डुंगर राजासाठी बनलेला भुजिया जगभरात बिकानेरला ब्रँड बनवून गेला
बिकानेर. चौदाव्या शतकात राव बिकाने वसवलेलं शहर. राजस्थानच्या वाळवंटात बिकानेरला ओयासिस म्हणून ओळखलं जातं. भारतातले सगळे ट्रेड रूट या गावातून जातात. वाळवंटातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांचे हक्काचे निवाऱ्याचे स्थान म्हणून देखील बिकानेरला ओळखतात. पाण्याची उपलब्धता असणे हे बिकानेरचे प्लस पॉईंट ठरले आहे. याच बरोबर इथले आदरातिथ्य, बिकानेर क्यूजीन हा देखील त्यांचा यूएसपी ठरला आहे.
आज भारताच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही गावात गेलं तर बिकानेर स्वीट्सच दुकान हमखास पाहायला मिळते. बिकानेर मधल्या अग्रवाल समाजाचे लोक हे दुकाने चालवतात. त्यांनी बनवलेले सगळेच पदार्थ जबरदस्त असतात. पण खास बिकानेर ओळख म्हणजे त्यांचे डुंगरी भुजिया.
शेव भुजिया. कंटाळा आला कि तोंडात टाकायला उपयोगी असा चटक मटक पदार्थ. घरात स्टॉक असलेला चांगला असतोय. सकाळ,असो,दुपार असो कि संध्याकाळ भुजिया खायला कोणी नाही म्हणत नाही. रात्री अपरात्री भूक लागली तरी भुजिया मदतीला धावून येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गम का साठी रम बरोबर चकणा म्हणून हमखास भुजिया उपयोगी पडतो.
देशभरात तर फेमस आहेच पण गुजराती राजस्थानी लोकांच्या रक्तातून भुजिया वाहतो असं म्हणतात.
खरं तर हा साधा सरळ सोपा मिडलक्लास पदार्थ. कोणीही बनवू शकेल इतकी याची रेसिपी सोपी आहे, खूप काही तामझाम नाही, अति मसाले आहेत असंही काही नाही. अनेक जण बनवतात पण बिकानेरी भुजियामध्ये जी मजा आहे ती इतर कोणालाही नाही.
आता कुठेही सहज उपलब्ध असणारा भुजिया हा एकेकाळी फक्त राजेशाही पदार्थ होता असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल?
गेली सहाशे वर्षे राव बिकाच्या काळापासून राजपूत घराणे बिकानेरवर राज्य करत आहे. इंग्रजांच्या काळात १८ तोफांचा मान असणाऱ्या या घराण्यात अनेक शौकीन राजे होऊन गेले. यातलाच एक राजा म्हणजे महाराजा डुंगरसिंग.
बिकानेरचे हे अकरावे महाराज. १८७२ साली गादीवर आले.वय होत फक्त १८ वर्षे. राजपूत राजघराण्याचे वारसदार होते पण खूप पराक्रमी वगैरे नव्हते. पण कलेच्या बाबतीत अगदी शौकीन होते. संगीत नृत्य चित्रकला यांना प्रोत्साहन त्यांनी दिल. मॉडर्न विचारांच्या डुंगरसिंग यांनी बिकानेर मध्ये पहिली शाळा सुरु केली. परदेश दौऱ्यावर असताना युरोपमधील डेव्हलपमेंट बघून ते चकित झाले होते. असाच विकास आपल्या संस्थानामध्ये करावा असा त्यांनी प्रयत्न केला.
बिकानेर राज्याचं बजेट सादर करून त्यानुसार रस्ते बांधणी व इतर कामांसाठी खर्च करण्यास त्यांनी सुरवात केली. बिकानेरचे पोलीस दल उभारले, पोस्ट ऑफिस सुरु झाले. गावात पहिला सिव्हिल सर्जन देखील त्यांनीच आणला. इंग्रजांशी त्यांचे चांगले संबंध होते. अफगाण युद्धात मदत म्हणून बिकानेर संस्थानामधून ८०० उंट त्यांनी ब्रिटिश सेनेला भेट दिले होते.
या सर्वामुळे सरकारचा देखील या संस्थानवर आणि तिथल्या तरुण राजावर विशेष वरदहस्त होता. याच महाराजांनी बिकानेर मध्ये सुप्रसिद्ध बादल महाल उभारला जो आजही जगात स्थापत्यकलेचा एक अविष्कार मानला जातो.
डुंगरसिंग महाराजांचा एक वीक पॉईंट म्हणजे जेवण. त्यांची खाण्यापिण्यावर विशेष श्रद्धा होती. महाराज शौकीन तर होतेच पण त्यांना नवनवीन प्रयोग देखील करायची हौस होती. त्यांनी राजस्थानमधले सर्वोत्कृष्ट असे आचारी आपल्या मुदपाकखान्यात नेमले होते. त्यामुळेच जगभरातले अस्सल स्वादाचे पदार्थ बिकानेरच्या राजवाड्यात बनायचे.
महाराजांना खुश करण्यासाठी एका आचाऱ्याने बेसनचा एक शेव सारखा चटकदार पदार्थ बनवला. हा पदार्थ म्हणजे भुजिया.
दुपारच्या जेवणांनंतर डुंगरसिंग महाराजांना हा चटकदार पदार्थ सर्व्ह करण्यात आला. महाराजांनी चिमूटभर भुजिया तोंडात टाकली आणि ते चक्क प्रेमातच पडले. त्यांनी या आचाऱ्याला मोठमोठी बक्षिसे दिली. तो आचारी अग्रवाल समाजातला होता. त्यानेच या पदार्थाला महाराजांच्या स्मरणार्थ डुंगरी भुजिया असं नाव दिलं.
पुढे राजवाड्यातल्या रसोईमध्ये बनणारा हा पदार्थ १९३८ साली गंगाराम अग्रवाल यांनी बाजारात असलेल्या आपल्या दुकानात गरमागरम तळून विकायला सुरुवात केली. गावात येणाऱ्या व्यापाऱ्यांनी तो भुजिया देशभरात पोहचवला. भुजिया बनवणाऱ्या गंगाराम अग्रवाल यांचं टोपण नाव होतं हल्दीराम. आज हाच हल्दीराम जगभरात हजारो कोटींचा ब्रँड बनला आहे.
फक्त हल्दीरामच नाही आज अग्रवाल समाजाने गावोगावी सुरु केलेली बिकानेर स्वीट्सची दुकाने आहेत. महाराजांसाठी बनलेला हा टाईमपासचा पदार्थ आज गावाचं नाव मोठं करणारा ब्रँड बनला आहे हे नक्की.
हे हि वाच भिडू.
- जळगावची जैन ही आज आफ्रिकेतील सर्वात मोठी इरिगेशन कंपनी आहे.
- गिरणीवाल्या कंपनीने भारताला जीन्स घालायची सवय लावली.
- काही वर्षांपूर्वी तो कपड्यांच्या दूकानात काम करायचा, आज त्याची ४३.७ कोटींची कंपनी आहे