पंडित जवाहरलाल नेहरू क्रिकेटची बॅट घेऊन मैदानात उतरले होते !

भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायचा म्हंटलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या कितीतरी वेगवेगळ्या पैलूंचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो.

एका संपन्न कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही स्वतःला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात झोकून देणारे नेहरू, देशाचे पंतप्रधान म्हणून काम करताना विरोधकाचाही सन्मान करणारे आणि प्रसंगी वृत्तपत्रातून टोपणनानावाने लेख लिहून स्वतःच्याच कार्यपद्धतीवर स्वतःवरच टीका करणारे नेहरू असं बरंच काही.

भारतात नेहरूंच्या नावाने क्रिकेटची आंतरराष्ट्रीय मैदानं देखील आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की देशाचे पहिले पंतप्रधान या नात्याने क्रिकेटच्या मैदानांना त्यांचं नाव देण्यात आलं असेल. तसं असेलही कदाचित. नाही असं नाही. पण नेहरूंना क्रिकेटमध्ये असलेली रुची हे देखील त्यामागे एखादं कारण असू शकतं.

आज नेहरूंच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक वेगळा पैलू. क्रिकेटर नेहरू.

तसं पाहिलं तर क्रिकेटचा आणि नेहरूंचा फार काही संबंध नव्हता, पण नेहरूंना क्रिकेटची आवड होती एवढं मात्र नक्की. बालपणी नेहरू क्रिकेट खेळायचे परंतु त्यानंतर मात्र क्रिकेटशी असलेला संबंध तुटला तो तुटलाच.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय होण्यापूर्वी नेहरूंनी शेवटच्या वेळी क्रिकेट खेळलं होतं ते १९१३ साली. त्यानंतर मात्र राजकीय व्यस्ततेमुळे ते क्रिकेटपासून दुरावले गेले. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर मात्र पुन्हा एकदा असा प्रसंग आला होता, जेव्हा नेहरूंनी पॅड बांधले होते आणि हातात क्रिकेटची बॅट पकडली होती.

साल होतं १९५३. निमित्त होतं लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या टीममधला एक प्रदर्शनीय सामना. नेहरूंवर लोकसभा सदस्यांच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी होती. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद देखील हा सामना बघण्यासाठी मैदानात उपस्थित होते. सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंना भेटून राष्ट्रपतींनी त्यांच्याशी संवाद साधला होता.

दिल्लीत खेळवल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम बॅटिंग करताना राज्यसभेच्या संघाने ३ विकेट्स गमावून २२२ रन्स काढले होते. त्यात संरक्षण राज्यमंत्र्यांच्या शतकाचा समावेश होता. आपल्या इनिंगमध्ये त्यांनी एकाच ओव्हरमध्ये २६ रन्स देखील फटकावले होते. नंतर नेहरूंच्या संघाने ३ विकेट गमावून १६९ रन्स काढले आणि आपला डाव घोषित केला. त्यामुळे हा सामना अनिर्णीत अवस्थेत संपला.

जवळपास ४० वर्षानंतर वयाच्या ६३ व्या वर्षी क्रिकेट खेळणाऱ्या नेहरूंना या सामन्यात फक्त १ रन काढता आला. फिल्डिंग करताना मात्र त्यांच्या वयाच्या मानाने ते अतिशय चपळ वाटत होते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.