एका पठ्ठ्याने फक्त १०० रुपये खर्च करून विधानपरिषदेची आमदारकी जिंकली होती

सध्या राज्याच्या राजकारणात विषय गाजतोय तो विधान परिषदेच्या निवडणुकांचा. कोण कुठल्या पक्षातून, कुणाचा कुणाला पाठिंबा अशा लय चर्चा रंगल्यात, काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, तर काही प्रश्नांची निकालानंतर मिळतील.

पण जे काय राजकारण झालं ते विधानपरिषदेच्या सिटासाठी.

आता निवडणुका कुठल्याही असो, त्यासाठी डावपेचांचं राजकारण आलं आणि खर्चही. दोन्ही गोष्टी एकदम जोरदार होतात, पण एका पठ्ठ्याने फक्त १०० रुपये खर्च करून विधानपरिषदेची आमदारकी जिंकली होती.

नाव बाबुराव धारवाडे.

बाबुराव धारवाडे म्हणजे इतिहास जगलेला माणूस. भाई माधवराव बागल यांच्या पासून यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या पर्यंत अनेक पिढ्यांचा विश्वासू कार्यकर्ता. पुरोगामी विचारांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व.

त्यांची जडणघडण विद्यार्थी चळवळीपासून झाली. अगदी कमी वयात असतानाच १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात बाबुराव धारवाडे यांनी उडी घेतली. स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवलं होत, तशी घरची परिस्थिती हलाखीची. अशावेळी त्यांच शिक्षण पूर्ण करण्यासाठी चळवळीतले नेतेच पुढे आले.

त्या वेळचं गोखले महाविद्यालय म्हणजे बहुजन समाजातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांचं आशास्थान होतं नि आधारवडही. डॉ बाळासाहबे खर्डेकर आणि प्रा. एम. आर. देसाई यांनी तरुण बाबूरावांमधील धडाडी पाहून त्यांच्या शिक्षणाचा विडा उचलला.

विद्यार्थी चळवळीत सतत पुढे असणारे बाबूराव क्रीडांगणावरही तळपत राहायचे. फुटबॉल, क्रीकेट हे त्यांचे आवडते खेळ. या खेळात तारुण्याची रग मुरवत ते नेतृत्वाचे प्राथमिक धडे घेत राहिले. गोखले महाविद्यालयाने त्यांच्या कप्तानपदाच्या काळात दाभोळकर शील्डवर सतत कब्जा मिळविला.

शिक्षण पर्ण झालं तोवर स्वातंत्र्याची पहाट उजाडली होती. सगळे कार्यकर्ते आता आपआपल्या पोटापाण्याच्या उद्योगाकडे लागले होते.  बाबूरावांनी देखील लोकल बोर्डामध्ये कारकुनाची नोकरी पकडली. ग्रामीण समाजाचे प्रश्न त्यांनी जवळून अभ्यासले. तळागाळातील प्रशासन व्यवस्था कशी चालते याचा अनुभव घेतला.

 साधारण याच काळात त्यांना लेखनाचा नाद लागला. प्राचार्य मा.पं.मंगडूकर व प्राचार्य पी. बी. पाटलांच्या वाचन, वक्तृत्व नि वाङ्मयाने बाबूराव धारवाडेंमधील तरुण कार्यकर्ता भारावला. लोकल बोर्डातील आकडेमोडीत त्यांचे लक्ष लागेना. त्यांनी थेट नोकरीला राजीनामा दिला आणि लेखक बनले. आपल्या नोकरीच्या अनुभवातून त्यांनी पंचायत राज्य व्यवस्थेवरील सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर लिहिलेल्या मार्गदर्शक पुस्तिका आजही आख्ख्या महाराष्ट्रात प्रमाण मानल्या जातात.

बाबुराव धारवाडे यांनी लेखनाबरोबरच समाजकारणात हि पाउल टाकलं.

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भाई माधवराव बागल हे त्यांचे जीवन आराध्य. भाई बागलांच्यासोबतीने त्यांनी समाजवादी विचारसरणी स्वीकारली आणि पुरोगामी शाहू विचारांसाठी आपल आयुष्य वाहून घेतलं.

ते मूळचे पत्रकार. जनसारथी हे साप्ताहिक आणि नंतर सायंदैनिक त्यांनी चालवले. त्याचसुमारास त्यांनी ‘जनसेना’ नावाची संघटना काढली. मटणाचे दर कमी करण्यासारखी आंदोलने केली. कोल्हापूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचार उघड केला, यातील संभाजी पूल प्रकरण प्रचंड गाजले.

जनसेनेच्या एका कार्यक्रमाला त्यांनी यशवंतराव चव्हाणांना बोलावले होते, सेना म्हटलं की झुंडशाही येते, असं यशवंतरावांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी जनसेना बंद केली.

