महादजी शिंदेंनी मुघल बादशहाला संपूर्ण भारतात गोवंशहत्या बंदीचा फर्मान काढायला लावला

पानिपतची तिसरी लढाई म्हणजे मराठेशाहीतील इतिहासातील भळभळती जखम. अफगाणिस्तानच्या अहमद शहा अब्दालीला नजीबखान रोहिल्याने भारतात आणले.

महाप्रचंड लूट माजवत असलेल्या अब्दालीला रोखण्यासाठी उत्तरेत गेलेल्या सदाशिवराव भाऊ पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवाला भारताशी गद्दारी करणारा नजीबखान रोहिला सर्वस्वी जबाबदार होता.

पानिपतामुळे मराठ्यांचा कणाच मोडला. लाखो घरे उध्वस्त झाली. पिढीच्या पिढी नष्ट झाली.

मराठयांच उत्तरेत झालेलं पानिपत भरून काढलं महान सरदार महादजी शिंदे यांनी.

अठराव्या शतकात मुघल सल्तनत खिळखिळी झाली होती. तेव्हाचा बादशहा शाह आलम फक्त नामधारी झाला होता. देशभरात छोट्या मोठ्या सत्तांनी आपली सरकारे स्थापन केली होती. ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी तोपर्यंत मोठी ताकदवान झालेली होती.

दिल्लीत देखील रोहील्यांच राज्य होतं. पण उत्तरेतील जनता मुघल बादशाहलाच मानणारी होती. त्यांना रोहिल्याचं राज्य पसंद नव्हते. नजीब खान रोहिल्याचा नातू गुलाम कादिर हा त्यांचा प्रमुख होता.

गुलाम कादिर स्वभावाने आपल्या आजोबांच्याही वरचढ क्रूर आणि पाताळयंत्री होता.

उत्तरेत मराठे इतर युद्धात गुंतलेले पाहून त्याने मुघल बादशहा शहा आलमला ताब्यात घेऊन कारभार हाकायला सुरवात केली.

एकेकाळी महादजी शिंदेंनी शाह आलम बादशहास इंग्रजांच्या तावडीतून सोडवून दिल्लीच्या तख्तावर बसविले होते. पण पुण्यात उदभवलेलं राघोबा दादाचे बंड, कोल्हापूर गादीचा प्रश्न बारभाई कारभार अशा कारणांमुळे महादजी शिंदे दक्षिणेत अडकून पडले होते.

गुलाम कादिरने या काळात दिल्लीच्या लाल किल्ल्यात अक्षरशः धुमाकूळ घातला.

बादशहाच्या जनानखान्यातील महिलांची अब्रूवर हात टाकला, लाल किल्ल्यातील सगळं धन लुटलं.

इतकंच नाही तर एकदा खुद्द बादशाह शाह आलम याला चाबकाने फोडून काढले.

दारूच्या नशेत स्वतःवरचा ताबा गमावलेल्या गुलाम कादिरने स्वतःच्या हाताने पेशकबाजाने बादशहाचे दोन्ही डोळे फोडून टाकले. गुलाम कादिरची राजवट ही अतिशय अमानवीय जुलमी कारभाराने बरबटलेली होती.

बादशहा सकट अख्खा उत्तर भारत द ग्रेट मराठा महादजी शिंदे परतण्याची वाट पहात होता.

१७८८ साली महादजी शिंदेंनी दिल्लीकडे कूच केली. फक्त हिंदूच नाही बरेचसे मुस्लिम सरदारही कादिरच्या वर्तवणुकीला कंटाळले होते. यामुळे इस्माईल बेग सारख्या अनेकांनी मराठ्यांना साथ देण्याचं ठरवलं.

महादजी शिंदेनी राणेखानाच्या नेतृत्वाखाली तोफा व मोठं पायदळ देऊन आपलं एक दल दिल्लीवर पाठवलं तर दुसरीकडे रोहिल्यांच्या अंतर्वेदीवर हल्ला केला.

अंतर्वेदीचा बचाव करण्यासाठी गुलाम कादिर दिल्ली सोडून निघाला.

इकडे मराठ्यांनी दिल्लीवर पद्धतशीरपणे कब्जा केला.

मराठ्यांचा जोर पाहून गुलाम कादिर जीव वाचवून पळू लागला तर राणे खान त्याच्या मागावर होता. मिरज किल्ल्यामध्ये त्याने आश्रय घेतला होता पण मराठ्यांनी पराक्रमाने त्याची फौज कापून काढली आणि १९ डिसेंबर १७८८ रोजी त्याला उचलून पाटील बावा म्हणजेच महादजीच्या पायाशी आणून घातले.

जुलमी गुलाम कादिरला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आणि पानिपतच्या पराभवाचा बदला ही पूर्ण केला.

शहा आलमला महादजी शिंदेंनी परत गादीवर बसवले. एका मोठ्या समारंभात अंध बादशाहने महादजींना अलिजा बहाद्दर ही पदवी व वजीरकीची वस्त्रे दिली.

छत्रपतींचा सरदार व पेशव्याचा प्रतिनिधी या नात्याने महादजींनी त्याचा स्वीकार केला.

महादजी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या शाही दरबारात बादशहाच्या शेजारी बसून राज्यकारभार पाहू लागले. शिवछत्रपतींच्या राज्याचा आठवण होईल असा अंमल संपूर्ण राज्यात निर्माण केला.

महादजींचे शाह आलम वर आभाळाएवढे उपकार होते. त्याने वृंदावन, मथुरा अशी देवस्थाने मराठ्यांच्या ताब्यात दिली.

इतकंच नाही महादजी शिंदेंची मर्जी राखायची म्हणून देशात गोवंश बंदी चा फर्मान काढला.

४ सप्टेंबर १७८९ रोजी जारी केलेल्या फर्मानात बादशहा म्हणतो,

महाराजाधिराज सिंधिया बहादूर यांनी आमचेकडे विनंती केली. त्यावरून आम्ही आपल्या उदार अंतःकरणाने व हर्षपूर्ण दृष्टीने आमच्या समस्त राज्या भूमीमध्ये गोकुशाचा म्हणजे गो – हत्तेचा परिपाठ सर्वथैव मना करीत आहो. या आमच्या फर्मानाचा अंमल इतउत्तर राज्यातील समस्त अधिकाऱ्यांनी सावधगिरीने प्रयत्नपूर्वक करून ही आज्ञा पाळीत जावी की, जेणे करून कोणते नगर, कसबा, गाव यात गोहत्तेचे नावसुद्धा दिसू नये.

इतक्या उपर जर कोणी इसम या आज्ञेच्या विरुद्ध वागून गोवधाच्या पापात लिप्त होईल तर तो बादशाहाच्या कोपास पात्र होऊन दंड पावेल.

कट्टर मुस्लिमांनी शेकडो वर्षे हिंदुस्तानात राज्य केलं, अकबरासारखा सहिष्णू म्हणवल्या जाणाऱ्या राजाने देखील राज्य केलं पण संपूर्ण भारतात फक्त गायचं नाही तर गोवंश हत्या बंदीची घटना पहिल्यांदाच घडत होती. याला कारणीभूत होते अलिजाबहाद्दर महादजी शिंदे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.