छत्रपतींचा सह्याद्री आणि गडकिल्ल्यांची भटकंती हेच आयुष्य मानलं

“शिवाजी” हे फक्त एक तीन अक्षरी नावं, ज्याभोवती आज तीनशेवर्षांनंतरही अनेक छोटेमोठे इतिहासकार अगदी सॅटेलाईट सारखे फिरत असतात, पण या सूर्याभोवती जणू त्याच्याच सूर्यमालेतील एक ग्रहासमान, डोळ्यात भरणारा किंवा सलणारा हि म्हणू शकू असा एक ठिपका सतत फिरत असतो, नव्हे तर सूर्याच्या तेजातून इतर मंडळींना प्रकाशित करत असतो असा एक सूर्यासमोर खुजा असला तरी त्याचं उर्जेने प्रकाशित झालेला ग्रह म्हणजे “दुर्गमहर्षी प्रमोदजी मांडे”.

शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात हिचं म्हण आणि हीच चालीरित अवघ्या महाराष्ट्रात रूढ आहे. त्याचे कारणही अगदी समर्पकचं आहे म्हणा, कारण भोसले कुळानं केलेला संघर्ष, पराकोटीचं बलिदानं, या गोष्टी आमच्यासारख्या येरा – गबाळ्याचरणी होणे नाही. आपल्या सर्वांनाचं बदल हवे आहेत. पण त्यासाठी झिजण्याची तयारी कुणाचीचं नसते. मस्तपैकी आरामखुर्चीवर आपली कमान टाकून चहाच्या फुरक्या मारत आपल्या देशाच्या भवितव्याविषयी दीर्घकाळ काळजी करणाऱ्या (म्हणजेचं चहाचा गोडवा जोपर्यंत जिभेवर रेंगाळतो) लोकांचे जथ्थे इथे मोठ्या प्रमाणावर घडले आणि इथून पुढेही घडतीलचं. पण या सह्याद्रीची उंची वाढविण्यासाठी स्वतःला त्याच्या पायाशी गाडून घेणाऱ्यांच्या रक्ताचा एक अंशच जणू स्वातंत्र्यानंतर या महाराष्ट्रभूमीवर प्रगटला असं म्हणायला हरकत नाही.

प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या पिढ्याच्या पिढ्या या महाराष्ट्रात सबंध राष्ट्राला दिल्या. शिवाजी महाराजांचे मिर्झाराजे जयसिंह यांच्या बरोबर झालेलं तहाचं बोलणंही त्यातलाचं एक भाग, अख्खी एक पिढी फक्त दिल्ली तख्ताच्या रक्षणासाठी, सबंध हिंदुस्थानावर आलेलेल्या अब्दालीनामक दुश्मनाचा बिमोड करण्यासाठी धारातीर्थी पडले, पण त्यांनी या राष्ट्रासाठीचं तर स्वतःला गाडून घेतलं होतं. स्वातंत्र्यलढ्यात कुठेतरी हा राष्ट्रवाद हरविला होता., तेव्हा त्याचे पुनरुज्जीवन केलं ते लोकमान्य टिळकांनी, आणि एकसंध देशासाठी लढा सुरु झाला.

स्वातंत्र्य मिळाले, आणि हे एकसंध राष्ट्र पुन्हा तुकड्या – तुकड्यामध्ये विखुरले गेले. उत्तरेतल्या माणसाला आता दक्षिणेकडल्या लोकांसाठी ओढा नव्हता, तर पूर्वेच्या लोकांच्या त्रासाने कधी पश्चिमेच्या लोकांना आसवांचा ओलावा आला नाही.इतिहासाचा इतिर्हास झाला, आपल्या समाजाची टिमकी वाजवत कर्तुत्वाचा आलेख रेखाटन करण्याची पद्धत समाजात रूढ झाली. आणि त्यांनाचं पुस्तकातून – मौखीकतेतून मिरवले गेले. या सगळ्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्रातील पुण्यवंताच्या भूमीतील (पुण्यात) सोमवार पेठेतील एक सद्गृहस्थाच्या पोटी, जणू एक अखंड चळवळचं जन्माला आली., कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये मारुती मांडे यांच्या घराण्यात “प्रमोद”[भाऊ] जन्माला आले.

