म्हणून पुण्याच्या भाजी विक्रेत्यांनी मंडईमध्ये महात्मा फुलेंचं मंदिर उभारलंय

पुणे. एकेकाळी मुरार जगदेव या आदिलशाही सरदाराने उद्धवस्त केलेली भोसले घराण्याची जहागिर. मांसाहेब जिजाऊंनी शिवबाच्या हातून सोन्याचा नांगर चालवून हे गाव पुन्हा वसवले. बाजीरावाने आपली राजधानी इथे हलवली. पुणे हे महत्वाचं शहर म्हणून नावारूपाला आलं.

पेशवाईने बरेच वर्ष इथे राज्य केलं पण दुसऱ्या बाजीरावाच्या कारभारामुळे इंग्रजांची सत्ता आली.

इंग्रजांच्या काळातही पुण्याचं महत्व कमी झालं नाही तर वाढतच राहिलं. त्यांनी या शहरात नगरपालिकेची स्थापना केली. वेगवेगळ्या सोयी सुविधा बनवण्यास सुरवात केली.

यातच होती भाजी मंडई.

या पूर्वी पुण्यात आसपासच्या खेड्यातून येणारा ताजा भाजीपाला शनिवार वाड्या समोरच्या पटांगणात भरणाऱ्या बाजारात विकला जात असे. बऱ्याचदा शेतकरी स्वतः आपला माल विकायला बसत. पुण्यात राहणाऱ्या नोकरदार वर्गाचा हा बाजार सहारा होता.

अशातच एकदा टूम निघाली की नागरिकांच्या सोयीसाठी आणि नगरपालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटच्या धर्तीवर पुण्यातही एखादी मंडई उभारायची.

1882 साली मंडई उभारण्याच काम सुरू झालं. शुक्रवार पेठेतील सरदार खासगीवाले यांची बागवजा मोकळी पडलेली जागा निवडण्यात आली.

ही चार एकराची जागा ४० हजार रुपयांना खरेदी करून पुण्यातील एक बांधकाम व्यावसायिक वासुदेव बापुजी कानिटकर यांच्यावर बांधकामाची जबाबदारी सोपवण्यात आली.

त्याप्रमाणे अडीच तीन वर्षात जवळ जवळ तीन लाख रुपये खर्च करून गॉथिक स्टाईलची अष्टकोनी विस्तृत उंच टॉवर असलेली इमारत उभी केली.

त्याकाळचे मुबंईचे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 1886 रोजी थाटामाटात उदघाटन झाले.

पुणेकरांची मंडई सुरू झाली. पण भाजी विक्रेते आणि शेतकरी यांच्या साठी ही आलिशान मंडई म्हणजे शापच ठरली. या मंडई तील गाळयांचे भाडे सर्वसामान्य भाजी विक्रेत्याला परवडणारे नव्हते.

इंग्रजांनी मारझोड करून या भाजीवाल्यांना तिथे जाण्याची सक्ती केली.

हे भाजीवाले मदती साठी गेले महात्मा जोतीराव फुलेंच्या कडे.

जोतिबा फुले हे आता नगरपालिकेचे सदस्य नव्हते मात्र त्यांचे सरकारमध्ये वजन होते. त्यांचा सुरवातीपासून या इमारतीला विरोध होता.

भाजी विक्रेत्यांना आणि ग्राहकांना या इमारतीची गरज नसताना त्यावर लाखो रुपये खर्च कशा साठी? त्या ऐवजी ही रक्कम गरीब जनतेच्या शिक्षणासाठी करावा असा जोतिबांचा आग्रह होता.

पण आता तर मंडई बांधून तयार झाली होती आणि तिच्या भाड्या पायी भाजीपाला विक्रेत्यांवर अत्याचार सुरू झाला.

जोतिबांनी नगरपालिकेच्या सदस्यांची त्यांनी भेट घेतली व परिस्थिती समजावून सांगितली.

भाजी विक्रेता हा अत्यंत गरीब आहे. दरदिवशी माल खरेदी साठी सावकाराकडून ते आठ आणे किंवा 1 रुपया कर्ज घेतात, उन्हातान्हात सर्व वस्तीत फिरून भाजी विकतात. त्यांना आपले जीवन कठीण व कष्टाचे वाटते.

याउलट कचेरीत काम करणारे व उसंत असणारे मध्यमवर्ग हेच त्यांची गिऱ्हाईके. हा समाज काटकसरी व मितव्ययी असतो. त्यामुळे खूप घासाघीस करून अत्यन्त कमी दरात भाज्या आपल्या पदरात पाडून घेतो. अशा परिस्थितीत दुकानांची भाडी व कर भाजी विक्रेत्यांवर लादले तर भाज्यांचे दर खूप वाढतील व भाज्यांची विक्री खूप कमी येईल.

पुण्याच्या जनतेला परवडत नसूनही फक्त दिखाऊपणासाठी उभा केलेल्या या आलिशान मंडईमुळे नुकसान गरीब शेतकरी व भाजी विक्रेत्यांचे आहे

जोतिबा फुलेंचे हे सांगणे नगरपालिकेत कोणीही ऐकून घेतले नाही.

जोतिबांनी इंग्रज अधिकाऱ्यांना देखील सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी देखील जोतिबांना धुडकावून लावले. गव्हर्नर रे यांचं नाव मंडईला दिले असल्यामुळे माघार घेण्यात इंग्रज सरकारच्या इभ्रतीचा प्रश्न होता.

महात्मा फुलेंनी छोट्या भाजी विक्रेत्यांना घेऊन मोठा विरोध सुरू केला. हे इंग्रज सरकारला पसंद पडले नाही. त्यांची जोतिबांवर खप्पा मर्जी झाली.

नगरपालिकेच्या महाभागांनी तर सूड म्हणून मुद्दाम जोतिबांच्या घराबाहेर मैला फेकण्यास सुरवात केली. अनेक जण जोतिबांच्या घराकडे पाहून हसत असत.

पण या एका घटनेमुळे खोडोपाड्यातील शेतकऱ्यांमध्ये जोतिबा फुलेंच्या बद्दलचा आदर वाढला. गरीब जनतेसाठी लढणारा महात्मा अशी ओळख त्यांना मिळाली.

ज्या जोतिबांवर पुणेकर हसले होते त्याच जोतिबांचे नाव मंडई ला देण्यात आले. आचार्य अत्रे यांच्या कारकिर्दीत गव्हर्नर रे यांचं नाव बदलून महात्मा फुले मंडई असे नाव दिले.

मध्यंतरी 1924 साली नगरपालिकेने लोकमान्य टिळकांचा पूर्णाकृती पुतळा मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते मंडईच्या प्रवेशद्वारा जवळ बसवला. याच इमारतीमध्ये महात्मा फुलेंचे वैचारिक विरोधक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचाही पुतळा उभारण्यात आला होता मात्र गांधी हत्येच्या दंगली वेळी तो अन्य ठिकाणी हलवण्यात आला.

हे झाले नगरपालिकेने उभारलेले पुतळे.

मात्र मंडईमधल्या भाजी विक्रेत्यांनी व शेतकऱ्यांनी मिळून महात्मा जोतिबा फुलेंच छोटंसं मंदिरच मंडईमध्ये उभं केलं आहे.

आजही मंडईच्या नवीन इमारती मध्ये हे छोटंसं देऊळ आपल्याला पाहायला मिळते.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. Ket says

    bb

Leave A Reply

Your email address will not be published.