उझबेकिस्तान ते रशियापर्यंत अजूनही मिथुनदाची गाणी वाजतात कारण…

सध्या बॉलीवुडचे वाईट दिवस चालू असले तरी पूर्वी तसं नव्हतं. पूर्वीचे पिक्चर, पिक्चरची गाणी आणि पिक्चरची प्रत्येक छोटी गोष्ट लक्षात राहणारी असायची. आणि फक्त भारतीयच नाही तर भारताबाहेरची लोकं सुद्धा या बॉलीवुडच्या जुन्या गाण्यांवर थिरकायची आणि आजही थिरकतात.

याचं नुकतच समोर आलेलं उदाहरण म्हणजे, तुम्हाला आपल्या मिथुन दांचं “आय एम अ डिस्को डान्सर” गाणं आठवतेय का? आता नाव काढल्याबरोबर तुम्ही गाणं गुणगुणायलाही लागले असाल. पण तुमचं ठेवा बाजूला.

उझबेकिस्तानच्या समरकंद शहरात शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनाइझेशनच्या मीटिंगमध्ये आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसाठी आयोजित केलेल्या डिनरमध्ये एक बँड “आय एम अ डिस्को डान्सर” गाताना दिसला आणि अनेक उपस्थित या पेप्पी डान्स नंबरवर थिरकताना दिसले. 

आता उझबेकिस्तान हा सोव्हिएत युनियनचाच एक भाग होता आणि मिथुनदा सोव्हिएत रशियामध्ये ऑलरेडी भरपूर फेमस होते त्यामुळे उझबेगीस्तानमध्येही “आय एम अ डिस्को डान्सर” हे गाणं वाजवलं गेलं यात आपल्याला नवल वाटायला नको.

आज या निमित्ताने मिथुनदांची रशियातली प्रसिद्धी आणि “आय एम अ डिस्को डान्सर”चा हा खास किस्सा बघूया.  

साल होत १९८१. मिथुनदा एका सिनेमाच्या शुटींग मध्ये बिझी होते. पिक्चरचं नाव होतं तकदीर का बादशाह. डायरेक्टर होते बी. सुभाष. खरं नाव बब्बर सुभाष. हे बी. सुभाष तसे बॉलीवूडमध्ये काही खूप फेमस नव्हते. छोटे मोठे फिल्म्स बनवायचे. मिथुनदा मात्र बंगालमधले मोठे स्टार होते.

मिथुनदांनी हिंदीमध्ये आल्या आल्या आपल्या डेब्यू सिनेमामध्ये नॅशनल अवार्ड मिळवला होता. पुण्याच्या एफटीआयआय मध्ये शिकले असल्यामुळे त्यांच्या अभिनयाबद्दल कोणाला शंका असण्याचं कारणच नव्हत. पण हिंदीमध्ये त्यांना अपेक्षित असं यश मिळत नव्हतं. त्यामुळेच बी.सुभाष यांच्या लो बजेट सिनेमामध्ये त्यांना इच्छा नसून देखील काम कराव लागत होतं.

तकदीर का बादशाहचं शुटींग सुरु असताना अचानक एकदा मिथुन मेकअप रूम मध्ये गेला ते खूप वेळ बाहेरच येईना. बी. सुभाष नेमक काय झालं ते पाहायला मेकअप रूम मध्ये गेले. मिथुनदा तिथे बसून रडत होते. सुभाष जवळ त्यांनी आपलं मन मोकळ केलं. एवढ्या वर्षांचा स्ट्रगल सगळा बाहेर पडला. सुभाषनी मायेने त्यांचं सगळं ऐकून घेतलं. शेवटी ते त्याला एकच वाक्य म्हणाले,

“मै एक ऐसी फिल्म बनाउंगा जो तुम्हे सुपरस्टार बनाएगी”

पुढे तकदीर का बादशाहचं शुटींग संपलं. सिनेमा काही विशेष चालला नाही पण लगेच सुभाष नी मिथुनदांना घेऊन एका सिनेमाच शुटींग सुरु केलं.

पिक्चरच नाव होतं डिस्को डान्सर!!

मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये लग्नात गाणारा आणि रस्त्यावर डान्स करणाऱ्या स्ट्रीट डान्सर अनिलची ही कथा. त्याचा डान्स बघून एक डेव्हिड ब्राऊन नावाचा माणूस डिस्को डान्सर बनायचा चान्स देतो. त्याला जिम्मी हे नाव देतो. पिक्चर काय तुम्ही बघितलाचं असाल. त्यामुळे काय सगळी स्टोरी सांगत बसत नाही. यात इलेक्ट्रिक गिटारला घाबरणारा मिथुन आहे, त्याचा काका झालेला राजेश खन्ना आहे, बप्पी लाहरीचं इलेक्ट्रिक डिस्को म्युजिक आहे.

आणि सगळ्यात महत्वाच मिथुनदांचा क्या बात क्या बात क्या बात म्हणायला लावणारा डान्स आहे. या सिनेमामधली सगळी गाणी त्याकाळच्या तरुणाई मध्ये तुफान गाजली.

