काँग्रेसला संधी होती तरी पवारांनी चकवा दिला अन शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं..

साल १९९५, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका होत्या. काँग्रेसचे शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. या निवडणुकांना मुंबई दंगली, ९३ चे बॉम्बस्फोट,  किल्लारी भूकंप अशा अनेक घटनांची पार्श्वभूमी होती. खुद्द शरद पवारांचे पुलोद सरकार वगळता महाराष्ट्रात आजवर कधी बिगर काँग्रेसी सरकार आलं नव्हतं. आपापसात भांडायचे पण शेवटी मुख्यमंत्री काँग्रेसचाच व्हायचा.

त्या वेळी मात्र परिस्थिती तशी नव्हती. शिवसेना भाजप या विरोधी पक्षांनी यंदा विधानसभेवर भगवा फडकवायचाच !

शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप होत होते. दाऊदशी मैत्री असल्यापासून ते परदेशी एन्रॉनला महाराष्ट्र विकल्यापर्यंत टीकेची फैरी झडत होती. मुंबई महानगरपालिकेचे गो.रा.खैरनार यांच्या पासून ते अण्णा हजारेंपर्यंत अनेकजण यात आघाडीवर होते.

भाजपच्या गोपीनाथ मुंडेंनी संपूर्ण राज्यात संघर्ष यात्रा काढून जोरदार रान उठवलं होतं.

निवडणुका आल्या आणि त्यांच्या व बाळासाहेब ठाकरेंच्या सभांची गर्दी वाढू लागली. ग्रामीण भागात देखील युतीच्या गाजणाऱ्या प्रचारसभा पाहता  शरद पवारांची खुर्ची डळमळीत होत आहे असं बोललं जात होतं. पण पवार मुरलेले राजकारणी होते. पंतप्रधानपदाची तयारी करणारे पवार मुख्यमंत्रीपद इतक्या सहजासहजी सोडतील असं वाटत नव्हतं.

निवडणुका झाल्या. राजकीय पंडितांचा अंदाज खरा ठरला. काँग्रेसचे शिवाजीराव निलंगेकर पाटील, छगन भुजबळ, पतंगराव कदम, विलासराव देशमुखांसारखे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. काँग्रेसच्या ६१ जागा कमी झाल्या.

मात्र तरीही निकालात ८० आमदार निवडून आलेली काँग्रेस राज्यातील सर्वात मोठी पार्टी म्हणून समोर आली. दोन नंबरला असलेल्या शिवसेनेचे ७३ आमदार आणि भाजपचे ६५ आमदार निवडून आले होते. शिवसेना आणि भाजपचे मिळून १३८ आमदार होते. पण तरीही युती मॅजिक फिगर पेक्षा लांब होती. जनता दल, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष यांचे मिळून जवळपास तीस भर आमदार होते.

या निकालामुळे महाराष्ट्रात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती.

आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा ४५ अपक्ष आमदार निवडून आले होते. हे अपक्ष आमदार राज्याचा मुख्यमंत्री ठरवणार होते. हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख असे कित्येक तरुण आमदार शरद पवारांच्या उमेदवारांना पाडून अपक्ष म्हणून निवडून आले होते.

खरे तर हे सर्व आमदार काँग्रेसी विचारसरणीचे होते. पक्षाने तिकीट दिल नाही म्हणून ते अपक्ष उभे होते. निवडून आल्यावर पुन्हा काँग्रेस मध्ये परतण्याची अपक्ष आमदारांची परंपरा होती.

निकाल हाती आले आणि युती काँग्रेस दोन्ही बाजूंचे पोलिटिकल मॅनेजर सत्ता स्थापनेच्या तयारीला लागले.

सगळ्यांचं लक्ष पवारांवर होतं. शरद पवारांची संपूर्ण भारतात काँग्रेसचा चाणक्य म्हणून ओळख होती. ते मनात आणले तर शिवसेना भाजप या पक्षातील आमदार फोडू शकतात, अपक्ष आमदार तर त्यांच्या डाव्या हातचा मळ आहे असं म्हटलं जात होतं. जनता दलाने तर आधीच काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर देखील केला.

तेव्हा राज्यपाल होते पी सी अलेक्झांडर. त्यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून शरद पवारांना सत्ता स्थापनेच आमंत्रण दिलं. संपूर्ण मीडियावाले राज्यपाल भवनाच्या बाहेर उभे झाले. शरद पवार कोणता डाव खेळणार याची फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला उत्सुकता होती.

मात्र राज्यपालांसोबत मिटिंग झाली पवार बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं,

“आम्ही सत्तास्थापनेचा दावा नाही करत आहोत. आमचे सर्वात जास्त आमदार निवडून आले असले तरी जनतेने आमच्या विरुद्ध कौल दिला आहे. हा कौल आम्हाला मान्य आहे.”

पवारांनी पुन्हा एकदा चकवा दिला.

हा सगळ्यांसाठीच मोठा धक्का होता. सत्ता स्थापनेची संधी असूनही शरद पवार मुख्यमंत्रीपद सहजासहजी सोडत आहेत या मागे कोणती खेळी आहे याच्या चर्चा करण्यात पत्रकार रंगले. इकडे शिवसेना भाजपची बोलणी पार पडली. मनोहर जोशी, उद्धव ठाकरे या दोघांनी बाळासाहेबाच्या वतीने बोलणी केली होती. काँग्रेस मधून फुटलेले अनेक अपक्ष आमदार सेनेच्या गळाला लागले.

सेनेला मुख्यमंत्रीपद आणि भाजपला उपुख्यमंत्रीपद अशी वाटणी झाली. मनोहर जोशींनी शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शरद पवार एकेठिकाणी सांगतात,

दिल्लीतून मला निरोप आला होता. अपक्ष आमदारांना घेऊन सरकार स्थापनेसाठी पक्ष श्रेष्ठीचा मोठा दबाव होता.  मी ते करूही शकलो असतो. पण तसं केलं असतं तर ती चूक झाली असती. म्हणून मी सरळ राजीनामा दिला आणि राज्यात पहिल्यांदा सेना-भाजपचं सरकार आलं.

शरद पवार किती जरी म्हणत असले की मी मोठं मन दाखवलं पण त्यांनी मुद्दाम सत्ता स्थापन केली नाही असं अनेकांचा मत होतं.

शरद पवारांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदामध्ये रसच नव्हता. त्यांना मुंबईपेक्षा दिल्लीची ओढ लागली होती. ते नरसिंहराव यांना पंतप्रधानपदावरून खाली खेचण्यासाठी धडपडत होते. सत्ता न स्थापन करून त्यांनी केंद्रातल्या व राज्यातल्या पक्षांतर्गत विरोधकांना एकप्रकारे इशाराच दिला होता अस म्हणतात. पक्षातील आपलं महत्व ठसवून देण्याचा हा प्रयत्न होता.

बाळासाहेब ठाकरेंशी त्यांची असलेली मैत्री जगजाहीर होती. इतकंच नाही तर मनोहर जोशींना मुख्यमंत्री करावं हा सल्ला देखील त्यांनीच शिवसेनाप्रमुखांना दिला होता. 

काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी मात्र त्यांच्या उघड उघड टीका केली. लातूरमधून पराभूत झालेले विलासराव देशमुख म्हणाले,

“एका माणसाच्या अतिमहत्वाकांक्षेपायी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला.”

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.