक्षित व्यक्तींना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या हातापाया पडत हे पाणी वापरायला लावलं. हे गैरसमज मनात होतेच शिवाय पाणीपट्टी भरणे हे तेव्हाच्या शेतकऱ्यांना परवडणारं नव्हतं.

अखेर ब्रिटिशांनी पुणे व इतर भागातून जगताप, गिरमे,ढाकले,ससे या मंडळींना इथे आणलं. त्यांनी अत्यंत कमी भावात शेतजमिनी विकत घेतल्या. इरिगेशनच्या पाण्यावर ऊस पिकवण्यास सुरवात केली.

इंग्रजांनी सगळा घाट घातला होता आपल्या साखर कारखान्यासाठी.

१९१७ साली बेलापूर स्टेशनपासून जवळ ब्रॅडी कंपनीने ‘बेलापूर शुगर इंडस्ट्रीज अलाइड लिमिटेड’ नावाचा साखर कारखाना सुरू केला. या कंपनीसाठी सरकारने जवळच्या ऊंदीरगाव परिसरातील दहा बारा हजार एकर जमीन भाडेपट्ट्यावर मिळवून दिली. गरीब शेतकऱ्यांना पर्याय देखील नव्हता. त्यांनी मिळेल त्या भावात कंपनीला शेत भाड्याने दिले.

काही का असेना कारखान्यामुळे या भागात विकासाची गंगा मात्र आली. महाराष्ट्रातला हा पहिलाच साखर कारखाना होता. इथे शेकडो टन साखर निर्मिती होऊ लागली. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही या साखरेची निर्यात होऊ लागली. लोकांच्या हातात पैसे खेळू लागला. अनेकांनी गुऱ्हाळे देखील सुरु केली. काही खाजगी कारखाने देखील सुरु झाले.

दारिद्र्याचे दुष्टचक्र भेदून समृद्धीचे चक्रे धावू लागली.

बेलापूर साखर कारखान्याच्या हॅरिसन हा संचालक इथे खूप लोकप्रिय झाला. त्याच्याच नावावरून कारखान्याच्या भागाला हरेगाव किंवा हरीगाव हे नाव मिळालं.

त्यावेळी साखर कारखान्यातील कामगार उसाच्या चिपाडांपासून बनवलेल्या खोपटांत राहत असत. त्या खोपट्यांना मोठी आग लागून सर्व झोपड्या जळून गेल्या. नंतर कारखाना व्यवस्थापन आणि प्रातिनिधिक युनियन यांनी मिळून उत्कृष्ट अशी कामगार वसाहत निर्माण केली. तिच्यात चांगली सांडपाण्याची व्यवस्था होती. कामगारांसाठी एक दवाखाना होता व त्यांच्या मुलांसाठी शाळाही चालवली जात होती.

खास बाब म्हणजे आज आपण जे दूध डेअरी प्रकल्प, कोंबडी पालन प्रकल्प पाहतो तसले प्रकल्प हरिगाव येथे कारखान्यामार्फत १९४० पासून चालू होते. कामगारांची एक सोसायटी होती आणि जीवनावश्यक वस्तूंचे एक दुकानही होते.

कारखान्याच्या निमित्ताने अनेक इंग्रज या भागात राहात होते. नगर जिल्ह्यातील मिरी व इतर भागात राहणाऱ्या ख्रिश्चन लोकांचं देखील प्रमाण जास्त होतं. मुंबईतील बांद्रा येथील माउंट मेरी चर्चला मानणारे हे भाविक लोक होते. दरवर्षी सप्टेंबरमध्ये या माउंट मेरीचा उत्सव असायचा पण प्रत्येक वेळी मुंबईला जाणे सगळ्यांना शक्य व्हायचे नाही.

अनेकजण सावकाराकडून हात उसने घेऊन मुंबईला उत्सवाला जायचे. हि परिस्थिती पाहून फादर गेरार्ड बादर यांनी हरेगावातच हा उत्सव सुरु करायचा निर्णय घेतला.

८ सप्टेंबर १९४७ पासून या जत्रेला सुरवात झाली.

त्यांच्यानंतर आलेल्या रेव्ह जॉन हाल्दनर यांनी हरेगाव येथे सेंट थेरेसा हे भव्य चर्च बनवलं. १९४७ पासून येथे देखील माऊंट मेरी उत्सव सुरु करण्यात आला. पुढे स्वातंत्र्यानंतर इंग्रज गेले आणि इथल्या भोळ्या भाबड्या जनतेने माउंट मेरीचे मत माऊली बनवले. उत्सवाची जत्रा बनवली.

दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माउंट मेरीच्या जन्मदिवसावेळी हरेगाव येथे मतमाउलीची जत्रा भरते. लाखोंच्या संख्येने देशभरातून श्रद्धाळू या जत्रेसाठी येतात. महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही ग्रामदेवतेच्या उरूस जत्रेप्रमाणे हरेगावच्या मतमाऊलीची जत्रा असते.

देवीच्या पालखीप्रमाणे मेरी माऊलीची मिरवणूक काढली जाते. जागोजागी हातात आरती घेतलेल्या महिला पायावर घागरी ओतून या मिरवणुकीचे स्वागत करतात. गावातल्या सगळ्या घरात गोडधोड बनवलं जातं. उत्सवाच्या धामधुमीत सगळे धर्मीय सारख्याच उत्साहात सहभागी होतात.

इतकंच काय तर काही लोक तेथे नवस करायला येतात आणि त्यांचे पूर्णही होतात, अशी श्रद्धा आहे.

पूर्वी रात्री कब्बड्डी व व्हॉलीबॉलच्या स्पर्धा, नाटकांचा कार्यक्रम व्हायचा. अश्रूंची झाली फुले या नाटकात फादरनी देखील सहभाग घेतल्याच्या आठवणी जुने लोक सांगतात.

हरेगाव मध्ये राहणारे ख्रिस्ती शेतकरी बैलपोळ्याला आपल्या बैलांना रंगवून, शिंगांना बेंडे आणि गोंडे लावून, सजवून पुरणपोळीचा नैवैद्य दाखवून त्यांना चर्चमध्ये आणत असत. चर्चच्या पायऱ्यांवर उभे असलेले युरोपियन फादर या बैलांच्या जोड्यांवर पवित्र पाणी शिंपडून त्यांचे औक्षण करत असत. मराठी आणि ख्रिश्चन संस्कृतीचा मिलाफ हरेगावकरानी टिकवून ठेवला.

१९८६ साली खुद्द मदर तेरेसा या चर्चच्या भेटीला आल्या होत्या. या जत्रेमुळे हरेगावला मराठी कॅथलिक ख्रिश्चनांचे जेरुसलेम अशी उपमा दिली जाते.  गेली सत्तर वर्षे हरेगावच्या स्थानिक जनतेने जत्रेची परंपरा मनापासून जपली आहे. यंदा मात्र कोरोना मुळे यात्रा ऑनलाईन घ्यावी लागली. पुढच्या वर्षी मात्र या महामारीच्या संकटावर मात करून नव्या उत्साहाने ही जत्रा त्याच जल्लोषात साजरी करू असं स्थानिक लोक सांगतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.