मनोहर जोशींमुळे सहारा विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मिळाले

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतभराचा अभिमान. जागतिक स्तरावर गाजत असलेलं हे विमानतळ गेल्या काही दिवसांपूर्वी मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं.

झालं असं की मध्यंतरी विमानतळाचे संचालन सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपच्या हाती गेले. त्यावेळी या कंपनीकडून विमानतळ परिसरात ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या लावण्यात आल्या. आधीच अदानी मुंबईचे विमानतळ गुजरातला हलवण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, त्यातच अदानींनी विमानतळावर आपले बोर्ड लावल्या मुळे त्यांनी या विमानतळाचे नाव बदलायचा कट केला असल्याचा आरोप झाला.

चिडलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी सहारा विमानतळावर जाऊन तिथल्या बोर्डची तोडफोड केली. अदानी कंपनीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का? असा प्रश्न विचारला गेला. पुढे अदानी ग्रुपने स्पष्टीकरण दिलं मात्र अजूनही शिवसैनिकांना त्यांच्यावर विश्वास नाही.

आज शिवसैनिक ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासाठी लढत आहेत ते नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला कधी देण्यात आलं हा प्रश्न आपल्या पैकी अनेकांना पडत असेल. चला या छत्रपती शिवाजी विमानतळाचा इतिहास जाणून घेऊया.

मुंबईत सुरुवातीला जुहू विमानतळ हा एकच प्रवासी विमानतळ होता. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रॉयल एअरफोर्सच्या लढाऊ विमानांना हे विमानतळ अपुरे पडत होते. त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून एक नवीन विमानात उभारण्यात येऊ लागले.

मुंबईत मोठा विमानतळ बांधण्याचा बेत आखण्यात आला. जुहूचा विमानतळ समुद्राच्या किनारपट्टीस लागून असल्यामुळे पावसाळ्यात विमानांच्या उड्डाण-अवतरणांना हवामानाचा अडथळा होत असे. म्हणूनच हा नवीन विमानतळ बांधताना शहराच्या आतल्या बाजूस म्हणजेच सांताक्रुझ आणि विले पार्ले या उपनगरांदरम्यान बांधण्यात आला. त्याला नाव मात्र सांताक्रुझ विमानतळ हे देण्यात आले.

स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९४८ सालामध्ये येथील बांधकाम झाले व जून महिन्यामध्ये एअर इंडियाने येथील पहिले प्रवासी उड्डाण लंडनला केले. हा नवीन विमानतळ सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता व नंतर तो प्रवासी एव्हिएशन मंत्रालयाच्या अंमलाखाली आला.

१९७९साली सांताक्रुझ विमानतळाला आग लागून मोठे नुकसान झाले होते तेव्हा काही काळाकरता एक तात्पुरते टर्मिनल बांधण्यात आले. त्यानंतर १९८१मध्ये सांताक्रुझच्या पूर्वेस सहार गावाजवळ अजून एक नवीन टर्मिनल बांधण्यात आले व आंतरराष्ट्रीय उड्डाण तेथून सुरू झाली.

हळूहळू सहार विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणून ओळख मिळवत होते पण त्याला नाव काय द्यायचे हा प्रश्न उभा राहिला होता.

ऐंशीचे दशक म्हणजे महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या अस्थिरतेचा काळ. या दहाच वर्षात राज्याने सात मुख्यमंत्री बघितले. या अस्थिरतेच्या काळात एक पक्ष मात्र महाराष्ट्रात नव्याने आपले पाय रोवत होता. तो पक्ष म्हणजे शिवसेना.

मुंबईत मराठी माणसाचा आवाज म्हणून स्थापन झालेली शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढवय्या मावळ्यांचा आधुनिक अवतार आहे असं मानलं जायचं. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे त्यांचं जादुई व्यक्तिमत्व अनेक तरुणांना आकर्षित करून घेत होतं. साठच्या दशकात स्थापन झालेला हा पक्ष ऐंशीच्या दशकात हिंदुत्वाकडे वळला आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला.

शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून मनोहर जोशी यांना ओळखलं जायचं. मनोहर जोशींचे वक्तृत्व त्यांची अभ्यासु वृत्ती पाहून बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सेनेमध्ये विविध पदांवर संधी दिली.

एक साधा शिवसैनिक ते पुढे मुंबई महापालिकेचे नगरसेवक, मुंबईचे महापौर हा प्रवास मनोहर जोशींनी कष्टाने मेहनतीने आणि बाळासाहेबांच्या विश्वासावर पार पाडला. जेव्हा मुंबई महानगपालिकेतून विधानपरिषदेवर आमदार पाठवण्याची वेळ आली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांचीच निवड केली.

शिवसेनेची भूमिका विधानपरिषदेमध्ये शांतपणे पण ठामपणे मांडणे हे फक्त मनोहर जोशी यांनाच जमेल याची शिवसेनाप्रमुखांना खात्री होती. हा विश्वास जोशींनी सार्थ ठरवला.

महाराष्ट्राच्या विधी मंडळात त्यांनी व प्रमोद नवलकरांनी मिळून सत्ताधारी काँग्रेस पक्षाला चांगलंच जेरीस आणलं. बॉम्बे हे ब्रिटिश कालीन नाव मुंबई करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव मांडला.

सर्व शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांनी कामकाज मराठी भाषेत करावे असा आग्रह धरणारा ठराव त्यांनी मांडला. इतकंच नाही तर राज्यपालांना देखील त्यांनी विधानभवनाच्या दारात अडवले आणि त्यांना मराठीतच भाषण करायची मागणी केली. त्यांच्या आग्रहामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सभागृहात मराठीमध्ये भाषण केलं.

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीच्या वाढीचा विषय असो कि बेळगाव कारवार भागातला सीमावाद मनोहर जोशी आणि नवलकरांनी अनेक प्रश्न विधानपरिषदेमध्ये लावून धरले. 

पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशींना विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवडलं. त्याकाळात जोशींनी सहारा विमानतळाच्या नामकरणाचा विषय मार्गी लागावा म्हणून त्यांनी प्रयत्न सुरु केले. त्यांचे व मुख्यमंत्री शरद पवार यांचे चांगले संबंध होते. 

यातूनच २० जुलै १९९० विरोधी पक्ष नेता म्हणून मनोहर जोशींनी विधानसभेत सहार विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ करावे असा प्रस्ताव मांडला. सरकारच्या वतीने अरुण गुजराथी यांनी या ठरावास सरकार सहमत असल्याची घोषणा केली. हाच तो ऐतिहासिक दिवस जेव्हापासून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मिळालं.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.