कोडॅकने भारतात सगळ्यात स्वस्त टीव्ही लॉंच केले, पण इतके वर्ष कोडॅक कुठे होतं?
त्यादिवशी मोबाईलवर स्क्रोल करताना एक बातमी दिसली, कोडॅकने भारतात सगळ्यात स्वस्त tv लॉंच केले आहेत. हे वाचून मी फ्लॅशबॅक मध्ये गेले जेव्हा कोडॅक म्हणजे कॅमेरा आणि कॅमेरा म्हणजे कोडॅक हेच समीकरण होतं. प्रत्येक फोटो स्टुडिओवर मोठ्या अक्षरात कोडॅक लिहिलेलं असायचं. आणि हळूहळू फोटो स्टुडिओवरचं कोडॅकचं बॅनर पुसट झालं. तेव्हा प्रश्न पडला इतके वर्ष कोडॅक कुठे होतं. आणि इतक्या वर्षात कोडॅक नाव का समोर आलं नाही. आणि आता कोडॅक, टीव्ही का बनवतेय.
१८८८ मध्ये जॉर्ज ईस्टमनने ‘द ईस्टमन कोडॅक कंपनी’ची स्थापना केली. २०व्या दशकात कोडॅक हे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या जगातलं सगळ्यात प्रसिद्ध नाव होतं. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी उद्योगात कोडॅकने क्रांती घडवून आणली.
ज्या वेळी फक्त लायका आणि रोलीफ्लेक्स सारख्या मोठ्या कंपन्याचे कॅमेरे फिल्म शुटींगसाठी वापरले जायचे. तेव्हा कोडॅकने पोर्टेबल आणि परवडणारे कॅमेरे मार्केटमध्ये आणले. तो असा एक काळ होता जेव्हा प्रत्येक घरात फक्त कोडॅकचे कॅमेरे असायचे.
जवळजवळ संपूर्ण २० व्या शतकातलं कोडॅक हे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी क्षेत्रातल सगळ्यात मोठ नाव होतं. पण काही चुकीच्या निर्णयांमुळे कोडॅक कंपनी पूर्णपणे डबगाईला गेली आणि कंपनीने २०१२ मध्ये स्वतःला दिवाळखोर घोषित केलं.
फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा राजा कोडॅक दिवाळखोर का झाला? कोडॅकच्या अपयशामागे काय कारण होत? कोडॅक हे त्याच्या काळातलं सर्वात मोठं नाव असूनही अयशस्वी का झालं? हेच आपण जाणून घेऊ.
सुरुवातीला कोडॅक अयशस्वी होण्याची कारणं आपण पाहूयात. कोडॅकने १९६८ पर्यंत, फोटोग्राफीच्या क्षेत्रातल इंटरनॅशनल मार्केटचा सुमारे ८०% हिस्सा त्यांनी काबीज केला होता. यासाठी कोडॅकने कॅमेरा विक्रीसाठी ‘रेझर & ब्लेड’ हा बिजनेस प्लान वापरला. रेझर-ब्लेड बिझनेस प्लॅन मागची कल्पना ही आहे की आधी रेझरची विक्री थोड्या नफ्याने करायची, मग रेझर खरेदी केल्यानंतर, ग्राहकांना त्याच्या वापरासाठी लागणाऱ्या इतर वस्तू म्हणजे रेझरमध्ये लागणार ब्लेड जास्तीच्या नफ्याने विकायचं.
म्हणजे कॅमेरा विकताना कमी नफ्याने विकायचा आणि कॅमेऱ्यात फोटो काढण्यासाठी लागणारी फिल्म आणि फोटो प्रिंट साठी लागणाऱ्या शिट्स आणि सेल्स जास्त नफ्याने विकायचे. या बिझनेस मॉडेलचा वापर करून, कोडॅक मोठ्या प्रमाणावर कमाई करू लागलं. आणि कमी वेळात युएस मधल्या टॉपच्या ५०० कंपन्यांमध्ये आपलं स्थान मिळवलं.
जसजसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसतसं फोटो काढण्यासाठी फिल्मचा आणि फोटो प्रिंटसाठी लागणाऱ्या शिट्सचा वापर हळूहळू थांबला. हे घडलं १९७५ मध्ये लागलेल्या डिजिटल कॅमेऱ्याच्या शोधामुळे.
‘फुजी फिल्म्स’ या जपानी कंपनीने डिजिटल कॅमेरा पहिल्यांदा मार्केटमध्ये आणला. आणि हळू हळू निकॉन,पँटॉक्स सारख्या कंपन्या सुद्धा डिजिटल कॅमेरा घेऊन मार्केटमध्ये उतरल्या. पण कोडॅकने कॅमेरामध्ये झालेली ही उत्क्रांती नाकारली आणि आपले साधे फिल्म कॅमेरे बदलून डिजिटल कॅमेरे मार्केटमध्ये आणायला सुद्धा नकार दिला.
कोडॅकने बदल मान्य केले असते तर डिजिटल कॅमेरा मार्केट मध्ये आणणारी पहिली कंपनी ठरली असती. कारण डिजिटल कॅमेऱ्याचा ज्याने शोध लावला तो स्टीव्हन सॅसन त्यावेळेस कोडॅकमध्येच इलेक्ट्रिकल इंजिनियर होता.
जेव्हा स्टीव्हनने कोडॅक मधल्या वरिष्ठांना त्याच्या डिजिटल कॅमेऱ्याच्या शोधाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी स्टीवला सांगितलं, की “तुमचा कॅमेरा खूप क्युट आहे पण याबद्दल कोणाला सांगू नका अशाने तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्याल.”