मोठ्यातमोठे पराक्रम, कर्तुत्व आपल्या नावावर नोंदविणारे, हे अगदी आपल्या वयाच्या नाकर्त्या वयापासूनचं आदर्श म्हणूनचं जन्माला येतात, या जग-रीत असणाऱ्या समीकरणाला माझ्या आयुष्यात मिळालेलं हे पहिलेवाहिले उदाहरण म्हणजे प्रमोद मारुती मांडे. या बाळाचे पाय लहाणपणापासूनचं पाळण्याच्या बाहेरचं दिसायला सुरवात झाली होती. आवडीनं जवळ घेणाऱ्या प्रत्येकालाचं प्रसाद देत भाउंनी आपल्या वेगवेगळ्या रंगछटा दाखवायला सुरवात केली होती.

रेल्वेयार्डातून चोरलेल्या चकारी घेऊन साऱ्या गावभर हुंदडनाऱ्या भाऊंचे वडील हे स्वतः रेल्वे खात्यातचं नोकरीला होते., त्यामुळे असे काही करताना, किंवा कुणाच्या सांगण्याने, हि टोळभैरवगिरी वडिलांच्या कानी गेली, कि खलबत्ता मशीन हि सर्रास चालूचं असायची, आणि हे प्रेम इतर कुठल्याही भावंडाच्या वाट्याला तसूभरही आलं नाही याचं सारं श्रेय खरं तर भाऊंचचं. यार्डातून चाकरी चोरीला गेल्या कि ती लपविण्याची सगळी जबाबदारी भाऊ बिनबोभाट पारं पाडत असतं. पण मुद्देमाल अगदी सेफमध्ये ठस राहत असे, मग लघवीच्या बहाण्यानं घराबाहेर पडून रस्त्यावरल्या वराती बघणं, त्यासाठीसुद्धा मार खानं अश्या बऱ्याचं गोष्टी. आईचा तर भाऊंवर जरा जास्तीचं जीव.,कधीचं मेल्या, मुडद्या, कारस्तान्याशिवाय त्या माउलीनं हाका मारल्या नाहीत. कदाचित यातच त्यांना प्रमोद मिळत असावा.

पानशेतच्या पुरानं पुण्यात हाहाकार केला. आजोबांचं दोन घराच्या खुराड्यातलं एक घर पडलं, एक वाहून गेलं, तेव्हा नोकरी निमित्तानं भुसावळला असणाऱ्या वडिलांनी आपलं सुलक्षणी पार्सल भुसावळला हलवलं. तिथेचं भाऊंच अडकत धडकत शिक्षण सुरु झालं. आई वडिलांना असणारी वाचनाची आवड पुढं भाऊंना जडली आणि खऱ्या अर्थानं एका ओघळाचा महासागराच्या दिशेने विस्तारण्याचा प्रवास सुरु झाला होता.

आता आवड म्हणून वाचन वगरे या गोष्टी सुरु असल्यातरी दुनियादारी करतं पाचवीला पुजलेल्या हाणामार्या वगैरे गोष्टीही सुरुचं होत्या. या गोष्टी नाही म्हटल्यातरी घरापर्यंत पोहचायच्याचं आणि मग “मारुती” हे नाव असलेल्या वडीलांकरवी भाऊंना बजरंग बनवले जायचे., यात पुन्हा पुण्याकडे रवानगी झाली पण यावेळी घरचे सुद्धा सोबत होते., मुंबईला नोकरीला असणारे वडील आपल्या लाडल्यामुळे बरीचं वर्षे पुणे मुंबई अश्या रोजच्या खेपा करीत होते.

