वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्याने जवाहरलाल नेहरूंचे प्राण वाचवले होते !

२ ऑक्टोबर १९५७.

साधारणतः सायंकाळचे ५.३० वाजलेले असतील. राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर एका अलिशान शामियाण्याला भीषण आग लागली होती. त्यावेळी एक १४ वर्षाच्या स्काऊट लीडर मुलाने आपल्या प्राणांची कसलीही चिंता न करता आधी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना सुरक्षितरीत्या रामलीला मैदानावरील स्टेजवर पोहचवलं होतं. त्यानंतर त्याने  शामियान्यात घुसून, जळणारा कपडा बाजूला काढून आग नियंत्रणात आणण्यात मोठी कामगिरी बजावली होती.

या १४ वर्षीय मुलाने दाखवलेल्या शौर्यामुळे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक व्ही.आय.पी. विदेशी  पाहुण्यांचे प्राण वाचले होते. आग नियंत्रणात आणण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नात त्याचे हात अतिशय वाईट पद्धतीने भाजले गेले होते. तो बेशुद्ध झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी त्यावेळच्या आयर्विन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

भाजलेल्या हातावर उपचार घेऊन व्यवस्थितरित्या बरा झाल्यानंतर तो मुलगा ज्यावेळी शाळेत पोहोचला त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी बातमी सांगितली की त्या मुलाला पंतप्रधानांनी विशेषरित्या स्थापित केलेल्या राष्ट्रीय वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हेच त्याला या पुरस्काराने सन्मानित करतील.

या १४ वर्षीय मुलाचं नाव होतं हरीश्चंद मेहरा.

harischandra mehra
हरिश्चंद्र मेहरा

४ फेब्रुवारी १९५८ रोजी ज्यावेळी हरीशला तीन मूर्ती भवन येथे पंतप्रधान नेहरूंच्या हाताने सन्मानित करण्यात आलं, तीच लहान मुलांना त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी दिल्या राष्ट्रीय वीरता पुरस्काराची देखील सुरुवात होती. म्हणजेच हरीश हे राष्ट्रीय वीरता पुरस्कार जिंकणारे पहिलेच होते.

हरीश यांनी आपल्या आई-वडिलांसोबत तीन मूर्ती भवन येथे हा पुरस्कार स्वीकारला होता. त्यावेळी जवाहरलाल नेहरू हरीशच्या पालकांना म्हणाले होते,

“तुमच्या मुलाने माझे प्राण वाचवलेत, तो एक दिवशी खूप मोठा व्यक्ती होईल”

२००३ सालच्या राष्ट्रीय वीरता पुरस्कारावेळी आयोजित  कार्याक्रमाला मेहरा उपस्थित होते. त्यावेळी मुरली मनोहर जोशी यांनी मेहरांची गळाभेट घेतली. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी देखील तिथेच होते. तेव्हा अटलजी आपल्याला उद्देशून, “ क्या मुझसे गले नही मिलोगे..?” असं म्हणाले होते, अशी आठवण  मेहरा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती.

मेहरा सध्या दिल्लीतच राहतात आणि आता ते नोकरीतून रिटायर झालेत. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या शौर्याविषयी भरभरून बोलतात. आपल्या शौर्यामुळे आपल्याला त्याकाळी खूप प्रसिद्धी मिळाली, परंतु पुढे नोकरीत प्रमोशनसाठी त्याचा काहीच फायदा झाला नाही, अशी खंत मात्र मेहरा व्यक्त करतात.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.