विधानसभेत विचारायचे प्रश्न लोकांच्या सभा घेऊन ठरवणारे केशवराव धोंडगे एकमेव नेते होते
मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई केशवराव धोंडगे यांचे रविवारी वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले. कपाळावर टिळा लावलेले, पांढऱ्याशुभ्र नेहरू शर्टातील आणि धोतरात वावरणारे अगदी शांत आणि चालते बोलते व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.
विधिमंडळाच्या सदस्य परिचय पुस्तिकेत केशवराव धोंडगे यांची जन्मतारीख २५ जुलै १९२२ अशी नोंद आहे. मन्याड आणि पार्वती नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या गऊळ या गावी झाला. त्यांनी त्या काळात बीए चे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षणाचे महत्व समजून धोंडगे यांनी श्री. शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली. या माध्यमातून धोंडगे यांनी नांदेड, कंधार बरोबर औरंगाबाद जिह्यातील वाडी, वस्ती, तांड्यावरच्या लाखो मुलामुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
धोंडगे यांनी श्री. शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९४८ ला केली.
यात माध्यमातून १२ प्राथमिक शाळा, ११ माध्यमिक व उच्च माध्यमिक, २ वरिष्ठ महाविद्यालये आणि एक लॉ कॉलेज सुरु केले. हैद्रराबाद मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र या दोन्ही चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नांदेड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचा पाया त्यांनी रोवला. आपल्या ६० वर्षांच्या दमदार राजकीय कारकिर्दीत आजतागायत पक्ष न बदलता ज्यांनी राजकारण दणाणून सोडलं.
त्यांच्या जिल्ह्यातील कॉंग्रेसचे दिवंगत बलाढ्य नेते माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे व त्यांचे कधीच जमले नाही. असं म्हटलं जातं की, केशवराव काँग्रेस पक्षात गेले असते तर शंकरराव चव्हाणांच्या आधी मुख्यमंत्री झाले असते.
स्थानिक राजकारण, मतदारसंघाचा विकास आणि राजकीय भविष्य याचा विचार करून अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांना पुढे आवर्जून साखर कारखाने, मंत्रीपदे मिळाली. त्यात यशवंतराव मोहिते, शंकरराव मोहिते पाटील आदींचा समावेश होता. मात्र केशवराव धोंडगे यांनी शेवटपर्यंत पक्ष निष्ठा जोपासली. ते कुठल्याही अमिषाला बळी पडले नाही.
१९५७, १९६२, १९६७, १९७२, १९८५, १९९० अशा तब्बल सहा विधानसभा सदस्य म्हणून ते सहा वेळा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातून १९७७ मध्ये एक वेळा विजयी झालेले आहेत. कमी अधिक नाही तर तीन दशक त्यांनी आपल्या आवाजाने विधानसभा गाजवली.
वंदे मातरम या गीताने दोन्ही सभागृहाच्या सत्रांची सुरुवात व्हावी अशी आग्रही मागणी केशवराव धोंडगे यांनी ९० च्या दशकात लावून धरली होती. त्यानुसार डिसेंबर १९९० पासून विधानसभा आणि परिषद दोन्ही सत्राची सुरुवात वंदे मातरम या गीताने होऊ लागली. ती परंपरा आजही सुरु आहे.
लोहा तालुक्याच्या सीमेवर त्यांनी गुराखी गडाची निर्मिती केली. तसेच १९९१ पासून या गडावर दरवर्षी जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरविले जाते.
केशवराव धोंडगे हे त्या भागातले अतिशय लोकप्रिय असे व्यक्तिमत्त्व होते.
कुठलेही अधिवेशन चालू होण्याच्या आदल्या दिवशी कंधारच्या शिवाजी चौकात केशवराव धोंडगे सभा घेऊन आपण कोणकोणते प्रश्न मांडणार आहोत. कोणत्या समस्यांना वाचा फोडणार आहोत, याची कल्पना मतदारांना देत होते.
अधिवेशनावर परत आल्याच्या दुसऱ्याच दिवशी, अधिवेशनात आपण कोणकोणती कामे केली. केव्हा केव्हा आणि कसकसा भाग घेतला. याची नोंद मतदारांपुढे ते ठेवत. कुणाला नोकरी लावण्यासाठी, कुणाची बदली करण्यासाठी अगर नोकरीत बढती मिळवण्यासाठी त्यांनी कुणालाही चिठ्ठीचपाटी दिली नसल्याचे त्यांच्या जवळचे लोक सांगतात.
केशवराव धोंडगे मनाने किती मोठे होते हे एका उदाहरणावरून सांगता येईल.
कंधार येथील शिवाजी मोफत कॉलेज मध्ये घनश्याम महाराज नावाचे वयाने ज्येष्ठ असणारे शिपाई होते. संस्थापन संचालक असणारे केशवराव धोंडगे त्यांना आहोजावो बोलत. शिपायाला आहोजाहो बोलणे चमत्कारिकच वाटायचे.
हैदराबाद मुक्तिसंग्राम असो की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो मोठ-मोठ्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. जनतेवरचं त्यांचं प्रेम आणि जनतेचा भाईंवरचा विश्वास याच बळावर ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहचले होते .
‘जय क्रांती’ अशी घोषणा देत विधानसभेत अनेकांना ते गारद करीत होते. केशवराव धोंडगे यांचा शताब्दीनिमित्त विधिमंडळात काही महिन्यांपुर्वी सत्कार करण्यात आला.
जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता अशी केशवराव धोंडगे यांची ख्याती होती. औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हे ही वाच भिडू
- केशवराव पंतप्रधानांना म्हणाले, “तुमच्या फोटोवर निवडून आलेलो नाही पदाला शोभेल असं बोला”
- केशवराव काँग्रेसमध्ये गेले असते तर शंकरराव चव्हाणांच्या आधी मुख्यमंत्री झाले असते.
- डॉ. आंबेडकर, धोंडगे ते सदावर्ते स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीचा इतिहास असा आहे
केशवराव धोंगडे यांच्या शतकपूर्ती निमित्त ऑगस्ट महिन्यात विधानसभेत त्यांच्या सत्कार करण्यात आला होता.