अशातचं भटक्यांची जमात एकत्र येऊ लागली, ठरलेल्या एका दिवशी सिंहगड अजूनकाही ठिकाणं वगैरे ठरलेली असायची. अडकत धडकत चालेलेल्या शाळेला रीतसर दांड्या हाणत – हाणत सारं पालथं घातलं जात होतं, जणू स्वतःचं एक MAP Portal म्हणून भाऊ सिध्द होतं होते. खरं तर भटकायचे कशाला तर हरवून जाण्यासाठी आणि हरवून का जायचे तर फक्त भटकण्यासाठी या आशयाचं साधं सरळ सूत्र भाउंनी स्वतः साठी तयार करून घेतलं होतं

“आजही ते अविरत वापरात आहेचं.,आत्ताच्या स्पर्धेचा काळ हा खूपचं धकाधकीचा आपल्याला वाटतो खरा पण याची सुरवात झाली ती, आपल्या जन्माच्या आधीपासूनचं., मिशीवर तावमारून आपण किती किल्ले हिंडलो आहोत या सगळ्या गोष्टी अगदी छाती दीड दीड इंच फुगवूनचं सांगितले जायचे., पण ते भाऊना कधी जमले नाही., कारण नुसते भोज्जा शिवून आपली नावं कुठंतरी नोंदविण्यासाठी, लोकांना आपले फुगलेले आकडे दाखविण्यासाठी नाही तर स्वतःच्या समाधानासाठी त्यांना किल्ले बघायचे होते. आणि हा भटकाजोगी अगदी तासाचं भटकत राहिला., किल्ले बघणे त्यावर आढळणाऱ्या वेगळ्या गोष्टींचे, वनस्पतींची नोंद करणे, मृदेचे नमुने गोळा करणे, याचं सोबत किल्ल्यावरील खरा इतिहास, रंगविलेला इतिहास याची भौगोलिकदृष्ट्या शहानिशा करणे ह्या साऱ्या गोष्टींचे अगदी व्यवस्थितपणे आपल्या नोंदी राहण्यासाठी त्यांचे चित्रीकरण करण्याची काम या भटकंतीत अगदी व्यवस्थितपणे सुरु होती.

वेल्डिंग करणारे हात कॅमेऱ्याच्या बटणावर असे काही चालू लागले की विचारता सोय नाही., आज जेव्हा आपण भाऊंच्या घरी भेट द्यायला जातो. तेव्हा त्यांच्या कॅमेऱ्याची कमाल नक्कीचं दिसून येईल., भारतातील प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, तालुक्यातील प्रत्येक गावातील हरएक ऐतिहासिक वास्तू, गड, मंदिर, वाडे, खंदक, खंडरं सारं सारं आपल्या नजरेने टिपून ठेवलं आहे. स्त्री आणि पुरुषांच्या पायांच्या बोटातील नैसर्गिकरीत्या प्राप्त झालेले वेगळेपण जसे मूर्तिकारांनी आपल्या मूर्तीत उतरवले तेचं वेगळेपण समजण्यासाठी, मूर्तीचा अधिक सखोल अभ्यासासाठी त्या त्या प्रकारे भाऊंनी आपल्या कॅमेरामध्ये टीपल्या आहेत यातूनचं आमच्यासारख्या नर्मदेच्या गोट्यांना आकार देण्याचे काम भाऊ करत असतात.”

अशातचं भाउंचा भटकंतीचं नकाशा आणि आयुष्याला सुरवात झाली. एकीकडे आई वडील मंडळी संसार आणि दुसरीकडे मित्र, काम, सह्याद्री आणि त्याची भटकंती या गोष्टींना सुरवात झाली. गटांगळ्या खात खात (अ)पूर्ण झालेल्या शिक्षणाच्या जोरावर दुनियाभरचे जॅक लावून टेल्कोमध्ये कामाची सोय झाली आणि आयुष्याचा खऱ्याखुऱ्या अर्थानं सजलेला गाडा समाधान चौकातून लाईनीला लागला. तरी भटकण्याच्या नावाखाली भरकटत आणि भरकटण्याच्या नावाखाली भटकणे हे चालूच होते. गडकोट भटकंती सोबत भाऊंचे लहानपणी जडलेलं पुस्तक वाचण्याचे वेड याकाळात जास्तचं जोरावर होतं असं म्हणनं चुकीचे ठरणार नाही.

सातवाहनांपासून मराठ्यांपर्यंत दुर्गबांधणी करणारा हर एक कालखंड हा भाउंचा अक्षरशः मित्रचं ठरला होता.

