बाळासाहेब म्हणाले, “मी एकटा फोटो काढणार नाही, नितीनला पण बोलावं…”

महाराष्ट्रात अघळपघळ बोलणारी काही निवडक नाव घ्यायची म्हंटली तर दोन नाव आवर्जून सांगता येतील. यातील पहिलं नावं म्हणजे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं नाव म्हणजे सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी.

कदाचित यामुळेच या दोघांचे एकमेकांशी कायमस्वरूपी सख्य राहिलं. केवळ सख्यचं नव्हतं तर बाळासाहेब ठाकरे गडकरींवर अगदी पुत्रवत प्रेम करायचे. कोणालाही भीडभाड न ठेवता दिलखुलास बोलणारे गडकरी बाळासाहेबांचे अगदी लाडके होते. कित्येकदा गप्पा मारायला म्हणून देखील ते मातोश्रीवर जायचे.

त्यामुळेच शिवसेनेच्या अगदी मनोहर जोशींपासून ते इतर अनेक नेते बाळासाहेबांना काही सांगायचं असेल तर गडकरींना मध्ये घालायचे.

अश्या या भावनिक नात्याचा अजून एक बंध म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा नितीन गडकरींशिवाय फोटो काढण्यास दिलेला नकार.

तशी वाटण्यास ही घटना छोटी वाटू शकते, पण बाळासाहेब यांचे छोट्यातील छोट्या गोष्टींसाठी देखील लाडक्या नितीन गडकरींविषयी वाटणारं प्रेम होतं.

त्याचं झालेलं असं कि, बाळासाहेब ठाकरे यांनी मी ऑटोबायोग्राफी अर्थात आत्मचरित्र लिहिणार नाही हे जाहीर केलेलं आपणा सर्वांनाच माहित आहे. पण १९९९ मध्ये युतीचं सरकार सत्तेतुन गेल्यानंतर राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांची फोटो बायोग्राफी करण्याची कल्पना सुचली.

त्यांनी हा प्रस्ताव बाळासाहेब ठाकरे यांना बोलून दाखवला. म्हणाले,

ऑटो नाही तर कमीत कमी फोटो बायोग्राफी तरी.

बाळासाहेब ठाकरेंनी देखील त्यासाठी राज ठाकरे यांना परवानगी दिली, आणि साधारण २००२ च्या दरम्यान याच काम सुरु झालं. राज ठाकरे यांना या काळात त्यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी काढून ठेवलेल्या बाळासाहेबांच्या फोटोंची बरीच मदत झाली. सोबतचं अनेक माध्यम समूहांनी त्यांना मदत केली. शिवसेनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी देखील ठाकरे यांना अनेक फोटो पाठवले.

याच फोटो बायोग्राफीसाठी राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचा युती सरकारच्या काळातील मुंबईतील रस्त्यांचा विकास वगैरे दाखवण्यासाठी मुंबईतील एका फ्लायओव्हर सोबत फोटो हवा होता. त्यांनी त्यासाठी बाळासाहेब यांना फोटो काढण्यासाठी जायचे असल्याचं सांगितलं. त्यावर बाळासाहेब म्हणाले, 

“फ्लायओव्हरवर फोटो काढायचा आहे, पण मी एकटा नाही काढणार फोटो. नितीनला बोलावं”

त्याचं कारण पण अगदी स्पष्ट होतं. रस्त्यांच्या विकासात नितीन गडकरी यांचं योगदान देखील मोठं होतं. १९९५ मध्ये जेव्हा युती सरकार सत्तेत होते तेव्हा नितीन गडकरी त्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. या संपूर्ण काळात नितीन गडकरी यांनी रस्त्यांचं जाळं विणून संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलून टाकला होता.

काही निवडक उदाहरण सांगायची तर नितीन गडकरी यांनी आपल्या कार्यकाळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, मुंबई शहरातील जवळपास ५५ उड्डाणपूल, वरळी-बांद्रा सी-लिंक असे प्रकल्प हाती घेतले होते. या सगळ्या कामांचं भूमिपूजन देखील खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

त्यामुळेचं कदाचित बाळासाहेब यांनी नितीन गडकरी यांना बोलावलं आणि राज ठाकरे यांना हवा असलेला तो फोटो काढला.

राज ठाकरे यांच्याकडे या ३ वर्षांच्या संशोधन काळात तब्बल १३ हजार फोटो जमा झाले होते, त्यातील त्यांनी निवडक ८०० फोटो बाजूला काढले त्यात हा नितीन गडकरी यांच्यासोबतचा होता. अखेरीस या फोटो बायोग्राफीचं प्रकाशन जानेवारी २००५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये गेट वे ऑफ इंडियाच्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आलं होतं.

त्या सोहळ्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, शरद पवार, प्रमोद महाजन, लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, असे इतर अनेक दिग्गज मंडळी देखील उपस्थित होती.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.