पंधरा वाडीवस्तीवरील फक्त ५५-६० विद्यार्थांपर्यन्तच आम्ही ऑनलाईन शिक्षण पोहचू शकलोय

चार दिवसांपुर्वीच वृत्तपत्रांमधून देशभरामध्ये २७ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असल्याचे ‘एनसीआरटी’ने केलेल्या संशोधन समोर आले. याच मुख्य कारण म्हणजे मोबाईल आणि लॅपटॉप नसणे हे सांगितले. त्यासोबतच इंटरनेट कनेक्टीव्हिटी आणि वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या असल्याचेही निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.

हे झाले देशातील. आता जरा महाराष्ट्रात येवू.

त्याच दिवशी सोशल मिडीयावर कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावच्या स्वप्नाली सुतार या मुलीची डोंगरावर शिक्षण घेत असल्याची पोस्ट व्हायरल झाली. गावात नेटवर्क नसल्याने घरापासून दोन किलोमिटर अंतरावरील जंगलमय भागात झोपडी बांधून ती ऑनलाईन शिक्षण घेत आहे.

या सगळ्या मुलांच्या समस्या जगासमोर आल्या आहेतच, परंतु ज्या प्रमाणात विद्यार्थ्यांना समस्या येत आहेत तशाच समस्या शिक्षकांना येत आहेत. याच समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही शहरातील नाही तर खेड्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलत करण्याचा प्रयत्न केला.

त्यातुन समोर आली ग्रामीण भागातील डिजीटल शिक्षणाची आपबिती. तिच आम्ही तुमच्या समोर जशी आहे तशी मांडत आहोत…..

पाटण तालुक्यातील मुरुड गावं, सातारा जिल्ह्यातील हा सगळ्यात दुर्गम भाग. सह्याद्रीच्या खोऱ्यात आणि तारळी धरणाच्या काठावर वसलेलं गावं. पावसाळ्याच्या दिवसात कधीही बाहेर पडा तुम्ही चिंब भिजणारच असा सतत पाऊस चालूच असतो. सह्याद्रीच्या खोऱ्यामुळे औद्योगिक विकास अजूनही दुरापास्तच.

आजूबाजूच्या पाडेकरवाडी, घाटेवाडी, टेळेवाडी, रेडेवाडी, मालोशी, तोंडोशी, धुमकवाडी, लोरेवाडी, डिगेवाडी, कुशी या आणि अशा एकुण १५ छोट्या-छोट्या वाड्या-वस्त्यांमध्ये हे मोठं गावं.

याच १५ वाड्या-पाड्यांमध्ये मिळून एकमेव मुरुड हायस्कुल आहे. शाळेतील पहिले ते दहावीच्या वर्गात २२३ विद्यार्थी. यापैकी अवघ्या ५५-६० मुलांच्या पालकांकडे एन्ड्रॉईड फोन आहेत. बाकीचे विद्यार्थी अजूनही शाळा चालू होण्याच्या आशेवरच आहेत.

आम्ही सरांशी बोलण्याच्या काही मिनीटे आधीच त्यांनी सहावीचा ऑनलाईन क्लास घेतला होता. यामध्ये एकुण ३० विद्यार्थ्यांपैकी अवघे ६ विद्यार्थी हजर होते.

ते सांगत होते,

एन्ड्रॉईड फोनची संख्या कमी असणे हे कारण तर आहेच, परंतु १५ गावांपैकी मुरुड, धुमकवाडी, लोरेवाडी, डिगेवाडी, कुशी या अवघ्या पाच गावांमध्येच मोबाईलचे नेटवर्क येते. अन् त्यामुळे इच्छा असूनही बाकीच्या १५०-१६० मुलांपर्यंत आम्हाला पोहचताच येत नाही.

सर पुढे सांगतात,

आहो खूप मोठा फरक ऑनलाईन आणि प्रत्यक्ष शिकविण्यामध्ये. आम्ही वर्गात असताना मुलांना भुगोलच्या तासाला नकाशा दाखवून त्यांना नकाशा वाचन कसे करायचे हे प्रत्यक्ष शिकवू शकतो. तसेच विज्ञानच्या तासाला एखादे झाड प्रत्यक्ष दाखवून ते समजावून सांगु शकतो. मराठीमध्ये एखादी कविता शिकवताना हातवारे करुन दाखवणे किंवा एकत्र वाचन करुन घेणे, गणित शिकवताना एखादी पायरी चुकली किंवा पाढे पाठ करुन घेताना चुकीचे म्हंटले गेले तर छडीची भिती दाखवून किंवा प्रसंगी हातावर एखादी छडी मारुन ती चूक त्याच्या लक्षात आणून दिली जाते.

