कोलंबियाचा बाजार करणारे पाब्लोचे ‘कोकेन हिप्पो’ आता भारतात येऊ शकतात…

पाब्लो एस्कोबार, फक्त कोलंबियात नाही तर सगळ्या जगात गाजलेलं नाव. पाब्लो मोठा कशाच्या जीवावर झाला, तर ड्रग्सचा धंदा, किडनॅपिंग असली कामं करुन. पाब्लोचं लहानपणीपासूनचं एक स्वप्न होतं, त्याला कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष व्हायचं होतं. त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही, पण त्यानं लावलेली गणितं जुळून आली असती तर पाब्लोनं कोलंबियासकट आणखी एक दोन देश सहज खिशात घातले असते.

पाब्लो एवढा श्रीमंत होता, तेवढा श्रीमंत होता याच्या कहाण्या काय संपत नाहीत. कुणी म्हणतं त्यानं आपल्या मुलीला उब मिळावी म्हणून नोटांच्या गड्ड्या जाळल्या, तर कुणी सांगतं गडी दिवसाला १५ टन ड्रग्सची तस्करी करायचा. खरं खोटं त्याच्या ५ हजार एकर एरियात पसरलेल्या नेपल्स इस्टेटला माहित.

पण पाब्लोनं कोलंबियामध्ये दहशत पसरवली, अमाप पैसा खेळवत ठेवला आणि सगळ्यात वाढीव विषय म्हणजे, त्याच्यामुळं कोलंबियात हिप्पोंचा प्रॉब्लेम सुरु झाला.

पाब्लोनं आपल्या नेपल्स इस्टेटमध्ये स्वतःचं प्राणीसंग्रहालय उभं केलं होतं. यात जिराफ होते. फ्लेमिंगो होते आणि हिप्पो सुद्धा. आता हिप्पो काय कोलंबियात वाढणारे नैसर्गिक प्राणी नाहीत, पण भावाचा नाद मोठ्ठा, त्यानं कोलंबियात ४ हिप्पो आयात केले, १ मेल आणि ३ फिमेल. पाब्लोच्या हिप्पोंना त्याच्या बिजनेसचं नाव मिळालं ‘कोकेन हिप्पो’.

पुढं पाब्लो पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला. त्याचं सगळं साम्राज्य खालसा झालं.

मग प्रश्न उभा राहिला त्याच्या प्राणीसंग्रहालयाचं काय ? तर कोलंबिया सरकारनं त्यातले काही प्राणी नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडले, काही प्राण्यांचं स्थलांतर केलं, मग उरले हिप्पो. एकतर हे हिप्पो कोलंबियाच्या नैसर्गिक अधिवासातले नव्हते, त्यात एका हिप्पोचं वजन १५०० किलोपेक्षा जास्तच. त्यामुळं त्यांचं स्थलांतर करणं हा काय सोप्पा विषय नव्हता.

मग कोलंबियन सरकारनं ठरवलं, हिप्पो काय लय जगणार नाहीत, त्यांचा विषय सोडून देऊ.

पण प्रत्यक्षात काय झालं ? हिप्पो जगले, बरं नुसते जगले नाहीत, तर त्यांची संख्याही वाढली. आत्ताच्या घडीला कोलंबियात १३० हिप्पो आहेत, पुढच्या ८ वर्षात आकडा जाईल ४०० आणि पुढच्या १६ वर्षात १५००.

नुसता आकडा वाढतोय म्हणून कोलंबियाचं टेन्शन वाढलंय अशातली गत नाहीये, तर या हिप्पोंमुळं कोलंबियात लोकांच्या जीवाला आणि पर्यावरणाला धोका तयार झाला.

हे हिप्पो राहतात मगडेलाना नदी आणि आजुबाजूच्या पाणथळ जागांमध्ये. इथं विषय असा आहे की, हे कोलंबियातल्या लोकांचे पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. जेव्हा हे हिप्पो एखाद्या नदीत किंवा तलावात राहतात, तेव्हा त्यांच्यामुळं पाण्याची क्वालिटी खराब होते, माशांचा मृत्यू होतो आणि या सगळ्याचा परिणाम होतो स्थानिक मच्छीमारांवर.

नुसतं पाणी खराब होतंय एवढाच विषय नाही, तर हिप्पो आणि मानव संघर्षात माणसांनाही जीव गमवावा लागतो. साहजिकच निवांत चिखल तुडवत हिंडणाऱ्या या हिप्पोंची भीती लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असते.

यावर कोलंबियानं दोन पर्याय आणले, पहिला हिप्पोंचं लसीकरण करण्याचा आणि दुसरा हिप्पोंना मारुन टाकायचा. ज्या संख्येनं हिप्पो आहेत, ते बघता हे लसीकरण काय शक्य झालं नाही आणि दुसऱ्या पर्यायाला सगळ्या जगभरातून विरोध झाला. मागच्या वर्षभरापासून कोलंबियाचं सरकार हिप्पोंचं स्थलांतर करता येईल का यावर विचार करत होतं, मग त्यांनी प्लॅन बनवला आणि पर्याय निवडले भारत आणि मेक्सिको.

भारतात कोलंबियाचे ६० हिप्पो येऊ शकतात… पण कुठं ?

तर उत्तर आहे गुजरात.

गुजरातमधल्या ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर इथं हे ६० हिप्पो येण्याची शक्यता आहे. हे सेंटर म्हणजे मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. इथं आधीच जगभरातून प्राणी आयात केले जात आहेत. हेच डोक्यात ठेऊन कोलंबियामधून इकडं हिप्पो पाठवायची स्कीम टाकण्यातआलीये.

भारताकडून अजून होकार-नकार कळलेला नसला, तरी हिप्पो कसे पाठवायचे याचं पण पूर्ण प्लॅनिंग कोलंबियावाले करुन बसलेत.

भरपूर खाणं भरुन त्यांना लोखंडी कंटेनर्समध्ये घालून एअरपोर्टपर्यंत आणणार आणि तिकडून फ्लाईटनं भारत आणि मेक्सिको. कोलंबियावाल्यांचं असं म्हणणं आहे की, हे दोन देश, इथली अभयारण्य या हिप्पोची व्यवस्थित काळजी घेऊ शकतील.

थोडक्यात विषय असाय की, पाब्लोचे कोकेन हिप्पो भारतात येऊ शकतात, फक्त इथल्या वातावरणात जुळवून घेणार का ? त्यांची वाढणारी संख्या भारताचं टेन्शन वाढवणार का ? याकडं लक्ष ठेवावं लागेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.