वाकाटक, कलचुरी, आभीर, सेन्द्र्क, राष्ट्रकुट, शिलाहार, यादव, सिंद, कदंब, मानांक, भोज सगळी सगळी मंडळी जणू एकसाथ पंगतीलाचं येऊन बसत., त्यामुळे यांच्या दुर्गबांधणीसोबत त्यांचा इतिहास, त्यांचे राहणीमान, त्यांचे कलह, राजकारण सगळ्या सगळ्याचं गोष्टी अक्षरशः रक्तात भिनल्यासारख्या यांच्याशी एकजीव होऊन गेल्या, हे सगळं उरकलं तेव्हा उरलेल्या मराठेशाहीच्या अभ्यासाचा घास घेण्याकडे यांचा होरा वळू लागला., आणि कित्येक गुरुजणांच्या शिकवणीतील मराठेशाही कालबाह्य ठरून, एका नव्या पर्वाला सुरवात झाली. (इथून मागे आणि आजही हयात असलेले आणि नसलेले इतिहासकार एखाद्या प्रकरणावरील माथापच्ची करून वैतागतं तेव्हा अडलेल्या गणिताचा ईलाज शोधण्यासाठी आपला एक अनुयायी भाऊंकडे पाठवतात)

मनुष्य पुस्तक वाचू लागला की जास्त विचार करू लागतो. हे विचार चांगले होत असतील किंवा वाईटही होतं असतील ही गोष्टचं निराळी पण माणूस विचार करू लागतो एवढं मात्र नक्की, कधी कधी माणसाचे विचार त्याला समाज विघातक म्हणून कुप्रसिद्धीस आणतात तर कधी कधी आपले विचार आपल्यालं समाजहितवादीही ठरवून टाकतात., जग रहाटणीला फाट्यावर मारतचं भाऊंची यात्रा चालू होती, प्रस्थापितांना शह बसला म्हणून कधीकधी हे नसलेले कुप्रसिद्ध ठरले तर दगडधोंड्यात जीव ओतणाऱ्या लोकांसाठी हे व्यक्तिमत्व प्रसिद्धीस आले खरे पण नाव आडनावाच्या सुरसतेवर माणसाची पत प्रतिष्ठा ठरविली जाते आणि त्यांना जनमाणसात, समाजभूषणाची मानमरातब प्राप्त होते. पण वेगळ्या धाटणीचे आडनावचं यांच्या आडनावा आडचं दूषण ठरलं असावं आणि त्यामुळेचं हा लाखोंचा पोशिंदा आमच्या वाटेला आला असं म्हणनं गैर ठरणार नाही.

आता भटकंतीचा ध्यासचं भाऊंची ओळख होती तरी ते या जोडीला, रोजचे पुस्तकवाचनं आणि टेल्को कंपनीतील आपल्या नोकरीसाठी वेळ काढत असतं. इनमिन गुरुवारची एक दिवस साप्ताहिक सुट्टी असायची, ती येण्याआधीचं तिचं नियोजन ठरलेलं असायचं. त्यात एखादी सुट्टी जोडून आलीचं तर मग दुग्धशर्करायोगच समजायचा…. दुसरं काय. मग तिसऱ्या दिवशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या शिफ्टला गडावरून डायरेक्ट ड्युटीला उभे राहणे असले उलटे पालटे उद्योग चालू असायचे.

