दाऊद, राजन वैगेरे नाही मुंबईची सगळ्यात मोठी डॉन महालक्ष्मी पापामणी होती

चिंचोळ्या गल्ल्या, ही झोपडी इथं का उभी केली असेल असा प्रश्न पाडणारं बांधकाम, सरळसोप्या रस्त्याच्या खाली असलेले भुयारी मार्ग आणि काही क्षणांत तुम्हाला वेढा पडू शकेल अशी सुरक्षाव्यवस्था… हे वाचून तुम्हाला पिक्चरचा सेट किंवा आमचा कल्पनाविलास वाटलं असेल, तर तुम्ही चुकलाय…

ही एका साम्राज्याची रचना आहे, जी त्यांच्या महाराणीला वाचवायला करण्यात आली होती. ही महाराणी काही लोकांसाठी मसीहा असली, तरी पोलिसांसाठी मात्र गुन्हेगार होती. कारण तिचं साम्राज्य उभं राहिलेलं अंमली पदार्थ्यांच्या जोरावर आणि तिचा किल्ला होता… सायन-कोळीवाड्याच्या गल्लीबोळात.

तिचं नाव? महालक्ष्मी पापामणी आणि ओळख? मुंबईतली एकेकाळची सगळ्यात श्रीमंत लेडी ड्रगलॉर्ड.

मूळची तमिळनाडूमधल्या सेलमची असलेली पापामणी गरीब घरात जन्माला आली. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ती मुंबईत आली. तेव्हा मुंबईत वरदाराजन मुदलियार म्हणजेच वरदाभाई या तमिळ डॉनचं साम्राज्य होतं. वरदाराजनच्या दारु बनवण्याच्या कामात पापामणी हातभार लावू लागली.

प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर एस. हुसेन झैदी यांच्या एका बातमीनुसार पापामणीला वेश्यावस्तीतून बाहेर पडण्यासाठी वरदाराजननं मदत केली आणि यानंतर ती त्याची खास हस्तक बनली.

वरदाभाईची खास असल्यानं सायन कोळीवाड्यातली लोकं पापामणीला बिचकून राहू लागली. त्या भागावर तिनंही आपला होल्ड ठेवला होता. मात्र दारूबंदी उठल्यानं आणि इतर डॉन लोकांचं वर्चस्व वाढल्यानं वरदाराजनच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. वरदाराजन पुढं तमिळनाडूला निघून गेला, पण पापामणी आता एकटी पडली होती, मात्र तिनं हार मानली नाही.

चिंध्या गोळा करणं, मोलकरणीचं काम करणं अशा कामांमधून तिनं आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला.

अशातच पापामणीला मणी चिनपय्या देवेंद्र भेटला. हा मणी आधी ड्रग डीलर होता आणि त्यानंतर त्यानं खाद्यतेलांच्या कारखान्यात काम करायला सुरुवात केली. या दोघांनी कष्टानं संसार उभा केला, झोपडपट्टीतून ही जोडी खोलीत राहायला आली.

तेवढ्यात आला ट्विस्ट…

सदानकदा दारुच्या नशेत असलेल्या देवेंद्रला अपघातात आयुष्यभराचं अपंगत्व आलं. पापामणीवर आता सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आली. जी पार पाडण्यासाठी मोलकरणीचं काम पुरेसं नव्हतं. अशावेळी तिच्या आयुष्यात आली तिची सख्खी शेजारीण सावित्री. या सावित्रीचा हेरॉईनच्या पुड्या विकण्याचा चोरटा धंदा होता. सावित्रीनं ज्योती अदिरामलिंगम आणि पापामणीला ड्रग्सच्या धंद्यात उतरवलं.

या तिन्ही डेरिंगबाज बायकांनी थोड्याच कालावधीत सायन कोळीवाड्यपासून बऱ्याचशा मुंबईला ड्रग्स सप्लाय करायला सुरुवात केली.

धंदा मोठा झाला असला, तरी सगळी सूत्रं सावित्रीच्या हातात होती. हुशार पापामणीनं सावित्रीला बाजूला करत सूत्रं आपल्या हातात घेतली.

१९९१ सालापासून या धंद्यावर पूर्णपणे तिचा कंट्रोल होता.

एक ते तीन लाख रुपयात ती पाच किलो हेरॉईन विकत घ्यायची आणि दहा ग्रॅमची एक पुडी बनवून ती विकायची. अगदी २५ रुपयाला मिळणारया या पुडीनं कित्येकांना ड्रग्सचा नाद लावला आणि पापामणी श्रीमंत होत गेली. जसा मिळणारा पैसा वाढला, त्याचबरोबर आजूबाजूची लोकंही वाढली आणि पोलिसांचा ससेमिराही मागं लागला.

पोलिसांना चकवण्यासाठी पापामणीनं आपल्याभोवती सुरक्षा कवच उभारलं, ते आजूबाजूच्या सामान्य लोकांचं. पापामणीकडे अफाट पैसा होता आणि आजूबाजूची जनता गरीब. 

त्यामुळं तिनं बेकार, निराधार लोकांना कधी कर्जानं, तर कधी सहज म्हणून पैसे द्यायला सुरुवात केली. याबदल्यात ती लोकं पापामणीसाठी वाट्टेल ते काम करायला तयार झाली. तिनं आपला आर्थिक कारभार पाहण्यासाठी, कायद्याच्या चौकटीतून वाचवण्यासाठी मदतनीस आणि सल्लागारही नेमले. अगदी एखाद्या साम्राज्याप्रमाणं पापामणीचा डौल होता.

