विलासराव देशमुखांचे ते तीन किस्से…!
साल २००७, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते.
याच वर्षी लातूर जिल्ह्याची स्थापना होवून २५ वर्ष झाली होती. लातूर जिल्ह्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विलासरावांनी भव्य कार्यक्रम ठेवला होता. लाखभर लोकांचा समुह होता. आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. ते मंत्री सध्या केंद्रात असले तरी राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून बरेच लांब होते. गटातटाच्या राजकारणात त्यांच नाव देखील घ्यायला अनेकांना इंटरेस्ट नसायचा.
अशा काळात विलासरावांनी त्यांच्या पाहूणचारासाठी खास विमान पाठवलं होतं!
त्यांच नाव बॅरिस्टर ए.आर. अंतुले.
अंतुले उभा राहिले आणि म्हणाले,
“विलासराव मी मुख्यमंत्री असताना तुम्ही लातूर जिल्हा मागितला आणि मी दिला. इतकचं काय ते. राजकारणात पंचवीस दिवसाची आठवण ठेवली जात नाही पण तुम्ही पंचवीस वर्षांनी देखील उपकार विसरला नाहीत !
अंतुलेच्या डोळ्यातून तेव्हा पाणी आलं होतं असं उपस्थित सांगतात.
विलासरावाचं वैशिष्ट म्हणजे माणसांचा गोतावळा संभाळणारा सरपंच. पुढे विलासराव मुख्यमंत्री झाले. केंद्रात गेले पण मागे वळुन पाहताना आपण कुठून आलो आणि कोणामुळं आलो याची जाण त्यांनी कायम ठेवली. राजकारणात माणूस गेल्यानंतर एका वर्षात त्याच्या ठिकाणी दूसरं नाव तयार होतं. आज इतकी वर्ष होवून महाराष्ट्राला ऑप्शन मिळत नाही हे महाराष्ट्राचं दुर्देव कि विलासरावांच वेगळेपण हे कळणं अवघड आहे.
विलासरावांचा असाच एक किस्सा वसंतदादा पाटील आणि माधवराव सिंधीयासोबतचा.
माधवराव सिंधीया आणि विलासरावांच सख्य. दिल्लीला अनेक दरवाजे आहे पण मुख्य दरवाजा होता गांधी घराण्याचा. मात्र विलासरावांचा मुख्य दरवाजा होता तो माधवराव सिंधीयांचा.
माधवरावांबद्दल बोलताना विलासराव म्हणाले होते,
१९९९ साली मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत तीन ते चार नेते होते. मी आणि माधवराव दिल्लीत एकत्रच होतो. माधवराव म्हणाले, आपण सोनिया गांधींना भेटू ?
तासाभरातच विलासराव आणि माधवराव सोनिया गांधींच्या समोर बसले होते. माधवराव म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव होतील. सोनिया गांधींनी तात्काळ कोणताही प्रश्न न करता विलासरावांच नाव मंजूर केल. माधवराव सिंधींयामुळे विलासराव मुख्यमंत्री झाले.
वसंतदादांच्यामुळे विलासरावांना पहिल्यांदा बाबासाहेब भोसलेंच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री झाले. वसंतदादांच्या मंत्रीमंडळात देखील त्यांना स्थान मिळालं. त्यांच्यामुळे राज्यमंत्री असताना देखील सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विलासरावांच्या खांद्यावर कारभार दिला. विलासराव दादांबद्दल भावूक होते. राजकारणाच्या सुरवातीला त्यांनी टाकलेल्या विश्वासावर विलासराव नेहमीच बोलायचे.
ते सांगतात, दादा मुख्यमंत्री असताना गृहखात्याचा एक प्रश्न दत्ता पाटलांनी अडवून धरला होता.
त्या प्रश्नाचे उत्तर गृहराज्यमंत्री म्हणून विलासरावांना द्यायला सांगितले होते मात्र विलासराव विधानपरिषदेत अडकून होते. विलासरावांना तात्काळ विधानसभेत येण्याचा निरोप देण्यात आला. विधानसभेत वसंतदादा आणि दत्ता पाटलांची चांगलीच जुंपली होती. अशातच विलासराव गेले. विलासरावांना पाहताच दादांनी आपली चालण्याची काठी दत्ता पाटलांच्या दिशेने धरली आणि म्हणाले,
दत्ता आत्ता काय विचारायचे ते विचार !
वसंतदादांनी विलासरावांना टाकलेला असा विश्वास नेहमीच त्यांना भावूक करत असायचा !
यानंतर काहीवर्षांनंतर म्हणजे विलासरावांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त. मुद्रा नावाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. हे पुस्तक विलासरावांवरच होतं. तेव्हा विलासरावांनी आग्रहाने वसंतदादांच्या आणि माधवराव शिंदेच्या फोटोंचा समावेश आपल्या पुस्तकात असावा असा आग्रह धरला. गोष्टी छोट्या वाटतील पण या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच विलासराव किती मोठ्ठे होते ते कळतं. कदाचित याच उपकाराच्या परफेडीच्या भावनेमुळे विलासराव नेहमीच मोठ्ठे ठरत गेले असावेत.
हे ही वाच भिडू.
- वसंतरावांनी शपथविधीचा सुट शिवला अन कन्नमवारांनी एका फोनवर बाजी मारली !
- मराठवाड्याचा अपघात !
- हसतमुख शोकांतिका.