आपण घेतलेल्या धाडसी निर्णयातूनचं आपली समाजातील छबी निर्माण होतं असते. आणि प्रमोद मांडे म्हणजे जरा जास्तचं परखड, तिरसट व्यक्तिमत्व हे आता सगळ्यांना माहिती आहे. साप्ताहिक सुट्टीचं एक दिवस मिळणारं यातचं काय ते भटकंती आणि इतर गोष्टी. आपल्या या छंदाला पुरेसा वेळ देता येत नाही, काहीतरी करायला पाहिजे याचं विचारांतून एक चमत्कारिक नंतर त्या घटनेला क्रांतिकारी ठरवले गेले अशी घटना घडली. लाख लफडी करून मिळवलेली टेल्को कंपनीतील नोकरी या माणसानं चक्क सोडली. स्वेच्छा निवृत्ती पत्करली. एवढा अवघड निर्णय घेऊन पुढे यांनी काय ठरवले होते, ते फक्त त्यांनाचं माहिती असावं., निवृत्ती स्वीकारल्यानंतर मिळालेल्या रकमेतून संसाराच्या अर्ध्या समुद्रात येऊन ठेपलेल्या आपल्या संसाराचा या माणसानं विचार केला नाही. आपल्या पार्थिवाला अग्नीदेण्यासाठी केलेल्या आपल्या वंशजांच्या, पोटापाण्याची सोय यांनी बघितली नाही तर होणाऱ्या वाचनातून क्रांतीकारकांच्या अपार प्रेमाने बहरून जाऊन आपल्या VRS चा उपयोग अज्ञात क्रांतीकारकंच्या चरित्राला उजाळा देण्यासाठी केला.

काही लोकं वेडी असतात हे खरचं आणि ही वेडी माणसचं इतिहास घडवीत असली तरी, या वेडेपणाला कसल्याचं मर्यादा नसतात. हे दाखवून दिले तर ते फक्त भाऊनीचं.

आम्हाला लोकांनी सांगतीलं होतं की इतिहासात वेडं होण्यासाठीही काही मर्यादा असतात. त्या बाळगल्या नाहीतर हा इतिहास एकदिवस भिक मागायला लावल्याशिवाय राहत नाही. पण इथं वेड्यापणात सगळ्याचं गोष्टी मातीमोल ठरल्या., घरसंसार, समाज काम बघतं बघतं सगळ्याच गोष्टी कराव्यात हे एक सर्वमान्य सूत्र पण इथे स्वतःसाठी स्वतःची सूत्र बनली आणि जगावेगळं कर्तुत्व उदयाला आलं. आज शेकडो शाळांमध्ये, हजारो संस्थांच्या माध्यमातून भाऊंचे हे क्रांतिकारकांवर आधारित प्रदर्शन व्याख्यानं साऱ्या महाराष्ट्रभर आयोजित केलं गेलं, पण या सगळ्या पसाऱ्यामागचा त्याग भाऊंनी कधीही दाखविला नाही वा याचे भांडवलही केले नाही. आणि खरचं आहे म्हणा

“शिरपेचात रोवलेले तारे दिसतात लोकांना पण त्यासाठी झालेलं काळजाचं पाणी दिसून येत नाही.”

खरचं भाउंनी मोठा त्याग केला आहे एवढं मात्र नक्की., एखाद्याला सुतकं पडलं तर जवळपास महिनाभर माणूस फक्त आपल्या दुःखातचं हरवलेला असतो., त्याची आर्थिक सामाजिक सगळी वाढ खुंटली जाते. आणि हि जगरीतचं आहे यात काही फेरफार झालेला नाही., जेव्हा भाऊंच्या मातोश्री कालवश झाल्या, प्रत्येक मुलावर जसे आभाळ कोसळतं, मातृत्वाचं छत्र हरविते, तसे भाऊंच्या बाबतीत झाले., विषण्ण अवस्थेत, सुतकातील काही दिवस काढले पण. चित्तमात्र थारेवर राहू देत नव्हतं., आपल्या वडिलांशी बोलून भाऊंनी दहाव्याच्या आधीचं धोपट पाठकुळी मारून घराचा निरोप घेतला. आणि आपल्या दक्षिण भारताच्या मोहिमेवर ते निघून गेले., दहाव्याच्या दिवशी, वडिलांनी, भावंडांनी, पै पाहुण्यांनी काय ते विधी उरकले, तेव्हा हा अथांग ज्ञानाचा सागर असणारा हा मूर्तिमंत विवेकानंद कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी एकटक मावळत्या सूर्याकडे पाहत उभा होता.

