कोकणात मंदिराचा वाद झाला तेव्हा सेनेचे मंत्री नारायण राणे अंनिसच्या पाठीशी उभे राहिले होते…

श्रद्धेच्या नावाखाली अनेक ठिकाणी अंधश्रद्धा पाळली  जाते आणि अनेक लोक अंधश्रद्धेला बळी पडतात हे अनेक वर्षांपासून चालत आले आहे आणि आजही अनेक ठिकाणी बघायला मिळते. विज्ञाननिष्ठ,विवेकवादी दृष्टिकोन समोर ठेवून अशा अनेक अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्यासाठी नरेंद्र दाभोळकर यांनी 1989 साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अनेक तथाकथित चमत्कार उघडे पाडण्याचे काम केले आहे.

1995 सालचे डुंगेश्वर मंदिर प्रकरण आणि नारायण राणे

‘डुंगेश्वर’ ठिकाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात येते. डुंगेश्वर हे ठिकाण अरबी समुद्राच्या किनारी असून येथे घनदाट जंगल आहे. इच्छा पूर्ण झाल्यानंतर तेथील लोक त्या देवाला घंटा वाहणे,निशाण वाहणे, दारू वाहणे,कोंबडी कापणे असे प्रकार करत असत. डुंगेश्वराची राई म्हटल्या जाणाऱ्या झाडवळीचे साधे पान तोडणे देखील पाप समजले जाई. जागृत देवस्थान म्हणून ह्या देवस्थानाची ख्याती होती. हिरवे पान अथवा छोटी फांदी देखील नेली तर त्या व्यक्तीला कसली ना कसली बाधा होते असा समज तेथे प्रचलित होता. 

म्हणूनच अनेक वर्षांपासून तेथील जंगल घनदाट बनले. साध्या स्वरूपाचा एक दगड फक्त तेथे जमिनीत रोवलेला आहे. तेथील लोकांचे श्रद्धास्थान होते.

तर झाले असे की  1995 साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची सत्य शोधयात्रा कुडाळ येथे येऊन पोहचली होती. त्यावेळी तेथे शिवसेनेचा एक कार्यकर्ता विकास गावंडे दाभोलकरांना म्हणाला की चमत्कार नसतो असे तुम्ही कसे म्हणू शकतात. डुंगेश्वर देवस्थानाची घंटा उचलल्यास त्या व्यक्तीसोबत अघटीत घटना होतात. विश्वास नसेल तर तुम्ही जाऊन खात्री करू शकता.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे आव्हान स्वीकारले. त्यानुसार आधी आवश्यक ती कागदोपत्री कारवाई पूर्ण करणे आवश्यक होते. आव्हान प्रक्रियेनंतर जनप्रक्षोभ होऊ शकतो म्हणून आधीच खबरदारी म्हणून मंदिर विश्वस्तांची अनुमती अंधश्रद्धा निर्मूलन समिती आधी घेत असते. त्यानुसार त्यांनी आवश्यक ती औपचारिकता पूर्ण केली.

12 एप्रिल 1995 हा दिवस पक्का झाला.  समितीचे कार्यकर्ते पोलीस आणि पत्रकार असा लवाजमा तेथे पोहोचला. रात्री तेथे झोपले असता व मंदिराची घंटा नेली असता  पुढच्या तीन महिन्यात त्या व्यक्तीसोबत अघटित घटना घडते असा समज प्रचलित होता. आव्हान प्रक्रिया होत असताना तेथील नागरिकांनी त्यांना विरोध केला. परंतु आवश्यक ते कागदपत्र जवळ असल्यामुळे तो विरोध मावळला. ठरल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी येथील घंटा आपल्या सोबत घेतल्या व  पुढील सहा महिने आपल्या जवळ ठेवूनही काही अघटित घटना त्यांच्यासोबत झाली नाही. या प्रक्रियेत समितीच्या समूहात एक मुस्लिम कार्यकर्ता देखील होता. ही घटना लक्षात घेऊन तेथील जनप्रक्षोभ जबरदस्त वाढला.

त्यावेळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख ऍड डी डी देसाई यांनी अंनीस ने डुंगेश्वर बाबत अतिरेकी वा अविवेकी भूमिका घेऊन पण त्याच्या श्रद्धेला तडा पोहोचवण्याचे कृत्य केले आहे.त्याबरोबरच अंनीस च्या कार्यकर्त्यांचा चमनगोटा करून तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढू असा धमकीवजा इशारा दिला होता.

या सगळ्या घटनेमुळे वातावरण खूपच तापले जायचे. 

परंतु कुडाळ येथील न्यायालयीन समस्येबाबत येथील वकिलांच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्गचे तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. असता त्यावेळेला डुंगेश्वराचा विषय निघाला. त्यावेळी नारायण राणे शिवसेनेत होते आणि सेनेला हिंदुत्वाचा झेंडा हातात घेतलेली संघटना म्हणून ओळखलं जायचं. स्वतः नारायण राणे देखील हिंदुत्वासाठी आक्रमक असायचे. शिवसेनेची राज्यात सत्ता होती. वकिलांना वाटलं कि सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले नारायण राणे हे अंनिस व दाभोलकर यांना थेट धडा शिकवतील.

पण झालं उलटंच, नारायण राणे या शिष्टमंडळाला म्हणाले,

हिंदू-मुस्लिम भेद आपण मानत नाही माझे अनेक कार्यकर्ते हे मुस्लीम आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आमचा पूर्ण पाठिंबा असून सरकारचे ही तसेच धोरण आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकात हा प्रसंग सांगितलेला आहे. ते म्हणतात. नारायण राणे यांच्याकडून असा घरचा आहेर मिळाल्यानंतर धमाकावणाऱ्यांचे ताबूत आपोआपच थंड झाले. पुढे अंनिस आणि त्यांचे कार्यकर्ते सुखरूपपणे २२ घंटा घेऊन डुंगेश्वर येथे गेले.  तीन वर्षांचा लढा यशस्वी ठरला. आजही डुंगेश्वराच्या घंटांच्या निनादातून जागृतीचा आवाज कोकणच्या गाव वस्त्यांमधून घुमत आहे.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.