ऊसपट्ट्यात लोणंदच कांदा मार्केट उभा राहणं ही एका दिवसाची गोष्ट नव्हती…

पश्चिम महाराष्ट्राचं नावं घेतलं की इथं ऊसाच राजकारण आणि सोबतीला दूधाच अर्थकारण. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांना याच गणितानं एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. इथले जेवढे राजकारणी झाले ते सगळे याच प्रश्नांवर.

पण या अखंड भागात एक गाव असं आहे जिथं ऊसाच्या गोडव्याचं नाही तर डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याच्या राजकारण आणि अर्थकारण चालतं.

सातारा जिल्ह्यातील लोणंद हे शहर.

इथं महाराष्ट्रातील कांद्याची दोन नंबरची बाजारपेठ वसली आहे. १९६९ पासून सुरु झालेली ही बाजारपेठ आजही आपली स्वतंत्र ओळख घेवून उभी आहे. विशेष म्हणजे २०१६ पुर्वी इथं ग्रामपंचायत होती. तरीही कांद्याची उलाढाल देशात लक्षणीय आहे. साधारण १५ एकरातील या बाजारपेठेत आठवड्याला साडे सात ते ८ हजार क्विंटल कांद्याची आवक होते.

१५ फेब्रुवारी १९५२ साली फलटण इथं कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. या अंतर्गतच खंडाळा तालुकाही येत होता. मात्र पुढे प्रत्येक तालुक्यासाठी शासनानं वेगळ्या बाजार समितीची योजना आणली आणि १९६९ मध्ये खंडाळा तालुक्यासाठी शासनाच्या आदेशानंच स्वतंत्र बाजार समितीची घोषणा झाली.

तालुका खंडाळा असला तरी लोणंद इथं रेल्वे स्टेशन असल्यानं दळण-वळण सोपं आणि सोयीस्कर व्हावं यासाठी इथं १५ एकर जागा उपलब्ध करुन दिली. आणि इथूनचं लोणंदच्या बाजारपेठेची सुरुवात झाली.

कांदा मार्केटची सुरुवात कशी झाली ?

लोणंदच्या आजूबाजूला माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगावचा काही भाग हे कायमस्वरुपी दुष्काळी तालुके आहेत. आणि कांदा हे पीकं देखील कमी पाण्यावरचं. त्यामुळे इथला शेतकरी हा वर्षानुवर्ष कॅश क्रॉप अर्थात नगदी पीक म्हणून कांद्याचं पीकं घेत आला आहे.

या तालुक्यांमध्ये दुष्काळासोबतच दळण-वळणाचा देखील मोठा प्रश्न होता. खंडाळा, माण, खटाव, फलटण या चार तालुक्यांमध्ये लोणंद हे एकमेव रेल्वे स्टेशन होतं. त्यामुळे इथला शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी फलटण ऐवजी लोणंदला घेवून येवू लागला.

यातुनच इथल्या बाजारपेठेला कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखं मिळाली. या प्रमुख तालुक्यांसह शेजारच्या पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, बारामती आणि दौंड तसेच सोलापूर जिल्ह्यातील तालुक्‍यांमधूनही लोणंदच्या बाजार समितीत कांद्याची आवक होते.

लोणंदाचा कांदा ही वेगळी ओळख

लोणंदला खरिपातील हळवा कांदा ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात, तर रब्बीतील गरवा कांद्याची डिसेंबर ते एप्रिल या महिन्यामध्ये आवक होत असते. या कांद्याचा रंग लालसर असल्यानं इथल्या कांद्यास त्याच्या वाणावर न ओळखता “लोणंदाचा कांदा” म्हणून ओळखलं जातं.

१९९० पुर्वी लोणंदचं कांदा मार्केट देशात १ नंबर होतं

बाजार समितीचे माजी सचिव प्रकाश धापते ‘बोल भिडू’शी बोलताना सांगतात,

लोणंदची पुर्वीची कांद्याची बाजारपेठ ही आशिया खंडातील आताची सगळ्यात मोठी असलेल्या लासलगावं बाजारपेठेपेक्षा मोठी होती. अगदी १९९० पर्यंत इथं प्रत्येक गुरुवारी १ लाख पिशव्यांची आवक होतं असायची. गुरुवारच्या बाजारात सुरु झालेला हा कांद्याचा लिलाव अगदी रविवारचा दिवस संपेपर्यंत चालायचा. वकल टू वकल अगदी एका पिशवीचा देखील लिलाव व्हायचा. (वकल म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा माल. कोणाचा पाच पोती, कोणाचा दहा पोती अशा स्वरुपात)

पण कालांतरानं दळण-वळणाच्या सुविधा वाढल्या. रस्ते झाले. बाजार समित्यांची संख्या आणि उपबाजार आवारांची संख्या वाढली. त्यामुळे जवळपास सगळीकडे इतर पिकांसोबतच कांद्याच्या पीकाचे लिलाव होवू लागले. त्यामुळे लोणंदची आवक कमी झाली.