यामुळे वक्तशीरपणा, नियमीत आणि अचूक अभ्यासाची सवय मुलांना लावता येत होती. यापैकी एकही गोष्ट ऑनलाईनला करता येत नाही.

ऑनलाईन शिक्षणात मुलांएवढीच शिक्षकांची देखील गडबड झाली आहे. कोणताही नवीन अभ्यासक्रम आला की शिक्षकांना त्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाते. पण ऑनलाईनच्या शिक्षणासंबंधी कोणतेही प्रशिक्षण झालेले नाही. तसेच ४०-५० वयाच्या पुढच्या काही शिक्षकांना एन्ड्रॉईड मोबाईलचे ज्ञान अगदीच मर्यादित आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांचा यात प्रकर्षाने समावेश आहे.

त्यामुळे कधी मुले शिकायला बसली आहेत आणि शिक्षक गडबडून जातात, असे चित्र आहे. तर कधी शिक्षक असतात पण मुलेच समोर बसलेली नसतात. तर शिकवायचे कसे आणि कोणाला? शिक्षण संवादात्मक (इंटरॲक्टिव) करण्यासाठी मोबाईल/लॅपटॉपच्या कॅमेऱ्याचा वापर कसा करायचा? नोटस् कशा द्यायच्या? यासोबतच तुमच्या-आमच्या सारख्या अनेकांचे भविष्य उजवळेला फळा गायब झाला आहे, ऑनलाईनमध्ये तो कुठून आणायचा? असे अनेक प्रश्न ग्रामीण भागातील शिक्षकांना पडत असल्याचे सरांनी सांगितले.

काही मुले शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल टाईमपास देखील करत असल्याचे आम्ही पाहतो. पालकांना देखील ही गोष्ट आम्ही वारंवार सांगतो. पण यामुळे पालक ही वैतागुन आम्हालाच बोलून गेले. त्यानंतर बरेच वेळा आम्ही दुर्लक्ष करतो. पण शेवटी न राहून आम्ही ही गोष्ट पालकांना सांगतोच…

या सर्व अडी-अडचणींनंतर देखील सर सांगतात,

एकदा शाळा सुरु झाल्यानंतर आम्ही हे सर्व पुन्हा एकदा शिकवणार आहे. त्यासाठी आम्ही अकरा ते पाच या वेळेच्या बंधनात स्वतःला बांधणार नाही. गरज पडल्यास रविवारी देखील येण्याची तयारी आहे. पण मुलांचे शिक्षण नीट होणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. उद्योग-व्यवसाय पुन्हा उभा राहू शकतो. पण शिक्षण हा आयुष्याचा पाया आहे. ते जर नीट नाही झाले तर पिढीच नुकसान अटळ आहे.

त्यामुळे मुलांनी कोणतही काळजी करु नये, शाळा चालु झाल्यानंतर सर्व गोष्टी पुन्हा शिकवल्या जातील, असा विश्वास ही सरांनी दिला.

हे झालं फक्त एक प्रातिनिधीक उदाहरण. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या शाळांची, शिक्षकांची स्थिती याचप्रमाणे झाली आहे. शिक्षणाच्या बाबतीत नेहमीच स्पर्धेचं युग असा उल्लेख केला जातो.

शहरातील, सधन घरातील मुलं पहिल्यापासून इंटरनेट वापरत असतात, एन्ड्राईड काय तर त्यांना OS मधला फरक देखील समजत असतो. अशा वेळी फक्त रेन्ज आणि मोबाईलमुळे संपूर्ण एक पिढी या स्पर्धेतून बाद होण्याच्या मार्गावर आहे हे नक्की, या कठीण परिस्थितीवर मात करत शिक्षक मुलांना शिकवत आहेत. आज जरी पोहचणं अशक्य असलं तरी उद्या शाळा सुरू झाल्यानंतर रात्रीचा दिवस करुन मुलांना शिकवू अशी आशा ते बाळगुन आहेत.

  •  ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.