अनुभवातून मोठा होत जाणारा माणूस हा चार पावसाळे अनुभवूनचं मोठा होत असतो. पण या श्रीमंतयोग्यानं किती पावसाळे पाहिले, आणि किती विजा झेलल्या याचा मागोवा आपल्याला घेताचं येणार नाही., भरल्या मळवटानं सईबाईंनी जसा मराठेशाहीला निरोप दिला, तसेचं पेच प्रसंग भाऊंसमोर सुद्धा उभे ठाकले, कॅन्सरच्या असाध्य रोगाशी बराच काळ चाललेल्या युद्धामध्ये भाउंचा भावगड ढासळला…… पण तरही या निश्चयाच्या तटबंदीला खिंडारं पडलीचं नाहीत. वाचन करता करता साठत चाललेल्या पुस्तकांचा फुगवटा सुद्धा एवढा झाली कि साधारण ५ हजार पुस्तकांचा संग्रह भाऊंकडे जमा झाला, आणि ज्ञानाचा तर फुगवटा तर विचारायलाचं नको. स्वतःच्या पोटाला त्यांनी किती चिमटा काढला हे फक्त त्यांनाचं माहिती, पण आपल्या बुद्धीची भूक भागविताना मात्र अक्षरशः मोगलाईचं माजली असावी असं म्हणायला हरकत नाही.

या भारतभूमी वरल्या फारचं कमी जागा अश्या आहेत. ज्या भाऊंनी पादाक्रांत केल्या नाहीत. माणूस काश्मीरमध्ये गेल्यावर, तिथल्या निसर्गसौंदर्यावर बहरून जाऊन आकंठ त्याच्या प्रेमात बुडालेला असतो., पण हा मनुष्य तिथेही इतिहासाच्या पाउलखुणा शोधात किल्ले पालथे घालत होता हे विशेष.

या माणसानं आयुष्यात कमविली ती फक्त व्यक्तीरूपी दौलत आणि हिच्याचं तर जोरावर भाउंनी आयुष्यात अनेक कोलांट्याउद्या घेतल्या म्हणता येईल., “एकदा मध्यप्रदेश दौऱ्यावर असताना बुंदेलखंडच्या छत्रसाल बुन्देलांच्या, बाजीरावांनी बांधायला घेतलेल्या परंतु अर्धवट राहिलेल्या समाधीचे निरीक्षण करत असताना, शेजारी उभा असणाऱ्या एकाने भाऊंना आपण कुठले काय या आशयाची विचारणा केली., यावर महाराष्ट्र आणि मुक्कामपोस्ट हा पत्ता कळल्यावर तो इसम जाम खुश झाला

“म्हणजे आपण तर मराठ्यांच्या राज्यातील, तुमच्याच माणसानं हि समाधी बांधायला घेतली होती, आणि बांधणारचं असं वचनही दिलं होत, आता ते तर नाही पण तुम्ही हे काम पूर्ण करा हा हट्ट त्यानं भाऊंकडे धरला.

“आज महिना झाला, घरातील फुटलेल्या बेसिनवर खर्च करायचा विचार करतो आहे.” या अवस्थेत माझ्यासारख्या भणंग माणसाकडून यांनी अपेक्षा तरी काय बाळगावी या विचारातचं ते ठिकाणं सुटत होतं”……..

कार्यक्रम, उपक्रम, आणि भटकंती यातचं भाउंनी जीवनाचं सारं मानलं, कोल्हापूरकर छत्रपती घराण्यानं दिलेल्या दुर्गमहर्षी या किताबापलीकडं काखोटीला एकही दमडी साठविली नाही., कधी आपण कमी दरात मिळणाऱ्या जागे विषयी सांगण्याचे धाडसं केलं कि घ्या भाऊ जागा गावाकडल्या घरासाठी चांगला स्पॉट आहे., तर मोठ्या अभिमानाने ते सांगणार कि अरे आता काय करायचय मी घेतली आधीचं जागा विकतं… कुठं आणि किती अशी विचारणा आपण केली तर उत्तर असणार “अरे मसणात घेतलीये ना २ बाय ६”……!

आता आपणचं यावर मान मुटकून थंड घेण्यापलीकडे काही करू शकणार नाही हे त्यांनाही माहिती असायचे…. पण भाऊंमुळेच आज विचारांत आणि त्यामुळे कृतीत बदल आलाय एवढं मात्र नक्की….!

  • अभिषेक कुंभार

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.