यशवंतराव चव्हाणांच्या आवाहनानुसार १९७२ साली त्यांनी आपल्या हजारभर सहकाऱ्यांसह कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.

वसंतदादा पाटील यांची कॉंग्रेस पक्ष संघटनेवर मजबूत पकड होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जोडली गेली होती. हीच गोष्ट त्यांच्यात आणि बाबुराव धारवाडे यांच्यात समान होती. दोघांचे विचार जुळले. वसंतदादा यांनी बाबुराव धारवाडे यांच्यातील नेतृत्वक्षमता, कोल्हापुरात त्यांच्याबद्दल असलेला आदरयुक्त दरारा याला ओळखून त्यांच्याकडे कोल्हापूर कॉंग्रेसच अध्यक्षपद दिलं.

कोल्हापूरच्या राजकारणातसुरवातीपासून अनेक गटतट राहिलेले आहेत. त्यांची मोट बांधून कॉंग्रेसचे हात बळकट करण्याच काम बाबुराव धारवाडे यांनी अध्यक्ष म्हणून सलग ११ वर्षे केलं. सर्वात कार्यक्षम जिल्हा कॉंग्रेस कमिटी म्हणून १९८४-८५ साली त्यांना सन्मानित करण्यात आलं.

महाराष्ट्रात प्रचंड गाजलेला वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील वाद त्यांच्याच नेतृत्वाखाली भाई बागलांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मिटला. फक्त कार्यकर्तेच नाही तर नेत्यांचही मनोमिलन त्यांच्याच मुळे शक्य झालं.

या सगळ्याच परिणाम म्हणून वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांना कॉंग्रेसची कोल्हापूर स्थानिक स्वराज्य गटातून विधानपरिषदेची उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीला कॉंग्रेसच्या कोणत्याही गटाचा  विरोध झाला नाही.

अवघे शंभर रुपये खर्च करून बाबुराव धारवाडे कोल्हापुरातून आमदार बनले.

त्यांची आमदारकीची कारकीर्द देखील प्रचंड गाजली. आमदार निधीचा विनियोग त्यांनी आपला सारा निधी कोल्हापूर महानगरपालिकेस एकरकमी देऊन नवा वस्तुपाठ सादर केला.  त्यांची विधिमंळातील अभ्यासपूर्ण भाषणे आजही नव्या आमदारांना मार्गदर्शनासाठी वाचायला दिली जातात.

बेळगाव सीमाप्रश्नावरील आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या तेव्हा त्यांनी रोखठोकपणे सांगितल कि,

“मी येथे कॉंग्रेसचा नेता म्हणून नाही तर एक संयुक्त महाराष्ट्राचा कार्यकर्ता म्हणून सहभागी होतो आहे.”

शाहू महाराजांच्या विचारांची मशाल सदैव तेवत राहावी म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले. राजर्षी शाहू स्मारक भवनची उभारणी, उत्तर प्रदेशात शाहू जिल्ह्याची निर्मिती, विधान भवनातील शाहू पुतळा, करवीर गॅझेटमधील छ. शाहूसंबंधी मजकूर दुरुस्ती, गंगाराम कांबळे व छ.शाहूच्या अद्वैत संबंधांचा सामाजिक स्मारक स्तभं, दूर चित्रवाणीवरील शाह मालिका, छ. शाहू जन्मशताब्दी महोत्सव अशी एक लांबलचक सूची होऊ शकेल.

एकदा लोकसभेचे तत्कालीन सभापती मनोहर जोशी कोल्हापुरात आले होते तेव्हा त्यांनी भाषणात संसदेत शाहू महाराजांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली होती.  पुढे त्यासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत, तेव्हा दिल्लीतल्या त्या पुतळ्यासाठीही धारवाडे यांनी अनावरण होईपर्यंत पाठपुरावा केला. कोल्हापुरात लोकांच्या प्रश्नावर होणाऱ्या प्रत्येक संघर्षात धारवाडे आघाडीवर असायचे.

भाई माधवराव बागल विद्यापीठ आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट या दोन संस्थांच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनाचे उपक्रम सतत सुरू ठेवताना राज्यभरातील पुरोगामी विचारवंतांना शाहूंच्या भूमीशी जोडून ठेवले.

कोल्हापूरचा इतिहास बाबूराव धारवाडे यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकातून लोकांपर्यंत पोहचला. राजकारण न करता समाजकारण करत पुरोगामी वारसा जपून फक्त शाहुभक्तीच्या जोरावर लोकांच्यात व राजकारणात आदराचे स्थान मिळवता येते याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे कै.बाबुराव धारवाडे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.