आता मात्र प्रत्येक गुरुवारी १० हजार किंवा जास्तीत जास्त १५ हजार पिशव्यांची आवक होते. मात्र आजही कांद्याची राज्यातील दोन नंबरची बाजारपेठ म्हणून लोणंदला ओळखलं जातं.

एकेकाळी भारतातील सगळ्यात पहिला कांद्याचा लिलाव लोणंदला होत असायचा…

माण आणि इतर तालुक्यातील शेतकरी हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हळव्या कांद्याची लागणं करतात. तो साधारण ऑगस्टमध्ये काढणीला येतो. हाच कांदा देशात सर्वप्रथम लोणंदमध्ये दाखल व्हायचा. भारतात कुठे ही कांद्याचे लिलाव चालू झालेले नसायचे तेव्हा लोणंदच्या कांद्याचा लिलाव चालू असायचा, असं ही धापते यांनी सांगितलं.

कोलकात्यापासूनचे व्यापारी खरेदीसाठी येत असतं

लोणंदमध्ये खास कांद्याच्या खरेदीसाठी दिल्ली, मुंबई, कोलकाता इथून व्यापारी येत असतं. तीन-चार दिवस मुक्काम करुन कांद्याची गाडी भरुन आपल्या गावी पाठवून देत असतं.

तसेच नाशिकचे काशिनाथ पाटील आणि इतर कांदा व्यापारी लोणंदला खरेदीसाठी येत असतं. १९७५ आणि पुढे त्या नंतरच्या काळात पुण्यावरुन जयंतीलाल मंगलदास आणि बन्सीलाल रायसोनी हे व्यापारी स्कुटरवरुन येत असतं. हे एक्सपोर्ट करणारे व्यापारी असल्यामुळं आमच्या कांद्याला बाहेरच्या राज्यात आणि देशातही मागणी वाढली, असंही धापते यांनी सांगितलं. आजही हे दोघे पुण्यातील प्रमुख निर्यातदार व्यापारी आहेत.

बाजार समिती कांद्याची आवक पुन्हा वाढावी यासाठी प्रयत्न करतीय…

सचिव धापते सांगतात, २०१० – ११ नंतर माण आणि खटाव तालुक्यातील शेतकरी सांगली जिल्ह्याकडं वळला. त्यांना पुन्हा आमच्या बाजार समितीला जोडण्यासाठी आम्ही २०१५ मध्ये लोणंद बाजार समितीचा प्रचार वजा शेतकऱ्यांच्या दारावरती जावून भेटी-गाठीचा कार्यक्रम राबवला होता.

शेतकऱ्याच्या कांदा उत्पादनात वाढ व्हावी, नवीन तंत्राची माहिती व्हावी यासाठी बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना सुगी पश्‍चात तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी तळेगाव दाभाडे इथं पाठविलं जातं.

लोणंद आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी बाजार समितीनं सुसज्ज असं मंगल कार्यालय बांधलं असून, ते लग्नापासून सर्व शुभ कार्यांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलं जातं. शेतकऱ्यांसाठी मंगल कार्यालय बांधणारी लोणंदची एकमेव बाजार समिती असल्याचं बाजार समितीचे सध्याचे सचिव विठ्ठल संपकाळ यांनी बोलभिडूला सांगितलं.

दर गुरुवारी भरतो जनावरांचा बाजार

या बाजारसमितीत दर गुरुवारी शेळ्या-मेंढ्याचा आठवडी बाजार भरतो. जिल्ह्याती मोठ्या बाजारांपैकी हा बाजार आहे. येथे चार ते पाच हजार शेळ्या- मेंढ्या, तसेच १०० ते १५० जनावरांची आवक व खरेदी विक्री होते.

अस हे लोणंदचं कांदा मार्केट, ऊसपट्ट्यातील भागात कांदा मार्केट कस काय असा प्रश्न अनेकांना पडतो. एखाद्या शहराला एखादी ओळख मिळण्यामागे एक दिवसाचा प्रवास नसतो तर त्यामागे वर्षांनूवर्षांचा प्रवास असतो. यातूनच अस्सल गोष्ट जन्माला येत असते. लोणंद कांदा मार्केट देखील असच आहे हे सांगणारी ही गोष्ट.

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.