“आय एम ए डिस्को डान्सर, जिम्मी जिम्मी आजा आजा, क्रिश्ना धरती पे आजा तू”

बप्पी लाहरीने आफ्रिकन, तुर्कस्थान कुठून कुठून ट्यून ढापून आणल्या होत्या. पण त्याकाळात कोण चाली ढापत नव्हत? आजही ढापाढापी चालतेच की. पण बप्पीने भारताला खरं डिस्को म्युजिक नेमक काय असते हे दाखवून दिलं.

क्षणात ठेका धरायला लावणार हे सुपरफास्ट पॉप संगीत, रंगेबेरंगी लाईटचा मारा आणि त्यात आपले लांब पाय हलवून नाचणारा मिथुन यांनी पूर्ण भारतातलं संगीत, डान्स याला एका हाती बदलून टाकलं.

बी.सुभाष नी मिथुनला वचन दिलेलं असल्या प्रमाणे सिनेमा सुपरहिट झाला. मिथुनच्या घराबाहेर प्रोड्युसरची लाईन लागली. मिथुनने मात्र तिथून पुढे बी.सुभाष यांच्या कोणत्याच सिनेमाला नाही म्हटल नाही. कसम पैदा करणे वाले की , कमांडो, डान्स डान्स असे अनेक हिट फिल्म्स या दोघांनी दिले.

कसम पैदा करणे वाले की चं शुटींग सुरु होतं. या सिनेमामध्ये स्मिता पाटील होती. एकदा तिच्याशी गप्पा मारत असताना बी.सुभाष म्हणाले की,

 “मला सरकारकडून ऑफर आली आहे की डिस्को डान्सरचं मॉस्को फिल्म फेस्टिव्हल मध्ये प्रदर्शन करू. “

स्मिता पाटील उडालीच. तिने त्यांना विचारलं मग कधी जाताय मॉस्कोला? सुभाष म्हणाले ,

“मला वाटते की जायला नको. तिथे सगळे मदर इंडिया टाईप सिरीयस सिनेमे असणार. आमचा डिस्को डान्सर टिपिकल मसाला सिनेमा आहे.”

स्मिता पाटीलने त्यांना एवढा मोठा चान्स सोडतायत म्हणून वेड्यात काढले. तिच्या सांगण्यावरून सुभाष पिक्चर मॉस्को फेस्टिव्हलला रिलीज करायला कसेबसे तयार झाले. तिथे गेल्यावर मात्र त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. रशियन पब्लिकला सिनेमा खूप आवडला. पूर्ण फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या गेलेला हा एकमेव सिनेमा ठरला.

पिक्चर पूर्ण सोव्हिएत रशियामध्ये रिलीज केला गेला. डिस्को डान्सरच्या गाण्यांनी तिथे देखील वेड लावलं. मिथुन सोव्हिएत रशियामध्ये जिथे जिथे गेला तेव्हा जिम्मीजिम्मीच्या गजरात त्याचं स्वागत झालं. डिस्को डान्सरने सोव्हिएत रशियातले सगळे रेकॉर्ड मोडून टाकले. भारतात ६ कोटी कमावणाऱ्या या सिनेमाने रशिया, चीन, जपान या देशांमध्ये मिळून १०० कोटी कमावले. 

शंभर कोटी कमावणारा हा पहिला भारतीय सिनेमा होता.

एकदा रशियाचे राष्ट्रप्रमुख मिखाईल गार्बाचेव्ह भारतात आले होते. तेव्हा राजीव गांधीनी त्यांची ओळख सुपरस्टार अमिताभ बच्चनशी करून दिली. तेव्हा ते म्हणाले,

“माझी बायको राज कपूरची फॅन आहे आणि माझी मुलगी मिथुन चक्रवर्तीची. हे दोन सोडून दुसऱ्या कुठल्या भारतीय सेलिब्रेटीला आम्ही ओळखत नाही. “

एकदा मिथुन आणि सलमान, ‘लकी’ या सिनेमाच्या शुटींगसाठी रशियाला गेले होते. तिथे सलमानला कोणी ढुंकूनही पाहिलं नाही पण इतक्या वर्षांनीही मिथुनच्या स्वागतासाठी एअरपोर्ट तुडूंब भरल होतं.

भारतातल्या छोट्याशा खेड्यात सरकारी शाळेत शिकणाऱ्या पोरापासून सोव्हिएत रशिया, उझबेकिस्तान, युक्रेन या देशामधल्या तरुणांपर्यंत जगभरातल्या अनेकांना जोडणारा एक समान धागा म्हणजे मिथुन.

अजूनही सोव्हिएत रशियामधल्या डान्स शो मध्ये, सिंगिंग कॉम्पीटेशनमध्ये डिस्को डान्सरची गाणी वाजतात आणि आपल्यासारखेच तेही ही गाणी ऐकून लहानपणीच्या आठवणीनी नॉस्टल्जिक होतात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.