बोल्ड अभिनयाने बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री सेलिब्रिटी कार्ड वापरत निवडणुकीत उतरलीये

सध्या देशभरामध्ये एकच ढोल वाजत आहे ते म्हणजे निवडणुकांचं. उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्या तरी त्याची उत्सुकता देशभरातील लोकांना असून त्यांच्या चर्चांमध्ये खंड पडतच नाहीये. आता या चर्चांच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे यंदाच्या निवडणुकांमध्ये वापरलं जाणारं ‘सेलेब्रिरी कार्ड’.

उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये सेलिब्रिटीज कुठे ‘युपी में सब बा’, ‘युपी में का बा’ अशा गाण्यांच्या माध्यमातून प्रचार करतायत तर पंजाबमध्ये सेलिब्रिटीज धडाधड पक्षांच्या उमेदवारीचे तिकीट घेतायत. सिद्धू मुसेवाला काँग्रेसकडून जोरदार प्रचार करताना दिसतायत तर अशात आता बीजेपीने देखील त्यांना तोड देण्यासाठी स्वतःचं पान टाकलंय. ते म्हणजे ‘माही गिल’.

माही गिल या मॉडेल आणि अभिनेत्री असून अनेकांवर आपल्या अभिनयाची जादू चालवल्यानंतर माही गिल आता राजकारणात आपली जादू पसरते की नाही, हे तपासण्यासाठी मैदानात उतरत आहेत. मात्र त्यांच्या राजकारणात उतरण्याच्या जेवढ्या चर्चा चालुयेत त्याहीपेक्षा जास्त त्या ज्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत, त्याच्या जास्त चर्चा आहेत.

लोकांना आश्चर्य वाटण्याचं कारण म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत माही गिल काँग्रेस पक्षाकडून प्रचार करत होत्या. शिवाय तेव्हा त्यांचा राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण आता अचानक त्यांनी राजकारणात एंट्री घेण्याची घोषणा केली आहे आणि तीही काँग्रेसचा विरोधी पक्ष बीजेपीकडून!

ज्यांच्या राजकारणातील एंट्रीवरूनच नवीन वादळ पंजाब निवडणुकीत उठतंय, त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर माही गिल यांचा जन्म पंजाबच्या चंदीगडचा. १९ डिसेंबर १९७५ ला पंजाबी जाट शीख कुटुंबात त्या जन्मल्या. माही गिलचं खरं नाव ‘रिम्पी कौर गिल’ आहे. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी शिक्षणही अभिनयातंच निवडलं.  १९९८ मध्ये पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगडमधून थिएटरमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.

त्यांना अभिनय सृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो ‘हवायें’ मधून. मात्र त्यांचं नाणं चमकलं ते ‘देव डी’ या चित्रपटामुळे. 

हा चित्रपट त्यांना मिळण्याचा किस्सा देखील फिल्मीच आहे. आपण अनेकदा ऐकतो की या कलाकाराला अमक्याने आधी बसमध्ये बघितलं, कुणाला रस्त्यावर गाताना बघितलं, तसंच काहीसं माही गिल यांच्यासोबत झालं. त्या एका पार्टीला गेल्या असता अनुराग कश्यपने त्यांना पहिल्यांदा बघितलं आणि हिऱ्याला त्याचा ज्वेलर मिळाला असं झालं. अनुरागने देव डी चित्रपटात पारोची भूमिका साकारण्यासाठी लगेचच माही यांना साईन केलं.

माही यांनी हा रोल असा गाजवला की आजही त्यांचा बेस्ट रोल म्हणून ‘पारो’चं नाव लोक हमखास घेतात. या रोलसाठी त्यांना फिल्मफेअर क्रिटिक्स बेस्ट ऐक्ट्रेस अवॉर्ड देखील मिळाला. यानंतर त्यांच्या करिअरला पीक मिळाला तो ‘साहेब, बीवी और गँगस्टर’ या चित्रपटातून. त्यांच्या कलेला पारखून लवकरच त्यांना मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या ऑफर्स मिळाल्या आणि आज वयाचे ४५ वर्ष पूर्ण करूनही माही ज्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत, तेच त्यांचं कौशल्य सिद्ध करतं.

गुलाल, आगे से राइट, दबंग, पान सिंग तोमर, दबंग २, साहेब बीवी और गँगस्टर्स रिटर्न्स, जंजीर, दुर्गामती यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय हिंदी सहित त्यांनी पंजाबी चित्रपटसृष्टीवरही स्वतःचा दम बसवला आहे. मूळच्या पंजाबी असल्याने त्यांची फॅन फोल्लोविंग पंजाबमध्ये खूप जास्त आहे. मात्र त्यांनी तेलगू चित्रपटांतही काम केलं आहे.

माही शेवटी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जोरा द सेकंड चार्टर’ या पंजाबी चित्रपटात झळकल्या होत्या. तर नुकतंच ‘रक्तांचल’ सीरिजच्या पुढच्या भागाचं ट्रेलर आलं आहे, ज्यात माही राजकारणी महिलेच्या बोल्ड अवतारात दिसत आहेत. त्यांच्या या नवीन लूकने सोशल मीडियावर पूर्णपणे धुमाकूळ घातला आहे.

अशा माही गिल आता पंजाबच्या रणसंग्रामात उतरल्या आहेत. पंजाबमधील सर्व ११७ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. तेव्हा माही गिल यांच्या आगमनाने बीजेपीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. एकीकडे सिद्धू मुसेवाला तर दुसरीकडे माही गिल असे दोन विरोधी पक्षांनी टाकलेले कार्ड आहेत. तेव्हा कोणतं कार्ड बाजी मारणार, हे बघण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.