आपल्याकडच्या पैशांमधून तिनं सायन कोळीवाड्यातल्या कित्येक लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि तिला नवं नाव मिळालं… महालक्ष्मी पापामणी.

पोलिसांची रेड पडलीच तर, आपल्या महालक्ष्मीला बाहेर पडता यावं म्हणून सायन कोळीवाड्यातल्या नागरिकांनी वस्तीची रचना एका चक्रव्ह्यूहाप्रमाणं केली. तरीही पोलिसांनी पापामणीला पकडलंच तर पोलिसांना तृतीयपंथीयांचा गराडा बसायचा. या सगळ्या दरम्यान पापामणीनं आपली आर्थिक बाजूही भक्कम केली होती.

ड्रग्जचा धंदा करण्यासाठी तिला झोपडीपट्टीत राहणं गरजेचं होतं. इथं पैसे गुंतवण्यात धोका होता. त्यामुळं तिनं बँगलोरमध्ये आणखी एक साम्राज्य उभारायला सुरुवात केली. 

मुंबईतल्या झोपडपट्टीत ड्रग्जचा धंदा करणाऱ्या पापामणीनं बँगलोरमध्ये तीन भलीमोठी हॉटेल्स उभी केली. आपला जन्म झाला त्या सालेममध्ये स्वतःसाठी घर बांधलं, दुकानं विकत घेतली आणि ती भाड्यानं देऊन त्याच्या वसूलीचं काम एका माणसाला दिलं.

पोलिसांच्या हाती लागल्यावर सुटण्यासाठी तिनं नार्कोतज्ञ वकिलांची मदत घेतली, तिच्या ताफ्यात अशाही बायका होत्या ज्यांना कायद्याचं सखोल ज्ञान होतं. या सगळ्या ताकदीच्या जोरावर ती पोलिसांच्या कचाट्यातून कायम सुटू लागली.

मात्र जुलै २००४ मध्ये महालक्ष्मी पापामणी आपल्याच एका चुकीमुळं एनसीबीच्या जाळ्यात पुराव्यासकट घावली…

हाती पैसा खेळू लागल्यावर ती आपला अपंग नवरा देवेंद्रपासून वेगळं राहू लागली. तिनं आपल्या मुलींना शिकण्यासाठी सालेमला पाठवलं, मात्र अभ्यासात रस नसल्यानं तिनं लवकरच त्यांना पुन्हा मुंबईमध्ये आणलं. तिच्या जयश्री नावाच्या मुलीचं त्यांच्याच वस्तीतल्या एका गुंडासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं, चिडलेल्या पापामणीनं त्यांना वेगळं करण्याचे अनेक प्रयत्न करुन पाहिले, पण जयश्रीनं हार मानली नाही हे बघून पापामणीनं तिला जबरदस्ती आपल्या ड्रग्जच्या धंद्यात आणलं.

जयश्रीचा जम बसतच होता आणि तेवढ्यात एनसीबीनं तिला अटक केली. तिच्याजवळ ४ किलो हेरॉईन सापडलं आणि चौकशीत तिनं महालक्ष्मी पापामणीचं नाव घेतलं. काही दिवसांच्या अंतरानं पापामणीही पोलिसांच्या तावडीत सापडली. तिच्यावर गुन्हा सिद्ध झाला नाही, तर ती पुन्हा एकदा सहीसलामत सुटणार याची एनसीबीला खात्री होती. त्यामुळं त्यांनी पुरावे शोधायला सुरुवात केली.

पापामणीच्या विरोधात दोन लोकांनी साक्ष दिली.

जबरदस्ती ड्रग्जच्या धंद्यात आणलं, प्रियकरापासून लांब केलं म्हणून आईवर चिडलेली जयश्री आणि आपली जबाबदारी झटकली म्हणून बायकोवर चिडलेला देवेंद्र. देवेंद्रनं तर, आपली बायको हेरॉईनचा धंदा करते आणि त्याच पैशांच्या जोरावर तिनं बेनामी मालमत्ता जमा केली आहे, हे कोर्टात सांगितलं.

याच्या जोरावर एनसीबीनं पापामणी विरोधातले गुन्हे तर सिद्ध केलेच पण तिनं जमवलेल्या संपत्तीवर टाच आणली. सायन कोळीवाड्यातला एकही माणूस पापामणी विरोधात बोलायला तयार झाला नाही, त्या अनोळखी माणसांनी पापामणीचे उपकार मानले, पण तिचा नवरा आणि मुलीनं जुन्या रागाची परतफेड केली. 

दोन वर्षांनी पापामणी जेलमधून सुटली (२०१३ मध्ये ती आणि जयश्री २००४ च्या केसमध्ये निर्दोष असल्याचा निर्वाळा कोर्टानं दिला.) आणि काही महिन्यांनी देवेंद्रचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडला. 

देवेंद्रला कुणी मारलं? आणि त्याकाळी १५ कोटींची मालकीण असलेली पापामणी आता कुठं आहे? हे प्रश्न अजूनही गूढच आहेत.

संदर्भ: माफिया क्वीन्स ऑफ मुंबई, एस. हुसेन झैदी आणि जेन बोर्जस 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.