कोडॅक ‘रेझर and ब्लेड’ हा बिजनेस प्लान वापरत होते. त्यामुळे त्यांच्या कॅमेऱ्याची विक्री होत नसली तरी फिल्म आणि प्रिंट शिट्स विकून ते जास्त नफा मिळवत होते. पण तेही किती दिवस चालणार होतं कारण डिजिटल कॅमेऱ्याने पूर्ण मार्केट काबीज केलं होतं. त्यामुळे लोकांची पसंती सुद्धा जुन्या कोडॅक कॅमेराना नाही तर डिजिटल कॅमेऱ्याना मिळत होती. बदलत्या मार्केट डायनॅमिक्सशी जुळवून न घेतल्याने कोडॅकला उतरती कळा लागली.
डिजिटल कॅमेरा लोकप्रिय झाल्यानंतर, कोडॅकने फुजी फिल्म्सशी तुलना करण्यात आणि आपलं मत पटवून देण्यात जवळजवळ 10 वर्ष घालवली. कोडॅकचं म्हणण होतं कि लोकांना, फोटो असेच बघण्यापेक्षा फोटोज तयार होण्याची प्रक्रिया जास्त आवडते. त्यामुळे अमेरिकेची लोकं जपानी फुजी फिल्म्स पेक्षा कोडॅकची निवड करतील हा कोडॅकला विश्वास होता.
पण फुजी फिल्म्स आणि इतर अनेक कंपन्यांनी फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी सेगमेंटमध्ये कोडॅकशी शाब्दिक वाद घालण्यापेक्षा आपल्या बिजनेस वर लक्ष दिलं. आणि पुन्हा एकदा, कोडॅकने, लोकांनी दिलेल्या डिजिटल कॅमेऱ्याच्या रिव्यूकडे आणि मार्केटकडे लक्ष दिलं नाही. आणि स्वतःच्या फिल्म कॅमेऱ्याच्या प्रचारात वेळ घालवला. यात त्यांनी १० वर्ष फुकट घालवली. तोवर लोकांना हे सुद्धा समजलं होतं की, डिजिटल फोटोग्राफी ही पारंपारिक फिल्म फोटोग्राफीपेक्षा खूप वरचढ आहे. ती फिल्म फोटोग्राफीपेक्षा स्वस्त होती आणि त्याची इमेज क्वालिटी सुद्धा चांगली होती.
कोडॅकने अनेक छोट्या कंपन्या विकत घेण्यासाठी आपला पैसा वापरला पण डिजिटल कॅमेऱ्याच्या मार्केट मध्ये उडी घेतली नाही. पण जेव्हा त्यांनी डिजिटल कॅमेरे मार्केट मध्ये आणले तेव्हा खूप उशीर झाला होता. कारण लोकांना आता कोडॅकचा विसर पडला होता. आणि निकॉन, कॅनन आणि सोनी सारख्या बड्या कंपन्यांनी डिजिटल कॅमेऱ्याचं मार्केट काबीज केलं होतं.
अखेर, २००४ मध्ये कोडॅकने पारंपारिक फिल्म कॅमेऱ्यांची विक्री थांबवण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे सुमारे १५००० कर्मचारी बेरोजगार झाले. सप्टेंबर २०११ मध्ये, कोडॅकचे शेअर्ससुद्धा घसरले.
पण लहानपणी प्रत्येक फोटो स्टुडिओवर कोडॅक दिसायचं ते आता बंद झालं. पण कोडॅक कंपनी कधीच बंद झाली नाही. ते कॅमेरा अॅक्सेसरीजच्या विक्रीकडे आणि फोटोंच्या छपाईकडे वळले.
कोडॅकला त्याच्या डिजिटल इमेजिंग पेटंटसह अनेक पेटंट विकावे लागले, ज्याची रक्कम, त्यांना झालेल्या नुकसानापेक्षा ५०० मिलियन डॉलरने जास्त होती. त्यामुळे सप्टेंबर २०१३ मध्ये, कोडॅकने जाहीर केलं की ते दिवाळखोरीतून बाहेर आले आहे. यानंतर कोडॅकने आपला मोर्चा स्मार्ट टीव्हीच्या उद्योगाकडे वळवला.
२०२० साली कोडॅकने भारतात पाउल टाकलं. २०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेत कोडॅकची घोषणा झाली. कोडॅक भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा भाग म्हणून या योजनेसाठी वचनबद्ध आहे.
Kodak TV India ने ऑगस्ट २०२० मध्ये उत्तर प्रदेशच्या हापूर इथे एक प्लांट सुरू केला. या प्लांट मध्ये तीन वर्षामध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक लागली. भारतात Android स्मार्ट टीव्ही कमी दारात तयार करण्यासाठी हा प्लांट डिझाईन केला आहे.
आता कोडॅक, tv बनवण्या व्यतिरिक्त जगातल्या इतर व्यवसायांसाठी पॅकेजिंग, फंक्शनल प्रिंटिंग आणि ग्राफिक कम्युनिकेशन्स अशा सेवा पुरवते. कॅमेरे बनवण्यासाठी प्रसिध्द असलेलं कोडॅक आता औषधं सुद्धा बनवत. कोडॅक बद्दलच्या तुमच्या सुद्धा काही आठवणी असतील तर आम्हाला नक्की सांगा.
हे ही वाच भिडू:
- जाहिरातीवर पैसे खर्च न करताही ग्रो-प्रो कॅमेरा जगातला सगळ्यात भारी ब्रँड कसा बनला?
- त्याकाळी इंग्लड अमेरिकेत सुद्धा केरळच्या माणसाने बनवलेला ‘वागेस्वरी कॅमेरा’ हिट होता…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.